Sharad Pawar-Baban Shinde-Ranjitshinh Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sharad Pawar Politic's : माढ्यात साधंसुधं पाडायचं नाही...एवढं जोरात पाडायचं की, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे; पवारांनी संदेश दिलाच...

Madha Assembly constituency : बबनदादा तिकिट मागण्यासाठी माझ्याकडं एकदा नव्हे; तर पाचदा आले. मी सांगितलं, बबनदादा जरा नव्या लोकांना संधी देण्याचा विचार करू. नव्या लोकांचा विचार करू म्हटल्यानंतर त्यांच्या डोक्यात एकच नवा होता, तो म्हणजे त्यांचा लेक. दुसरा काय कोणी त्यांना दिसतंच नव्हता.

Vijaykumar Dudhale

Solapur, 17 November : माढा तालुक्यात इतकी वर्षे साथ दिली म्हणतात, त्यांचं काय करायचं, असा सवाल उपस्थितांना करत पवार म्हणाले, जे कोणी असतील सख्खे भाऊ असतील अथवा आणखी कोणी असतील. एकदा रस्ता चुकला की गड्याला त्याची जागा दाखवलीच पाहिजे, त्याची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीत साधंसुधं पाडायचं नाही, जोरात पाडायचं, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे. सगळ्यांचा नाद करायचा....(गर्दीतून पवारसाहेबांचा नाद करायचा नाही, असा आवाज आला.) अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यात काय द्यायचा तो संदेश दिला.

महाविकास आघाडीचे माढ्यातील उमेदवार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांच्या प्रचाराची टेंभुर्णी येथे शरद पवार यांची जाहीर सभा झाली. त्या सभेत शरद पवारांनी साथ सोडणाऱ्या आमदार बबनराव शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली. या वेळी त्यांनी नाव न घेता शिंदे यांना पराभूत करा, असे आवाहन केले.

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, मला सोडून गेलेली ही मंडळी काही दिवसांनी पुन्हा माझ्याकडं यायला लागली. मी विचारलं, ‘काय झालं.’ नाही म्हणालं आमचं चुकलं. मी म्हटलं अनेक वर्षे आपले सहकारी आहेत, चुकलं असेल तर चुका पोटात घेऊ. त्यांना संधी देऊ. जे काही करता येईल ते करण्यासाठी मदत करू.

बबनदादा (Baban Shinde) तिकिट मागण्यासाठी माझ्याकडं एकदा नव्हे; तर पाचदा आले. मी सांगितलं, बबनदादा जरा नव्या लोकांना संधी देण्याचा विचार करू. नव्या लोकांचा विचार करू म्हटल्यानंतर त्यांच्या डोक्यात एकच नवा होता, तो म्हणजे त्यांचा लेक. दुसरा काय कोणी त्यांना दिसतंच नव्हतं. पुन्हा पुन्हा ते येत होते, तिकिटासाठी आग्रह करत होते. काही करून मला संधी द्या, अशी मागणी करत होते. मी एवढंचं म्हटलं, उद्या संकट आलं. ईडी, सीबीआयची नोटीस आली तर तुम्ही आहे तिथं राहणार की पुन्हा परत जाणार. त्यावर ते काही बोलले नाहीत. उठून गेले, असेही पवारांनी सांगितले.

पवार म्हणाले, काही दिवसांनंतर ते सांगायला लागले की मी चाळीस वर्षे शरद पवारांसोबत आहे. तुम्ही चाळीस वर्षे माझ्यासोबत आहात, याचा अर्थ चाळीस वर्षे मी तुम्हाला मदत केली. जी कामं सांगितलं, त्या कामाला मदत केली. सीना-माढा उपसा सिंचन योजनेला निधी देण्याचा रस्ता मी त्यांना दाखवला. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला मदत केली. ते जे प्रश्न सांगतील, त्यात मदत करण्याची भावना ठेवली.

माझी अपेक्षा अशी होती की, संकटाच्या काळात हे (शिंदे कुटुंबीय) कुटुंब आपल्याबरोबर राहील. पण, बघितलं प्रसंग आला आणि एक करमाळ्याला पळाला, दुसरा माढ्याला. मोठी गंमत आहे. काय कशाचे समजत नाही. परिस्थिती थोडीशी कमी जास्त झाली तर हे पठ्ठे गायब होतात, हे समजत नाही. संकटातही खंबीरपणे उभे राहणारे तुमच्या मतदारसंघातील उमेदवार अभिजीत पाटील यांना साथ द्यायची की आणखी कोणाचा विचार करायचा, हे आता ठरवण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही पवार यांनी केले.

त्याचा विसर मला पडणार नाही : शरद पवार

त्या वेळी बबनदादा माझ्यासोबत असतील. पण, त्यापेक्षा लोकसभा निवडणुकीला उभं राहिल्यानंतर माढा तालुक्यातील जनतेने मला भरभरून मतं दिली आणि विक्रमी मतदान तुम्ही केलं, त्याचा विसर मला कधी पडणार नाही. त्या भावनेने मी इथल्या कामात लक्ष घातलं, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT