
Akola, 20 January : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रिपद स्वीकारले, त्या वेळी मस्साजोग गावाने एक निर्णय घेतला आहे. पालकमंत्री म्हणून बीड जिल्ह्यासंदर्भात तुमची रणनीती काय आहे, असा प्रश्न मस्साजोगचे ग्रामस्थ अजितदादांना विचारणार आहेत. त्यासाठी अजित पवार हे मस्साजोगला येतील किंवा ज्या दिवशी अजितदादा बीडला येतील, त्या दिवशी ग्रामस्थ अजितदादांना येऊन भेटणार आहेत, असा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे, असे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितले.
संतोष देशमुख (Santosh Deshmukh) खून प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, यासाठी अकोला येथे आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी धनंजय देशमुख, संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख अकोल्यात आले होते, त्या वेळी माध्यमांशी बोलताना मस्साजोग ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय धनंजय देशमुखांनी सांगितला.
धनंजय देशमुख म्हणाले, आम्हाला न्याय मिळवताना पालकाची काय जबाबदारी आहे किंवा पालकमंत्र्यांना काय सांगायचे आहे, याबाबतचा निर्णय गावाने घेतला आहे. त्यासाठी एक तर अजितदादा मस्साजोगला येतील किंवा मस्साजोगचे (Massajog ) ग्रामस्थ ज्या दिवशी दादा बीडला येतील, तेव्हा त्यांना भेटायला बीडमध्ये येतील, असा निर्णय गावकऱ्यांनी घेतला असून त्यांनी तो मला कळविला आहे.
संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपीला फाशीची झाली पाहिजे, असे मत धनंजय मुंडे यांच्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचे आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनी फक्त मत व्यक्त करून चालणार नाही. त्यांना काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल. नुसती खंत व्यक्त करून किंवा श्रद्धांजली वाहून काम होणार नाही. लोकप्रतिनिधींनी भूमिका घेतली पाहिजे, अशी अपेक्षा धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली.
जे आरोपी आहेत, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे नुसतं म्हणून चालणार नाही. न्यायासाठी आम्हीही वणवण फिरतोय, आम्हीही घरात बसून आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असं म्हणू शकलो असतो. पण लोकप्रतिनिधींनी त्यासंदर्भात एक भूमिका घेतली पाहिजे. न्यायासाठी आम्ही एक पवित्रा घेतला आहे, त्याप्रमाणे त्यांनी काय केलं आहे, असा सवाल धनंजय देशमुख यांनी केला.
संपूर्ण जिल्हा हे पालकमंत्र्यांचं कुटुंब असतं. आमचा अजित पवार यांच्यावर विश्वास आहे. अजितदादा आम्हाला जरुर न्याय देतील आणि आम्ही त्यांच्याकडून तीच अपेक्षा करतोय. जे आरोपी आहेत, त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा, अशी अपेक्षा संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.