Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुपडासाफ झालेला आहे. महाविकास आघाडीला या जिल्ह्यात नारळ ही फोडता आलेला नाही. तर करवीर विधानसभा मतदारसंघांमधील राहुल पाटील आणि शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यात अटीतटीची लढत झाली. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघात महायुतीनेच बाजी मारली आहे. Maharashtra Election Assembly 2024 Result news
कोल्हापूर जिल्ह्यात लाडक्या बहिणीचा आशीर्वाद हा महायुतीला (Mahayuti) पूरक ठरला आहे. जिल्ह्यात एकतर्फी महायुतीच्या बाजूने कौल लागला आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे. मात्र, अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असल्याने ते महायुतीतच जातील असा अंदाज आहे.
पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरुवातीला महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांनी बाजी मारत पहिल्या सात ते आठ फेरीमध्ये आघाडीवर स्थान मिळवले. मात्र जसजसे वारणा आणि पन्हाळा तालुक्यातील भागाला सुरुवात झाली. त्यानंतर विनय कोरे यांनी सरूडकर यांच्या मताधिक्याला भगदाड पाडले. 25व्या फेरी अखेर विनय कोरे यांनी अजित पाटील सरूडकर यांच्यावर 35 हजार 914 मतांनी विजय मिळवला.
कोल्हापूर (Kolhapur) दक्षिण विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपने विजय मिळवला आहे. सुरुवातीपासूनच भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी मताधिक्य कायम ठेवले. 23व्या फेरीपर्यंत विद्यमान काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील हे पिछाडीवरच राहिले. ईव्हीएम मतमोजणी पूर्ण होईपर्यंत अमल महाडिक यांना 18,131 मतांची आघाडी मिळाली. महाडिक यांना विजयी घोषित करण्यात आले.
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी डबल हॅट्रिक केली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीत घाटगे यांचा मुश्रीफ यांनी पराभव केला आहे. भाजपमधून घाटगे यांनी महाविकास आघाडीत प्रवेश करून मुश्रीफ यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता. मात्र शेवटपर्यंत आणि प्रचारात अत्यंत अटीतटीच्या लढतीत मुश्रीफ यांनी विजय मिळवला.26 फेरी अखेर हसन मुश्रीफ यांचा 11879 मतांनी विजय झाला आहे.
सुरुवातीपासूनच शिरोळ विधानसभा मतदारसंघांमधील लढत ही एकतर्फी झाली आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दुसऱ्यांदा विधानसभेवर एन्ट्री केली आहे. काँग्रेसचे उमेदवार गणपतराव पाटील यांचा 40,889 मतांनी दणदणीत पराभव केला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. राज्यातील एकमेव मतदार संघ असा आहे जिथे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार या ठिकाणी नव्हता. काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्यानंतर अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना महाविकास आघाडीने पुरस्कृत उमेदवारी जाहीर केली होती.
मात्र, सुरुवातीलाच महाविकास आघाडीला त्याचा फटका बसला होता. प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी देखील राजेश क्षीरसागर यांनी बाजी मारली. सुरुवातीला राजेश लाटकर यांची आघाडी होती मात्र राजेश क्षीरसागर यांनी शेवटपर्यंत मताधिक्य कायम ठेवले. 23 फेरी अखेर राजेश क्षीरसागर 29310 मतांनी विजयी झाले.
हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून अशोकराव माने यांनी पहिल्यांदा विधानसभेत एन्ट्री केली आहे. मागील वेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी देखील त्यांनी महायुतीचे घटक पक्ष असलेल्या जनसूराज्य शक्ती पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती.
विद्यमान काँग्रेसचे आमदार राजू बाबा आवळे यांच्या विरोधात षड्डू ठेकला होता. मात्र सुरुवातीपासूनच मताधिक्यात आघाडी घेत अशोकराव माने यांनी सर्व फेरी अखेर दणदणीत विजय मिळवला. माने यांना 46328 इतकी मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
राधानगरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात लढत झाली. ठाकरे गटाकडून आयात उमेदवार करण्यात आला होता. आमदार प्रकाश आबिटकर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार आणि माजी आमदार के पी पाटील अशी लढत झाली. आमदार प्रकाश आबिटकर हे 37 हजार 897 मतांनी विजयी झाले.
चंदगड विधानसभा मतदारसंघात ही महाविकास आणि महायुतीचे दोघेही उमेदवार पिछाडीवर आहेत. या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील हे आघाडीवर आहेत. पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार नंदाताई बाभुळकर आणि महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकला होतात.
तर मागील विधानसभा निवडणुकीत दोन नंबरचे मताधिक्य शिवाजीराव पाटील यांनी घेतले होते. आतापर्यंत शिवाजीराव पाटील हे चंदगड विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. 28 फेरी अखेर शिवाजी पाटील याना 24063 मते मिळवून विजयी झाले आहेत.
करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस कडून राहुल पाटील तर शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. सध्या महायुतीचे चंद्रदीप नरके आघाडीवर असून 26 पैकी 23 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. 23 फेऱ्यापर्यंत नरके यांची 9 हजार 155 मतांची आघाडी आहे. मात्र राहुल पाटील यांनी शेवटपर्यंत नरके यांना जेरीस आणले. अखेर निसटत्या मतांनी नरके यांचा 2000 मतांनी विजयी झाला.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात ही भाजपची एकतर्फी निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे त्यांची सुरुवातीपासूनच पीछेहाट राहिली आहे. राहुल आवाडे हे जवळपास 40 हजारांच्या मताधिक्याने पुढे आहेत. केवळ दोन फेऱ्या शिल्लक असल्याने आवडे यांचा विजय निश्चित समजला जातो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.