Babasaheb&Aniket Deshmukh Meet Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangola Politics : गणपतआबांच्या नातवांच्या मनात तरी काय? डॉ. अनिकेतनंतर बाबासाहेबांनीही घेतली पवारांची भेट

Aniket &babasaheb Deshmukh Meet Pawar : सांगोल्याच्या देशमुखांना सोबत घेतल्याशिवाय सांगोला विधानसभा आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे राजकारण पूर्ण होऊ शकत नाही.

Vijaykumar Dudhale

Solapur New : माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी २४ डिसेंबर रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आज (ता. ५ जानेवारी) गणपतआबांचे दुसरे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही पवारांची बारामतीत जाऊन भेट घेतली. अनिकेत यांच्यानंतर बाबासाहेबही पवारांच्या भेटीला गेल्याने गणपतआबांच्या नातवांच्या मनात चाललंय तरी काय, अशी चर्चा सोलापूरच्या राजकारणात रंगली आहे. (Ganpatrao Deshmukh's Grandsons meet Sharad Pawar)

सांगोल्याच्या राजकारणात देशमुख घराण्याचे मोठे वजन आहे. त्यांना सोबत घेतल्याशिवाय सांगोला विधानसभा आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे गणपतआबांच्या नंतर त्यांच्या नातवांनी राजकारणात एन्ट्री घेतली आहे. मागील निवडणुकीत आबांचे नातू डॉ. अनिकेत यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत अवघ्या ७०० मतांच्या अंतराने देशमुख यांचा पराभव झाला होता. विधानसभा निवडणुकीनंतर डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सूत्रे हाती घेत बाजार समिती, सूत गिरणी आणि खरेदी-विक्री संघ आदीच्या निवडणुका बिनविरोध करीत तालुक्याच्या राजकारणात चांगलाच जम बसवला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माढा लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडी आणि महायुतीसाठीही प्रतिष्ठेचा झालेला आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निरोप देऊन डॉ. अनिकेत देशमुख यांना बोलावून घेतले होते. डॉ. अनिकेत यांनी २४ डिसेंबर रोजी पवार यांची बारामतीत गोविंदबागेत जाऊन भेट घेतली. या भेटीवेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटीलही उपस्थित होते.

दरम्यान, पवार यांच्या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे अनिकेत यांनी मान्य केले. मात्र, राजकारणात सर्व गोष्टी सांगता येत नसतात, असे सूचक विधानही त्यांनी पवारांच्या भेटीनंतर केले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्याअनुषंगाने या भेटीकडे पाहिले जात आहे.

दरम्यान, डॉ. अनिकेत यांनी पवारांची भेट घेतल्यानंतर आज (ता. ५ जानेवारी) डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही त्यांची बारामतीत जाऊन भेट घेतली. या भेटीबाबतची माहिती खुद्द बाबासाहेब देशमुख यांंनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. पण, अनिकेतच्या भेटीनंतर डॉ. बाबासाहेब देशमुख यांनीही पवारांची भेट घेतल्याने या दोन भावांमध्ये काय चाललंय, अशी चर्चा रंगली आहे.

डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पवारांची भेट घेण्यापूर्वी तीन दिवस अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. मतदारसंघातील कामे आणि पाण्याच्यासंदर्भात अजितदादांची भेट घेतली, अशी माहिती बाबासाहेब यांनी दिली होती. या भेटीवेळी माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने हेही उपस्थित होते. त्यामुळे गणपतआबांचे नातू आणि पवार यांच्यात काय सुरू आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT