Uttam Jankar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politic's : राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकरांची मोठी घोषणा; 'यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही'

सरकारनामा ब्यूरो

Solapur NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुक्यातील बडे नेते उत्तमराव जानकर यांनी मोठी घोषणा केली आहे. विधानसभेची आगामी २०२४ च्या निवडणुकीसह कोणतीही निवडणूक येत्या काळात मी लढणार नाही, असा सर्वांना अचंबित करणार निर्णय जानकर यांनी जाहीर केला आहे. (I Will not contest any more elections : NCP leader Uttam Jankar announces)

उत्तमराव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात जानकर यांनी घोषणा केल्याने कार्यक्रमाचा नूरच पालटला. विशेष म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत जानकर हे अवघ्या २५९० मतांनी पराभूत झाले होते. कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी आमदार रामहरी रूपनवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्यासह सर्वच मान्यवर यांच्या निवडणूक (Election) निवृत्तीच्या घोषणेने आश्चर्यचकीत झाले.

जानकर म्हणाले की, आतापर्यंत मी ४१ निवडणुका लढविल्या आहेत. त्यात २७ निवडणुकांमध्ये माझा पराभव झाला होता. त्यानंतही मी राजकीय संघर्ष सुरूच ठेवला. पण आता ५७ वर्षे पूर्ण झाली असल्याने कुठेतरी थांबण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. नवीन कार्यकर्ते तयार व्हावेत, त्यांना संधी मिळावी, यासाठी मी हा निर्णय घेत आहे.

निवडणुका न लढविण्याबाबत आपला अंतरात्मा कौल देत आहे. नवीन नेतृत्वाने पुढे यावे, मी सर्वतोपरी मदत करेन, असे उपस्थितांना आश्वासित करताना आगामी विधानसभा आणि इतर कोणत्याही निवडणुकीत मी उतरणार नाही, असे जानकर यांनी स्पष्ट केले.

जानकर ज्या पक्षात आहेत. त्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या धोरणाच्या विरोधात जानकर यांचा निर्णय आहे. पण इतर पक्षांशी हातमिळवणी करून सेटींग झाले आहे की काय? तसेच निवृत्तीची घोषणा करून उमेदवारीचा दावा बळकट करीत आहेत की काय, असा सवालही माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी केला.

निवडणुका न लढविण्याचा निर्णय उत्तम जानकर यांनी मागे घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले, तर जानकर यांनी राजकीय संघर्ष थांबवू नये, अशी अपेक्षा विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनीही व्यक्त केली.

जानकर यांच्या घोषणेमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांसह विरोधकांमधून तर्कवितर्क लढविले जात आहेत. पुढील निवडणुकीची तयारी करणारा वाढदिवस मेळावा ठरेल, अशी अपेक्षा असताना निवडणूक न लढविण्याचा निर्णय का घेतला? निवडणुका लढणार नाही, या आकस्मिक घोषणेमागे इतर कोणत्या पक्षाशी संधान बांधण्याची सुरवात आहे काय? असे सवाल उपस्थित होत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT