Dhairyasheel Mohite Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : मोहिते पाटलांनी वाढवले भाजपचे टेन्शन; माढ्यातून लोकसभा लढविण्याची केली घोषणा

Vijaykumar Dudhale

Solapur News : धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा आज (ता. १४ नोव्हेंबर) दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर केली. मोहिते पाटील यांच्या घोषणेमुळे भाजपचे टेन्शन मात्र वाढणार आहे. कारण माढ्यातून लढण्याबाबत विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेही ठाम आहेत, त्यामुळे भाजप माढ्याचा सुवर्ण मध्य कसा काढणार, याकडे सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांचे लक्ष असणार आहे. (Loksabha Election 2024 Dhairyasheel Mohite Patil has announced to contest Lok Sabha elections in Madha)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विजयसिंह मोहिते पाटील यांनी २०१४ मध्ये केले होते. मात्र, राष्ट्रवादीत मतभेद झाल्यानंतर २०१९ च्या निवडणुकीपूर्वी मोहिते पाटील कुटुंबीयांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून मोहिते पाटील यांना तिकीट मिळेल, असे वाटत असताना ऐनवेळी फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने तिकीट दिले हेाते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे यांनी निवडणूक लढवली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे आणि मोहिते पाटील कुटुंबात राजकीय शत्रुत्व असल्यामुळे संजय शिंदेंचा मार्ग अडविण्यासाठी मोहिते पाटील यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत मागील निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणले. निवडणुकीनंतर मोहिते पाटील आणि खासदार निंबाळकर यांच्यामध्ये मतभेद झाले. एकाच पक्षात असूनही या दोन्ही नेत्यांमध्ये अंतर वाढत गेले.

माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी धैर्यशील मोहिते पाटील यांनी केल्याचे गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियात येणाऱ्या पोस्टवरून दिसून येत होते. तशी तयारीही मोहिते पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून चालवली होती. त्यावर आज धैर्यशील मोहिते पाटील यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

भारतीय जनता पक्षाकडे मी माढ्यातून लोकसभा निवडणुकीच्या तिकिटाची मागणी करणार आहे. माढ्यातून लढण्यासाठी मी इच्छुक आहे. कारण या मतदारसंघात मी पक्षाचे काम केलेले आहे. कार्यकर्त्यांचीही तशी इच्छा आहे. कार्यकर्ते आता ऐकण्याच्या बाहेर गेलेले आहेत. निवडणूक लढवण्याची आमची संपूर्ण तयारी आहे. मी गेली साडेतीन वर्षे सर्वांच्या संपर्कात आहे. पक्षाच्या मागे लागून उमेदवारी पदरात पाडून घेणार आहे. त्यामुळे मी लोकसभेची निवडणूक लढवणारच आहे, अशी घोषणा धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर केली.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलेल्या या घोषणामुळे भाजपची अडचण वाढणार आहे. कारण विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे भाजप माढ्यातून कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवतंय हेही पाहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT