Ranjitshinh Naik Nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Paricharak-Kale News : खासदार निंबाळकरांच्या अडचणी वाढल्या; प्रशांत परिचारक-काळेंनीही फिरवली पाठ...

Madha Lok Sabha Constituency : निंबाळकरांच्या कामाचे कौतुक करणारे भाजप नेते तथा माजी आमदार प्रशांत परिचारक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते कल्याणराव काळे यांनी निंबाळकरांच्या पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्याची उलटसुलट चर्चा तालुक्यात सध्या सुरू आहे.

भारत नागणे

Pandharpur News : माढ्याच्या उमेदवारीवरून भाजप आणि महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचाही कडाडून विरोध आहे. खासदार निंबाळकरांच्या पाठीशी पूर्वी ठामपणे उभे राहणारेही आता त्यांच्याकडे पाठ फिरवताना दिसून येत आहेत. निंबाळकरांच्या कामाचे कौतुक करणारे भाजप नेते तथा माजी आमदार प्रशांत परिचारक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते कल्याणराव काळे यांनी निंबाळकरांच्या पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्याची उलटसुलट चर्चा तालुक्यात सध्या सुरू आहे.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitshinh Naik Nimbalkar) यांच्या विरोधात भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी दंड थोपटले आहेत. माढ्यातून (Madha) त्यांनी लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. याशिवाय फलटणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजेही (Ramraje Naik Nimbalkar) खासदारांच्या विरोधात आहेत, त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम कायम आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकीकडे उमेदवारीचा पेच असताना दुसरीकडे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मात्र विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटने करत फिरत आहेत. पंढरपूर तालुक्यातील उपरी येथील कार्यक्रमाला खासदार नाईक निंबाळकर, शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे निरीक्षक प्रशांत परिचारक (Prashant Paricharak), राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, प्रशांत परिचारक आणि कल्याणराव काळे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे, त्यामुळे पंढरपुरात चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने नुकताच माढा लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्यानंतर या मतदारसंघातील राजकीय समीकरणे हळूहळू बदलत आहेत. निंबाळकरांचे खंदे पाठराखे आमदार बबनराव शिंदे आणि संजय शिंदे यांनीही माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे बोलून दाखवली आहे, त्यामुळे खासदारांचे अवसान गळाले आहे.

मित्रपक्षाकडून मतदारसंघावर दावा केला जात असताना दुसरीकडे पक्षाचे महत्त्वाचे नेते प्रशांत परिचारक आणि राष्ट्रवादीचे कल्याणराव‌ काळे यांनीही निंबाळकरांपासून अंतर राखायला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहेत. त्यातूनच त्यांनी उपरीतील कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याची चर्चा रंगली आहे. हे दोन्ही नेते नसल्यामुळे कार्यक्रमाला या दोन्ही गटांचे पदाधिकारी गेले नाहीत. दिवसेंदिवस माढ्याच्या उमेदवारीचा तिढा वाढू लागला आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT