Sharad Pawar-Jaysinh Mohite Patil-Dhairyasheel Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Lok Sabha Constituency : शरद पवारांनी वाढविले मोहिते पाटलांचे टेन्शन; माढ्यातून तुतारी मिळणार का?

Loksabha Election 2024 : भाजपकडून डावलण्यात आल्यानंतर मोहिते पाटील यांच्याकडून माढ्यात तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याबाबत चाचपणी सुरू आहे. त्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील हे आग्रही आहेत. धैर्यशील यांनी तर माढा लोकसभा मतदारसंघातून प्रचाराची एक फेरीही पूर्ण केली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 29 March : भारतीय जनता पक्षाने उमेदवारीमध्ये डावलल्यानंतर मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून बंडाचे निशाण फडकावले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीवर निवडणूक लढविण्याचा निर्धार जयसिंह मोहिते पाटील यांनी बोलूनही दाखवला. मात्र, पवारांकडून अजूनही तसे कोणतेही संकेत दिल्याचे ऐकीवात नाही. उलट आज सातारा दौऱ्यावर असताना त्यांनी ‘माढ्यातून धनगर समाजाला उमेदवारी द्यावी, अशी आमची इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही योग्य उमेदवाराचा शोध घेतोय’, असे विधान करून मोहिते पाटलांचे टेन्शन वाढविले आहे. त्यामुळे मोहिते पाटलांना पवार खरंच तुतारीच्या चिन्हावर लढवणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे इच्छूक होते. मात्र, भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या मोहिते पाटील यांनी माढ्यातून बंडाची भाषा सुरू केली आहे. जयसिंह मोहिते पाटील यांनी तर भाजपला केवळ माढ्यातूनच नव्हे, तर बारामती आणि सातारा मतदारसंघातून हरवणार असल्याचे स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, भाजपकडून (BJP) डावलण्यात आल्यानंतर मोहिते पाटील यांच्याकडून माढ्यात तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याबाबत चाचपणी सुरू आहे. त्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील हे आग्रही आहेत. धैर्यशील यांनी तर माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha Constituency) प्रचाराची एक फेरीही पूर्ण केली आहे. पण, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भूमिका अजूनही भाजपकडे झुकणारी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मोहिते पाटलांमध्ये माढ्याच्या उमेदवारीवरून काही प्रमाणात मतभेद असल्याची कुजबूज सुरू आहे.

धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभा निवडणूक लढविण्यावर ठाम असताना रणजितसिंह मोहिते पाटील मात्र देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांशी चर्चा करत आहेत. भाजपकडून मधल्या काळात मोहिते पाटलांना वगळून निंबाळकरांच्या उमेदवारीबाबत महायुतीच्या नेत्यांच्या बैठका घेतल्या होत्या, त्यामुळे मोहिते पाटीलही अस्वस्थ आहेत. कार्यकर्त्यांकडूनही तुतारी हाती घेण्यासाठी दबाव वाढत आहे, त्यामुळे धैर्यशील यांनीही तुतारी हाती घेण्याची मनाची तयारी केल्याचे सांगितले जाते. पण, शरद पवारांकडून अजूनही ग्रीन सिग्नल मिळाला नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे मोहिते पाटील अजूनही गॅसवर असल्याचे दिसून येते.

माढ्यातून एकीकडे मोहिते पाटील यांची चर्चा सुरू असताना सातारा दौऱ्यावर आलेल्या पवारांनी वेगळीच माहिती दिली. माढ्यातून धनगर समाजाला उमेदवारी द्यावी, ही आमची इच्छा आहे. ती पूर्ण करण्यासाठी आम्ही योग्य उमेदवाराचा शोध घेतोय. आमच्याकडे लोकांचे अर्जही आले आहेत. काही उच्चशिक्षित लोकांनीही आमच्याकडे उमेदवारी मागितली आहे. पण, सामाजिक संतुलन राखण्याच्या दृष्टीने आम्ही खोलात जात आहोत, असे सूचक विधान करून पवारांनी मोहिते पाटील यांना इशारा दिल्याचे मानले जात आहे.

पवारांपुढे दोन सक्षम पर्याय

सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख आणि करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील ही दोन तगडी नावे पवारांपुढे माढा लोकसभा मतदारसंघासाठी आहेत. त्यातूनही शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी डॉ. देशमुख यांच्यासाठी माढ्याची मागणी केली आहे. बारामतीचे मताचे गणित सोडविण्यासाठी माढ्यातून देशमुख किंवा पाटील या दोन नावांपैकी एकाला पवारांची पसंती मिळू शकते. त्यामुळे उमेदवारी मोहिते पाटील यांना की देशमुख पाटील यांना मिळते, याकडे सोलापूरचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT