Ranjitshinh Nimbalkar-Dhairyasheel Mohite Patil-Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Lok Sabha Constituency : मोहिते पाटलांची बंडखोरी गृहीत धरून भाजपची रणनीती; माढ्यात महाआघाडीचा उमेदवारीचा तिढा सुटणार?

Loksabha Election 2024 : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. अथवा सांगोल्याचे शेकापचे युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकते. शरद पवार माढ्यात कोणता डाव टाकतात, याकडेच सर्वांचे लक्ष आहे.

भारत नागणे

Solapur, 31 March : माढ्यातील मोहिते पाटलांच्या नाराजीची राज्यभर चर्चा सुरू आहे. भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील यांनी बंडखोरीचा शड्डू ठोकला आहे. निंबाळकर प्रचाराला लागले आहेत, मात्र, मोहिते पाटलांची नाराजी कायम आहे. त्यामुळे भाजपनेही आता मोहिते पाटील यांची संभाव्य बंडखोरी गृहीत धरून पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, माढ्याचा महाविकास आघाडीचा उमेदवारही अजून जाहीर झालेला नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार माढ्यात कोणता डाव टाकतात, याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

शरद पवारांनंतर (Sharad Pawar) विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छूक होते. मात्र, भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitshinh Naik Nimbalkar) यांना पुन्हा उमेदवारी दिली, त्यामुळे मोहिते पाटील यांच्या असंतोषाचा भडका उडाला. धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil ) यांनी पुन्हा पायाला भिंगरी बांधली आणि मतदारसंघाचा दौरा केला. त्यांच्या जोडीला मोहिते पाटील कुटुंबातील व्यक्तीही मतदारसंघात फिरताना दिसत आहेत. त्यामुळे मागच्या वेळी निंबाळकरांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारे धैर्यशील मोहिते पाटील स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरतील अशी शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धैर्यशील मोहिते पाटील यांचे काका जयसिंह मोहिते पाटील यांनी, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणाच करून टाकली आहे. त्यामुळे माढ्यातून धैर्यशील यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. खुद्द भाजपचे उमेदवार निंबाळकर यांनीही उमेदवारी जाहीर झाल्याच्या पहिल्या दिवसापासून मोहिते पाटील यांना वगळून प्रचाराला सुरुवात केली आहे. मोहिते पाटील विरोधकांना एकत्र करून त्यांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडून मोहिते पाटील यांची समजूत घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यात त्यांनाही यश येताना दिसत नाही. त्यामुळे भाजपकडूनही मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, ही शक्यता गृहीत धरूनच आता रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार बैठका घेण्यात येत आहेत. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर केली आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत बराच खल झाला आहे. शरद पवारांनी माढ्यातून महादेव जानकर यांनी निवडणूक लढवावी, अशी इच्छा व्यक्त केली. जानकर यांनीही तसे संकेत दिले होते. मात्र, अचानकपणे त्यांनी यू टर्न आपण महायुतीसोबत राहणार असल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवारही अजून जाहीर झालेला नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. अथवा सांगोल्याचे शेकापचे युवा नेते डॉ. अनिकेत देशमुख (Aniket Deshmukh) यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकते. शरद पवार माढ्यात कोणता डाव टाकतात, याकडेच सर्वांचे लक्ष आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT