Kolhapur News : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ अनेक नाट्यमय घडामोडींनी चांगलाच चर्चेत आला आहे. काँग्रेसनं विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचं तिकीट कापलं होतं. त्यांच्याऐवजी पहिल्यांदा राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या उमेदवारीला झालेला तीव्र विरोध पाहता काँग्रेसनं मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली. पण उमेदवार बदलाची नामुष्की ओढवल्यानंतर काही तासांतच काँग्रेसला कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून दुसरा धक्का बसला होता.
काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी शिवसेना (Shivsena) शिंदे गटात प्रवेश केला आहे.हा काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर सतेज पाटलांनी जाधव यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.आता महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय पवारांनीही जयश्री जाधवांवर निशाणा साधला आहे.
कोल्हापूर (Kolhapur) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख व उपनेते यांनी एक पत्रकाद्वारे आमदार जयश्री जाधवांवर हल्लाबोल केला आहे. या पत्रकात संजय पवार म्हणतात,उद्धव ठाकरे यांचा आदेश शिरसावंद्य मानत, हात चिन्हाचा प्रचार करणाऱ्या हिंदुत्ववादी शिवसैनिकांची काय चूक होती?
गद्दार वृत्तीला साथ देण्याची तुमची ही सध्याची नवीन जबाबदारी आता कोल्हापूरच्या पेठापेठातील व उपनगरांमध्ये वसलेल्या जनतेला कृतघ्नपणाची वाटू लागलीय. तुमच्या या अवसानघातकी कृतघ्नपणाच्या पक्षांतराचे उत्तर द्या. या निवडणुकीमध्ये गद्दाराला हद्दपार केल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाहीत, असा घणाघात संजय पवारांनी या पत्रकात केला आहे.
संजय पवारांनी एकीकडे चंद्रकांत जाधवांचं कौतुक करताना कोल्हापूर उत्तरचे एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले,तसं म्हटलं तर तत्कालीन गद्दार उमेदवार हा उध्दवजींच्या शिवसेनेचा असला तरी सर्वसामान्यांना दिलेला त्रास व समाजातला प्रत्येक घटकाला दिलेला उपद्रव यामुळं जनतेनं या गद्दाराचा चोख हिशोब मतपेटीद्वारे बजावला.
कुठल्याही क्षेत्रातलं काम हिरीरीनं करणारा चंद्रकांत आण्णांचा स्वच्छ, निरपेक्ष, समाजसेवी असा एक चेहरा अनपेक्षित राजकारणामध्ये आला.आणि कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच एक उद्योगशील असं व्यक्तिमत्व शहराचं आमदार झाला. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या उमेदवारीमुळे उसना आव आणत जयश्रीताईंनी माझ्यावर अन्याय झाला म्हणून शिंदे गटामध्ये कोलांटउडी मारली.
संजय पवारांनी शिवसेना शिंदेंच्या पक्षात प्रवेश केलेल्या जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.ते म्हणाले,जर निवडून येण्याची एवढीच तुम्हाला खात्री होती, तर अपक्ष उमेदवारी तुम्ही का लढवली नाहीत? 'जयश्रीताई, तुमच्या या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? असा खडा सवाल ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने पत्रकाद्वारे आमदार जयश्री जाधव यांना विचारला आहे.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी डावलल्यानंतर नाराज असलेल्या जयश्री जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उद्योगपती चंद्रकांत जाधव यांना काँग्रेसकडून कोल्हापूर उत्तरच्या मैदानात उतरवले होते. तत्पूर्वी जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव या भाजपच्या नगरसेविका होत्या.
मात्र, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर 2019 च्या निवडणुकीत चंद्रकांत जाधव विजयी झाले होते. 2022 मध्ये चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीच्या जोरावर जयश्री जाधव यांचा विजय झाला होता.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, अशी आशा जयश्री जाधव यांना होती. उमेदवारी मिळण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आपली उमेदवारी निश्चित आहे. असा दावा जयश्री जाधव यांच्याकडून केला जात होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.