Sambhajiraje Chhatrapati and Chhagan Bhujbal Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation: "मला माझ्याच वक्तव्याचा आता पश्चाताप होतोय!"; संभाजीराजे भुजबळांबाबत असं का म्हणाले ?

Sambhajiraje Chhatrapati On Chhagan Bhujbal: राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे.

Ganesh Thombare

Kolhapur News: राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला छगन भुजबळ यांनी विरोध दर्शविला आहे, तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केलेली आहे. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे.

राज्य सरकारने आश्वासन दिल्यानंतर जरांगे पाटलांनी आपले उपोषण काही दिवसांसाठी स्थगित केले. यानंतर जरांगे पाटील महाराष्ट्रभर दौरा करत आहेत, तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांचा जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये महाएल्गार मेळावा झाला. या वेळी मनोज जरांगे पाटलांवर मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर कोल्हापूरच्या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटलांनी भुजबळांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यातच संभाजीराजे छत्रपती यांनी मंत्री छगन भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली. "भुजबळ हे जातीय तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. दोन समाजांमध्ये नसलेली भांडणं लावण्याचे पाप ते करत आहेत, त्यामुळे भुजबळांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करण्यात यावी", असं ते म्हणाले. "सरकारमधील मंत्रीच अशी उघडपणे वेगळी भूमिका घेत जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारचीही हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे", असेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

याचवेळी संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्याला स्वत:च्याच एका वक्तव्याचा आता पश्चाताप होत असल्याचेही सांगितले. ते म्हणाले की, "काही दिवसांपूर्वी मी नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या घरी गेलो होतो, तेव्हा मी छगन भुजबळ हे शाहू महाराजांच्या विचारांचे वारस आहेत, असं म्हटलं होतं. पण मला आता माझ्या वक्तव्याचा पश्चाताप होत आहे", असे संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले.

जरांगेंचं कोल्हापूरच्या सभेत भुजबळांना जोरदार प्रत्युत्तर

मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी कोल्हापूरमध्ये सभा झाली. या वेळी जरांगे पाटील म्हणाले, "सर्वसामान्य मराठ्यांनी सगळे षडयंत्र मोडून काढले. गावागावांत मराठ्यांना आरक्षण होते. ते पुरावे सापडत आहेत. मराठ्यांना 70 वर्षांपूर्वी आरक्षण होतं, तर ते लपवून ठेवले कोणी ? याचा शोध घ्यावा लागेल. ज्यांनी पुरावे लपवले त्यांचा शोध घ्यावा लागेल. राज्य सरकारवर हे पुरावे लपवण्यामागे कोणाचा दबाव होता? याचा शोध घेतल्याशिवाय मराठा शांत बसणार नाही. त्याचवेळी आरक्षण दिले असते तर मराठा सर्वात प्रगत समाज झाला असता. पुरावे असताना पुरावे दाबून ठेवले, पण आता मराठ्यांना आरक्षण मिळणारचं", असे जरांगे पाटील म्हणाले.

"मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळणार, हे एकाला वाईट वाटतंय. पण मी मराठ्यांचा पट्टा आहे. व्यक्ती म्हणून विरोध नाही. त्यांच्या विचाराला विरोध आहेत. आजपर्यंत त्यांच्याबद्दल आदर होता. त्यांनी आज पातळी सोडली. तुम्ही तर आमची भाकर खाता. तुम्ही कुठे काय केले सगळं माझ्याकडे आहे. बाहेर काढायला लावू नका. आम्ही कष्टाने खातो, तुम्ही आमचं रक्त पिळून खाल्लं. म्हणून तुम्हाला बेसन भाकर खावी लागली, मराठ्यांचा तळतळाट तुम्हाला लागला आहे", अशा शब्दांत जरांगे पाटलांनी भुजबळांवर घणाघात केला.

"दहा पंधरा दिवस वातावरण शांत आहे, पण त्यांनी परत वातावरण बिघडवले. सरकारने त्यांच्यावर नियंत्रण आणावे, अन्यथा आम्हाला जसाश तसे उत्तर द्यावे लागेल. ते समाजात तेढ निर्माण करायचा प्रयत्न करताहेत. मंत्री हा कोणत्या एका समाजाचा नसतो, तो जनतेचा असतो. आम्हाला या राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. आमचे बोर्ड फाडायची भाषा करता तर तुमचेही बोर्ड लागणार आहेत. हे लक्षात ठेवावे. त्यांना रोखा, अन्यथा आम्ही उत्तर देऊ", असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT