Kolhapur Politics Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : मातब्बरांना लोकसभेपेक्षा विधानसभेचे टेन्शन; आघाडीच्या नेत्यांना राजकीय भविष्याची चिंता

Kolhapur Lok Sabha constituency : आगामी लोकसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना सत्ताधारी आणि विरोधकांकडून उमेदवारांचा शोध सुरू

Rahul Gadkar

Kolhapur News : आगामी लोकसभा निवडणुकीबाबत हालचाली गतिमान होत असताना सर्वच पक्षांच्या उमेदवारीबाबत संभ्रमावस्था असल्याने पक्षातील वरिष्ठांचे टेन्शन वाढले आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील वरिष्ठ आणि मातब्बर नेत्यांना लोकसभेपेक्षा विधानसभेचे टेन्शन लागून राहिले आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वज्रमूठ बांधली असताना कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून प्रभावी चेहरा मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. अशा परिस्थितीत आघाडीचे नेते स्वतःचे अंग राखून लोकसभेची तयारी करीत आहेत. (LokSabha Election 2024)

आघाडीतील प्रभावी चेहरेच लोकसभेत विजय आणू शकतात. असे वातावरण असले तरी त्याला मातब्बरांची नापसंती आहे. हीच अवस्था महायुतीतील मातब्बरांची आहे. बड्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याची रणनीती सर्व पक्षांमध्ये दिसत आहे. महाविकास आघाडीकडून आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, तर महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, खासदार धनंजय महाडिक यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र महाडिक वगळता सर्वांनीच 'आपण भला आणि आपला विधानसभा मतदारसंघ भला' याच भूमिकेत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी लोकसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रभावी उमेदवारांचा शोध सुरू आहे. सक्षम उमेदवाराला लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याचे धोरण महायुती आणि महाविकास आघाडीचे आहे. मध्यंतरी काँग्रेसमधील आमदार सतेज पाटील किंवा आमदार पी. एन पाटील यांनी लोकसभा लढवावी, अशी इच्छा खुल्या व्यासपीठावर बोलून दाखवली होती. मात्र दोघांनीही एकमेकांकडे बोट दाखवत वेळ मारून नेली.

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी जयंतीदिनी काढण्यात आलेले सद्‌भावना दौड कार्यक्रमात काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी आमदार पी. एन. पाटील यांच्या हिंदी भाषणाचे कौतुक केले. त्याचा त्यांना चांगला उपयोग होईल, असे म्हणत लोकसभा निवडणुकीसाठी ते पात्र असल्याचे सूचित केले होते. त्यावर सतेज पाटील यांनी माझ्यापेक्षा तुमची हिंदी भाषा चांगली म्हणत पी. एन. पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, असे संकेत दिले. परंतु, पी. एन. पाटील यांनी लोकसभेसाठी आमदार सतेज पाटील हेच योग्य उमेदवार असल्याचे सांगत चेंडू त्यांच्याकडे टोलवला होता. यामुळे दोन्ही पाटील लोकसभेला इच्छा नसल्याचे दाखवून दिले.

लोकसभेपेक्षा विधानसभेत आमदार होऊन राज्यात वर्चस्व निर्माण करण्याचे काँग्रेसच्या नेत्यांचे स्वप्न आहे. लोकसभेत विजय झाला आणि केंद्रात भाजपचे सरकार आले तर केवळ पाच वर्षे नावापुरती खासदारकी राहील. अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना आहे. त्यापेक्षा सध्या राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेचा कौल आहे. लोकसभेपेक्षा विधानसभेत विजयी झाल्यास राज्यात ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांचा असणार आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र, या तिन्ही आजी-माजी आमदारांना लोकसभेपेक्षा विधानसभा अधिक प्रिय दिसते. त्या ठिकाणी आवाडे हे त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळावी या प्रयत्नात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सक्षम मातब्बरांना दिल्लीपेक्षा राज्यात ताकद आणि वर्चस्व तयार करण्यासाठी अधिक रस असल्याचे दिसून येत आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT