Mangalvedha News : मंगळवेढा तालुक्यातील दामाजी सहकारी साखर कारखाना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एक समीकरण आहे. शिवाजीराव काळुंगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पवारांनी ‘दामाजीचे कसे चालले आहे,’ अशी विचारणा अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्याकडे केली. (How is Damaji Factory going: Sharad Pawar's inquiry to Chairman Shivanand Patil)
मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना निर्णायक राहिला आहे. यापूर्वी आमदारकी लक्ष्मण ढोबळे आणि दामाजी कारखाना मारवाडी वकील यांच्याकडे होती. दोघेही परस्परांचे कट्टर विरोधक मात्र शरद पवार दोघांचे गाॅडफादर होते. अशा परिस्थितीत दामाजी कारखान्याच्या प्रत्येक गोष्टीवर शरद पवारांचे बारीक लक्ष असायचे. दामाजी कारखान्याला आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यापासून कारखान्याच्या व्यवस्थापनाला योग्य ते मार्गदर्शन करण्याची भूमिका त्यांनी बजावली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पवारांची ती भूमिका (स्व.) चरणूकाका पाटील यांच्या काळातही कायम राहिली. मंगळवेढा नगरपालिका व व्यापारी गाळाच्या उद्घाटनासाठी पवार आले होते. दामाजी कारखान्यावर गाळप हंगामाचा प्रारंभही शरद पवारांच्या हस्ते करण्यात आला होता. त्या वेळी दामाजी कारखाना ते मंगळवेढा या हेलिकॉप्टर प्रवासात चरणूकाका पाटील यांच्याकडून कारखान्याबद्दल माहिती घेतली होती. तसेच काही मोलाचे सल्लेही दिले होते.
समविचारी आघाडीने दोन वर्षांपूर्वी दामाजी कारखान्यात सत्तांतर घडविले. आमदार समाधान आवताडे यांच्याकडून कारखाना हिसकावून घेतला. शिवानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली दामाजी कारखान्याचा एक वर्षाचा कारभार हा ऊस उत्पादकाची बिले वेळेत देऊन कर्मचाऱ्यांचे पगार आणि बंद पडलेली पतसंस्थाही सुरू केली. त्यामुळे कारखान्याच्या कारभाराबद्दल मंगळवेढ्याच्या जनतेमध्ये विश्वासर्हता वाढीस लागली आहे.
यंदाच्या गाळप हंगामातही ऊस हा मोठ्या प्रमाणात जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरला गेला. अशा परिस्थितीत गाळप हंगाम सुरू करणे, हे मोठे आव्हान होते. ते आव्हान अध्यक्ष शिवानंद पाटील, उपाध्यक्ष तानाजी खरात यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने माजी आमदार प्रशांत परिचारक, ‘धनश्री’चे शिवाजीराव काळुंगे, भगिरथ भालके, रामकृष्ण नागणे, राहुल शहा, दामोदर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले. दामाजीची गाळपक्षमता 2500 मेट्रीक टनापपर्यंत असतानाही सध्या स्पर्धक कारखान्याच्या बरोबरीने 3500 मेट्रीक टनांपर्यंत प्रतिदिन गाळप क्षमतेने सुरू आहे.
पुढील महिन्यात शरद पवार यांचा शिवाजीराव काळुंगे यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमासाठीचा मंगळवेढा दौरा निश्चित झाला आहे. त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मंगळवेढ्यातील शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली. त्या वेळी दामाजी कारखान्याचे कसे चालले आहे, सध्या कारखान्यासमोर अडचणी काय आहेत? त्या तुम्ही कशा सोडवल्या, सध्या किती किती गाळप केले. याबाबतची सर्व माहिती अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्याकडून अध्यक्ष शरद पवार यांनी जाणून घेतली. एकूणच शिवानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारभाराबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.