Uttam Jankar-Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahayuti Govt : महायुतीचे सरकार कोसळणार; पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्याने थेट डेडलाईनच सांगितली

Uttam Jankar's claim : मी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी निघालो आहे. दिल्लीत तुम्ही जर ट्रॅप लावला तर शंभर टक्के पकडले जाणार आणि नाही लावला तर भाजप हद्दपार होणार आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 20 January : ज्या दिवशी उत्तम जानकरांचा राजीनामा होईल, त्या दिवशी महाराष्ट्रातील सरकार कोसळणार. त्याला फार दिवस लागणार नाहीत. येत्या चार महिन्यांत अजितदादा, तुम्ही या राज्याच्या सत्तेतून पायउतार झालेला असाल, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो, असे चॅलेंज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.

माळशिरसमध्ये माध्यमाशी बोलताना आमदार जानकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांना उघड चॅलेंज दिले आहे. ते म्हणाले, ईव्हीएम घोटाळ्याच्या मुळाशी मी गेलेअलो आहे. त्यानंतरच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे, असेही जानकर यांनी स्पष्ट केले.

लोकसभेच्या निवडणुकीत पाहिल्या पाच टप्प्यात अजिबात घोळ नव्हता. मात्र, सहाव्या आणि सातव्या टप्प्याला तुम्ही ट्रॅप लावला. महाराष्ट्रात ४७ विरुद्ध १ असं गणित होतोय, हे महायुतीच्या नेत्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत शेवटच्या दोन टप्प्यात ट्रॅप लावला. विधानसभेच्या निवडणुकीतही सेटिंग लावली, असा आरोपही उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी केला.

उत्तम जानकर म्हणाले, मला अजितदादांना विचारायचं आहे, तुम्ही बारामतीतून निवडून आला आहात का? दादा, तुम्ही वीस हजार मतांच्या फरकाने पडलेला आहात. पण, तुम्हाला एवढंही सांगतो की, तुम्ही निवडणूक घ्या, ती ईव्हीएमवर घ्या किंवा आणखी कशावर घ्यायची ती घ्या. तुम्ही त्या दिवशी हरणार आहात.

मी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी निघालो आहे. दिल्लीत तुम्ही जर ट्रॅप लावला तर शंभर टक्के पकडले जाणार आणि नाही लावला तर भाजप हद्दपार होणार आहे. त्यानंतर बिहार, गोवा, पश्चिम बंगाल या राज्यांचीही निवडणूक आहे. तुम्ही ज्या राज्याच्या निवडणुकीत ट्रॅप लावाल, त्या ठिकाणी तुम्ही पकडले जाणार किंवा सत्तेतून हद्दपार होणार, असा दावाही त्यांनी केला.

माजी आमदार सातपुते यांच्या टीकेला जानकरांनी सडेतोड शब्दांत उत्तर दिले. मी राम सातपुते यांना अनेकदा सांगितलं आहे. जानकर म्हणाले, राम सातपुतेंना जंतरमंतर किंवा निवडणूक आयोगाकडे बोलावतो. मागेही अनेकदा त्यांना मी बोलावले आहे. तुम्ही मध्ये मध्ये चूच घालू नका; नाही तर कुठंतरी कात्रीत मुंडक सापडून तुमचा कार्यक्रम व्हायचा.

सातपुतेंनी माझ्याबरोबर निवडणूक आयोगाकडे यावे. लोकांना पर्याय देऊ की ईव्हीएम किंवा बॅलेट पेपर. लोकांच्या पसंतीप्रमाणे मतदान होऊन जाऊ द्या. मी एका सेकंदात राजीनामा देईन. पण सातपुते यांनी म्हणो अथवा न म्हणो. माळशिसची निवडणूक शंभर टक्के लागणार आहे, राम सातपुते यांनी तयारीत राहावं. त्या निवडणुकीत तुम्ही उभं राहून ४० हजार मतं घेऊन दाखवावीत, असे आव्हानही जानकर यांनी सातपुते यांना दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT