Mahavikas Aghadi Leader Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Maha Aghadi News : सोलापुरात महाआघाडीत फूट; शिवसेनेच्या सभेला प्रणिती शिंदेंची दांडी, दोन्ही खासदारही आमने सामने

Assembly Election 2024 : खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या पाठीशी ताकद उभी केली आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भगीरथ भालके यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 07 November : सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत झालेली बिघाडी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभ सभेसाठी निमंत्रण असूनही काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे, सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवली, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची मने एकमेकांपासून दुरावत चालल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

पंढरपूर मतदारसंघातही महाविकास आघाडीचे सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील दोन्ही खासदार हे एकमेकांच्या विरोधात उभे टाकले आहेत. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या पाठीशी ताकद उभी केली आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भगीरथ भालके यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दिसलेली महाविकास आघाडीतील ऐकी विधानसभा निवडणुकीत दिसणार की शेवटपर्यंत कुरबुरी कायम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दक्षिण सोलापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीतून शिवसेनेचे (Shivsena UBT) अमर पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. उमेदवारी अर्ज भरताना घडलेल्या नाराजीनाट्यातूनच महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे, असे दिसत नव्हते.

विशेषतः काँग्रेसचे (Congress) माजी आमदार दिलीप माने यांनी निवडणुकीतून माघार घेतली खरी; पण ते अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या पाठीशी उभे आहेत, अशी बॅनरबाजी सध्या सोशल मीडियातून सुरू आहे. याबाबत काँग्रेसचा कोणताही नेता अधिकृतपणे बोलायला तयार नाही.

शिवसेना उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचाराच्या पहिली सभा हत्तूर येथे झाली. या सभेसाठी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे, सोलापूरचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांना निमंत्रण होते. मात्र, या नेत्यांनी अमर पाटील यांच्या सभेकडे पाठ फिरवली.

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटनाला काँग्रेसचे बडे नेते उपस्थित होते. काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, हरीश पाटील, सिद्धाराम चाकोते, भारत जाधव हे नेते काडादी यांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते, त्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अमर पाटील यांचा प्रचार करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT