Rajshekhar Shivdare Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajshekhar Shivdare : मी सभापतिपदासाठी इच्छूक होतो; पण माझा अनादर करण्यात आला : राजशेखर शिवदारेंची खंत

Solapur Bazar Samaiti : मागील टर्मच्या अगोदर राजशेखर शिवदारे हे बाजार समितीचे सभापती होते. मात्र, त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणून त्यांना पदावरून हटविण्यात आले होते. ती खंत शिवदारे यांच्या मनात होती.

Vijaykumar Dudhale

Solapur, 13 May : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीवेळी सत्ताधारी सचिन कल्याणशेट्टी, दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्या पॅनेलमधील ज्येष्ठ संचालक राजशेखर शिवदारे अनुपस्थित होते. ते नाराज असल्यामुळे ते पदाधिकारी निवडीच्या वेळी अनुपस्थित राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्याबाबत आता खुद्द शिवदारे यांनीच खुलासा केला असून सभापती-उपसभापती निवडीच्या प्रक्रियेत माझा अनादर झाल्याने मी अनुपस्थित राहिलो, असे स्पष्ट केले.

मी सभापतिपदासाठी इच्छूक होतो. पहिल्या वर्षासाठी मला हे पद मिळायला हवे होते, अशी माझी अपेक्षा होती. मात्र, बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीत माझा अनादर झाला, त्यामुळेच मी सभापती आणि उपसभापती निवडीच्या वेळी गैरहजर राहिलो, असेही राजशेखर शिवदारे (Rajshekhar Shivdare) यांनी स्पष्ट केले.

राजशेखर शिवदारे हे सोलापूर बाजार समितीच्या (Solapur Bazar Samiti) संस्थापकांपैकी एक असलेले वि. गु. शिवदारे यांचे चिरंजीव आहेत. मागील टर्मच्या अगोदर राजशेखर शिवदारे हे बाजार समितीचे सभापती होते. मात्र, त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणून त्यांना पदावरून हटविण्यात आले होते. ती खंत शिवदारे यांच्या मनात होती. ती त्यांनी बोलून दाखवली आहे.

शिवदारे म्हणाले, माझ्या सभापतिपदाच्या काळात माझ्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला. मला चुकीच्या पद्धतीने बाजूला करण्यात आले, त्यामुळे या वेळी मला सभापतिपद मिळायला हवे हेाते. पहिल्या वर्षासाठी मला सभापतिपदी संधी देण्यात यावी, अशी अपेक्षा मी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे बोलून दाखवली होती. बाजार समितीच्या संस्थापकांचा वारसदार म्हणून माझी ती माफक अपेक्षा होती.

बाजार समितीच्या निवडणुकीनंतर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलो होतो. त्या वेळी आमची मुख्यमंंत्र्यांसोबत चर्चाही झाली होती, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन दिवसांत सभापतिपदाचा निर्णय कळवितो, असे सांगितले होते. मात्र, या भेटीपूर्वीच सभापतिपदाचा निर्णय झाला होता की काय, असा प्रश्न मला पडला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या प्रक्रियेत मला विश्वासात घेतले नाही. मी व्यक्त केलेल्या अपेक्षेकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले, त्यामुळे सभापती निवडीच्या वेळी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला, असे शिवदारे यांनी नमूद केले.

शब्द पाळण्यासाठी पॅनेलसोबत राहिलो : शिवदारे

पॅनेलमध्ये मला दोन जागा देण्याचा निर्णय झाला. मात्र, जागा वाटपाच्या काळात माझ्या सासऱ्यांचे निधन झाले, त्यामुळे मला पॅनेलच्या जागा वाटपाच्या बैठकांना मला उपस्थित राहता आले नाही. मला दोन जागा देण्याचा शब्द देऊनही तो पाळण्यात आला नाही. मला पॅनेलमध्ये केवळ एकच जागा देण्यात आली. त्यावेळी माझ्या काही सहकाऱ्यांनी पॅनेलमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला होता. मात्र, दिलेला शब्द पाळण्यासाठी मी पॅनेलसोबत राहिलो, असे राजशेखर शिवदारे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT