Shivendraraje Bhosale-Udayanraje Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Politic's : ताफा सोडून मंत्री शिवेंद्रसिंहराजे-उदयनराजेंची अज्ञातस्थळी खलबतं; साताऱ्यात इच्छुकांची वाढली धडधड

Nagar Parishad Election 2025 : सातारा नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार ठरविण्याबाबत उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची फार्महाऊसवर मॅरेथॉन बैठक झाली. मात्र यादी निघत नसल्याने इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरकारनामा ब्यूरो
  1. सातारा नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीवर खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्यात परळी खोऱ्यातील फार्महाऊसवर मॅरेथॉन बैठक झाली, पण अंतिम यादी अद्याप जाहीर झालेली नाही.

  2. दोन्ही नेत्यांनी प्रभागनिहाय उमेदवार, जागावाटप, स्थलांतर आणि नगराध्यक्षा पदाच्या दाव्यांवर विस्तृत चर्चा केली; परंतु काही मुद्द्यांवर तोडगा न निघाल्याने बैठक मुदतवाढीवर गेली.

  3. उमेदवारी प्रक्रियेत महायुतीचा समन्वय न पाळल्याचा आरोप शिवसेना (शिंदे गट) करत असून स्वतंत्र लढण्याचा विचार सुरू असल्याने युतीत मतभेद उघड झाले आहेत.

Satara, 15 November : सातारा नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार निश्‍चितीच्‍या अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍यात परळी खोऱ्यातील एका फार्म हाउसमध्‍ये मॅरेथॉन बैठक झाली. उमेदवार निश्चितीसह, जागा वाटपाचे सूत्र आणि नगराध्‍यक्षपदावरील दाव्‍यांच्‍या अनुषंगाने दोघांमध्ये बराच खल झाला. त्‍यानंतरही उमेदवारांच्‍या यादीची अद्याप प्रतीक्षाच असल्याने इच्छुक कार्यकर्ते बेचैन झाले आहेत. मंत्री शिवेंद्रसिंहराजे आणि उदयनराजे भोसले हे दोघेही आपला ताफा सोडून फार्म हाऊसवर पोचले होते.

नगर पालिकेच्‍या निवडणुका पक्षीय चिन्‍हावर लढविणार असल्‍याचे बांधकाममंत्री भोसले यांनी जाहीर केल्‍यानंतर त्‍याच अनुषंगाने मुलाखतींची प्रक्रिया झाली. या मुलाखतींना सातारा विकास आघाडीसह नगरविकास आघाडीतील आजी-माजी नगरसेवक, तसेच दोघांचे नेतृत्‍व मानणारे नवखे सामोरे गेले होते. मुलाखती झाल्‍यानंतर त्‍याचा गोषवारा शिवेंद्रसिंहराजे (Shivendrasinhraje) आणि भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला.

इच्‍छुकांची संख्‍या जास्‍त असल्‍याने यादीची छाननी करण्‍यासाठी मुदत पक्षीय स्तरावरून साताऱ्यातील (Satara) नेत्‍यांना देण्‍यात आली आहे, त्यानुसार यादीची छाननी करण्‍यात आली असून, त्‍याचा आढावा गुरुवारी रात्री दोन्‍ही नेत्‍यांनी घेतला. यानंतर दोघांमध्‍ये शुक्रवारी संयुक्‍त बैठक घेण्‍याचा निर्णय झाला.

परळी खोऱ्यातील एका फार्म हाउसवर दोघांच्‍या बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. या बैठकीसाठी उदयनराजे (Udayanraje) आणि शिवेंद्रसिंहराजे स्वतंत्रपणे दाखल झाले होते. याठिकाणी सुनील काटकर, ॲड. दत्ता बनकर, अविनाश कदम, अमोल मोहिते हे उपस्‍थित होते. सुरुवातीस दोन्‍ही नेत्‍यांमध्‍ये बैठक झाली.

बराच वेळ विविध प्रभाग, त्‍याठिकाणचे इच्‍छुक, कुणाला चाल द्यायची, कुणाला थांबवायचे, कुणाला कुठल्‍या प्रभागात स्‍थलांतरीत करायचे, तसेच थेट नगराध्‍यक्षपदाच्‍या उमेदवाराच्‍या मुद्द्यावरही चर्चा झाली. जागावाटप आणि मूळ भाजपच्‍या समायोजनाचा मुख्‍य मुद्दाही चर्चेच्‍या केंद्रस्‍थानी असल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.

नगराध्‍यक्षपदावर उदयनराजे यांच्‍यासह शिवेंद्रसिंहराजेंनी दावा केल्‍याने बैठक लांबल्‍याची माहिती समोर येत आहे. सुमारे तास दीड तास दोघांमध्‍ये चर्चा झाल्‍यानंतर त्‍यात त्‍याठिकाणी असणाऱ्या चौघांना सामावून घेण्‍यात आले. त्‍यांच्‍या उपस्‍थितीतही दोन्‍ही आघाड्यांच्‍या बलाबलाविषयीची चर्चा झाली. चर्चेतील अनेक मुद्द्यांवर सन्‍मानजनक तोडगा निघत नसल्‍याने सायंकाळच्‍या सुमारास बैठक आटोपती घेण्‍यात आली. बैठक आटोपती घेण्‍यापर्यंत झालेल्‍या चर्चेत काही जणांची उमेदवार निश्चिती झाल्‍याचे समजत आहे; परंतु त्‍यांच्‍या नावाची घोषणा अद्यापही प्रलंबित आहे.

ताफा सोडून दोन्ही राजे गेले कुठे?

बैठकीस जाताना शिवेंद्रसिंहराजे यांनी आपला शासकीय ताफा व बंदोबस्‍त सुरुची येथेच थांबवून ठेवला होता. त्‍यामुळे ते नेमके कोणाबरोबर, कोठे गेले आहेत, याची माहिती त्‍यांच्‍याशिवाय इतर कोणालाही नव्‍हती. थोड्या वेळाने उदयनराजे हे सुद्धा त्‍याच पद्धतीने जलमंदिर येथून बाहेर पडले. नंतर दोन्‍ही नेते उमेदवारी निश्‍चितीच्‍या बैठकीत असल्‍याचे साताऱ्यात समजल्‍याने राजकीय चर्चा पुन्‍हा एकदा वाढीस लागल्‍या.

शिवसेनेची वेगळ्या निर्णयाची तयारी

सातारा पालिकेत दोन्ही राजेंकडून जागावाटपाबाबत सुरू असलेल्या चर्चेत महायुतीचा धर्म पाळला जात नसल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. याबाबत जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला एकाही बैठकीला सन्मानाने बोलविण्यात आलेले नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांशी चर्चा करून शिंदेंची शिवसेना वेगळा निर्णय घेण्याची तयारी करत आहे. कदाचित स्वतंत्र लढण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो, असेही भोसले यांनी स्पष्ट केले.

1) उदयनराजे–शिवेंद्रसिंहराजे बैठक कुठे झाली?
परळी खोऱ्यातील एका फार्महाऊसवर गोपनीय मॅरेथॉन बैठक झाली.

2) बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली?
जागावाटप, प्रभागनिहाय उमेदवार, स्थलांतरण आणि नगराध्यक्षपदाच्या दाव्यांवर चर्चा झाली.

3) उमेदवारांची यादी का जाहीर झाली नाही?
काही मुद्द्यांवर दोन्ही बाजूंची एकमत नसल्यामुळे अंतिम निर्णय प्रलंबित आहे.

4) शिवसेनेची भूमिका काय आहे?
महायुतीत सन्मान न मिळाल्याचा आरोप करून शिवसेना स्वतंत्र लढण्याचा विचार करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT