Satej Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil : कोल्हापुरात 'अजिंक्यताऱ्या'चे हात बळकट; भाजपला सतेज पाटलांचाच धोका

Rahul Gadkar

Kolhapur Lok Sabha : राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विरोधक शिल्लक न ठेवण्याचा चंग बांधला आहे. मात्र, भाजपसमोर विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे कडवे आव्हान असणार आहे.

बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत आमदार पाटील यांनी उर्वरित साडेतीन तालुक्यात आपली ताकद निर्माण केल्याने अजिंक्यताराचे हात बळकट झाल्याचे बोलले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ हे युतीत असल्याने भाजपला या लोकसभेत सतेज पाटील यांचाच धोका जास्त आहे.

काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटलांच्या नेतृत्वाची भुरळ जिल्ह्याला पडलेली आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यातील राजकारणावर त्यांची पकड मजबूत होत आहे. जिल्हाध्यक्ष पद हाती घेतल्यानंतर काँग्रेसचे हात जिल्ह्यात बळकट झाले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस संपुष्टात आली होती. त्यानंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीत मात्र जिल्ह्यात चार काँग्रेसचे आमदार निवडून आले, तर विधान परिषदेत स्वतः आणि जयंत पाटील-आसगावकर यांना निवडून आणण्यात यशस्वी झाले.

गेल्या पाच-सहा वर्षांत त्यांनी जाणीवपूर्वक प्रत्येक तालुक्यात लक्ष देत कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे. राजाराम कारखाना वगळता गोकुळ, जिल्हा बँक, बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीतही त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे. सहकारात संचालक पेरल्याने प्रत्येक तालुक्यात एक विशिष्ट गट त्यांनी कार्यरत केला आहे. शिवाय बिद्रीच्या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांची राजकीय मुत्सद्देगिरी ओळखून नेतृत्व करण्याची संधी दिली.

आमदार सतेज पाटलांचा सात वर्षांच्या पालकमंत्री पदाचा अनुभव लक्षात घेतला तर त्यांनी प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे. कार्यकर्त्यांचे विशेष गट तयार केले आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हाच गट सत्ताधाऱ्यांना अवजड जाणार आहे. तालुका तालुक्यात गट तयार केल्याने भाजपसह शिंदे गटाची लोकसभा निवडणुकीत डोकेदुखी वाढणार आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील आमदाराने आपल्या मतदारसंघापुरतेच राजकारण मर्यादित ठेवले होते. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मोठी संधी आली होती. त्यांनी काहीसा प्रयत्न केला; पण जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या राजकारणासाठी त्यांनी ‘कागल’, ‘राधानगरी’, ‘चंदगड’ वगळता इतर तालुक्यांत लक्ष दिले नाही. तेथील दुसऱ्या पक्षाचे नेते दुखावतील या भीतीपोटी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताकद दिली नाही. सतेज पाटलांनी मात्र काँग्रेसचे चार विधानसभेचे व दोन विधान परिषदेचे आमदार निवडून आणत, नेतृत्वाची चुणूक हायकमांडला दाखवली.

बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत निकालानंतर सतेज पाटलांनी केलेली व्यूहरचना ही माजी आमदार के. पी. पाटील यांना पूरक ठरली. निवडणुकीत के. पी. पाटील गटाने एकतर्फी बाजी मारली. विजयी मेळाव्यात माजी आमदार के. पी. पाटलांनी सूचक वक्तव्य करून आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीची अप्रत्यक्षपणे भूमिका स्पष्ट केली. 'तुम्ही सांगाल ते..' असे वक्तव्य केल्यानंतर सतेज पाटलांच्या नेतृत्वाचे चाहते यानिमित्ताने तयार झाले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सतेज पाटलांच्या नेतृत्वाचा वरचष्मा राहण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून आहे.

सतेज पाटलांची ताकद

  • जिल्ह्यात चार विधानसभा आणि दोन विधान परिषद आमदार

  • बिद्री कारखान्यात पाच संचालक

  • कोल्हापूर शहर, करवीर, गगनबावडा : स्वत:चा गट

  • राधानगरी : ‘गोकुळ’चे संचालक राजेंद्र मोरे, ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले

  • भुदरगड : माजी सभापती सत्यजित जाधव, मधुअप्पा देसाई, सचिन घोरपडे, जीवन पाटील, शामराव देसाई, आदी.

  • चंदगड : ‘दौलत’चे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील.

  • आजरा : ‘गोकुळ’च्या संचालिका अंजना रेडेकर, अभिषेक शिंपी.

  • शाहूवाडी : ‘गोकुळ’चे संचालक कर्णसिंह गायकवाड.

  • पन्हाळा : ‘गोकुळ’चे संचालक अमरसिंह पाटील

  • हातकणंगले : शशांक बावचकर, शशिकांत खवरे, राहुल खंजिरे यांसह राजाराम कारखान्याशी संबंधित पदाधिकारी.

  • शिरोळ : गणपतराव पाटील

  • गडहिंग्लज : विद्याधर गुरबे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT