- उमेश बांबरे
Satara News : पंत आले... त्यांनी पाहिलं... जिंकून घेतलं सारं... अन॒ ते माघारी फिरताच, छत्रपती उदयनराजे आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे यांच्यात झालेली दिलखुलास पण तितकीच महत्त्वपूर्ण भेट ही राजेगट प्रबळ करण्यासाठीची साखरपेरणी पंतांच्याच कानमंत्राने झाली नाही ना, अशी चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू झाली आहे. (Meeting of Udayan Raje and RamRaje, the raje group will be dominant in Satara)
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सातारा जिल्ह्यात हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीपेक्षा महायुतीतच राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा सातारा दौरा खासदार उदयनराजे भोसले व रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासाठी सकारात्मक ठरला आहे.
जुना संघर्ष विसरून खासदार उदयनराजे भोसले यांनी माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे सातारा लोकसभेसाठी इच्छुक असलेल्यांची गोची झाली आहे. पण, उदयनराजे, रामराजेंमधील दिलजमाई केवळ निवडणुकीपुरतीच राहणार की आगामी काळात राजेगट एकत्र येत सातारा जिल्ह्यावर पुन्हा आपली पकड घट्ट करणार, याची उत्सुकता लागली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सातारा जिल्ह्यात सर्वाधिक राजकीय संघर्ष सातारा व फलटणच्या राजघराण्यातच राहिला आहे. खासदार उदयनराजे भोसले व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील संघर्ष संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. फलटण विधानसभा मतदारसंघ २००९ मध्ये आरक्षित झाला. माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीची तयारी केली होती. त्यामुळे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सातारा लोकसभेसाठी तयारी करण्याचा निर्णय घेतला. पण, त्याच वेळी खासदार शरद पवार यांनी सातारचे उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीत घेऊन त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. येथून रामराजे व उदयनराजे यांच्यातील संघर्षास सुरुवात झाली. त्यानंतर दोघांमध्ये धुसफुस सुरू झाली.
फलटण, खंडाळा मतदारसंघात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे वर्चस्व असून खंडाळ्यातील औद्योगिक वसाहतीवरही प्रचंड प्रभाव आहे. अनेक उद्योग त्यांच्या माध्यमातूनच येथे आलेले आहेत. या ठिकाणी खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या कार्यकर्त्यांनी लक्ष घातले. त्यातून या परिसरातील रामराजेंचा वाढलेला प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न झाला. यातून उदयनराजे व त्यांच्या कार्यकर्त्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. काही कालावधीनंतर तो मागे घेतला गेला. पण, या प्रकारानंतर उदयनराजे व रामराजे यांच्यातील संघर्ष अधिक बळावला.
उदयनराजे सातत्याने आक्रमक भूमिका घेऊ लागले. यातूनच उदयनराजेंनी फलटणच्या शासकीय विश्रामगृहात जाऊन रामराजेंना आव्हान दिले होते. त्यानंतर जिल्हा बॅंकेच्या झालेल्या निवडणुकीवरून ही उदयनराजेंना संचालकपदाची जागा सोडण्यावरून संघर्ष झाला. पण, सर्वांनी एकमताने त्यांना बिनविरोध निवडून आणले. त्यानंतर हा संघर्ष कमी झाला.
आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून सातारा मतदारसंघातून खासदार उदयनराजे हे प्रमुख दावेदार आहेत. त्यांनी मध्यंतरी संसदेच्या अधिवेशनादरम्यान, दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शाह, तसेच केंद्रीयमंत्र्यांची भेट घेऊन विविध विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेपासून खासदार उदयनराजेंनी आपला आक्रमकपणा कमी करीत साखरपेरणी सुरू केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच कराड व फलटण दौरा झाला. या दौऱ्यात खासदार उदयनराजे पूर्णपणे फडणवीस यांच्यासमवेत होते. उलट कराडच्या कार्यक्रमात तर त्यांनी आम्हाला भाजपच्या टीमध्ये सामावून घ्या, असे सांगितले, तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना तुम्ही तर आमच्या टीमचे कॅप्टन असल्याचे सांगितले. त्यामुळे उदयनराजेंचा उत्साह आणखीच वाढला. फडणवीस यांच्यासमवेत फलटणच्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्यानंतर खासदार उदयनराजेंनी थेट लक्ष्मी-विलास पॅलेस या रामराजेंच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
या दोघा नेत्यांनी भेटीदरम्यान, एकमेकांना काही सल्लेही दिले. मागील काही वर्षांचा संघर्ष विसरून उदयनराजेंनी घेतलेली रामराजेंची ही भेट आगामी निवडणुकीसाठीची साखरपेरणी म्हणावी लागेल. पण, ही दिलखुलास पण तितकीच महत्त्वपूर्ण ठरलेली या दोन नेत्यांची भेट आगामी काळात जिल्ह्यात राजेगट प्रबळ होण्याची चिन्हे आहेत. पण हे सर्व घडण्यामागे पंतांचा कानमंत्रच कारणीभूत ठरला आहे, हेही तितकेच खरे आहे.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.