Sharad Pawar Exclusive Saam TV Interview : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यासाठी राजकीय नेत्यांकडून विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. नुकतंच मनसेप्रमुखे राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर ते जातीयवादी राजकारण करतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून राज्यात जातीपातीचं राजकारण सुरू झाल्याचा आरोप केला होता.
विरोधकांच्या याच सर्व आरोपावर शरद पवारांनी रोखठोक उत्तर दिली आहेत. साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या आरोपांवर भाष्य केलं आहे. मुलाखतीत शरद पवार यांना 'तुम्ही लोकसभेला संविधान बचावचा नारा दिला, पण विरोधक राज ठाकरे (Raj Thackeray) किंवा छगन भुजबळ असा आरोप करतात की तुम्ही राज्यात जातीयवादाची प्रेरणा मोठ्या प्रमाणात दिली आणि त्यातून राजकारण केलं.
या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, "यावर उत्तर काय असणार पण ते काहीही बोलत असतील तर त्याची नोंद कशासाठी घ्यायची? माझ्या नेतृत्वाखाली जो पक्ष चालतो किंवा मी जे काही शासन चालवलं होतं. त्यावेळी मी घेतलेले निर्णय सांगतात आम्ही कोणाकोणाला प्रोत्साहन दिलं.
मला आठवतं त्यावेळी आमच्या पक्षात विधिमंडळामध्ये नेतृत्व करण्यासंबधी विचार करण्याची वेळ आली होती. तेव्हा मी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना नेता बनवलं, अशी 25 लोकांची यादी देता येईल. ज्यामध्ये दलित, आदिवासी, ओबीसी असे विविध जाती धर्माचे धर्माचे लोक होते. पण राज ठाकरे एखादं वाक्य उगीचंच अंदाजे ठोकून देतात, 10 वेळा एखादी गोष्ट बोलली की लोकांना वाटतं त्यात काहीतरी तथ्य आहे. बाकी यात काहीही तथ्य नाही"
तर यावेळी पवारांनी एका कार्यक्रमात पुणेरी पगडीऐवजी फुले टोपी वापरण्याचे आदेश दिले होते, याचा दाखला पवार जातीयवादी आहेत हे सांगण्यासाठी दिला जातो. यावर आपली काय प्रतिक्रिया काय? असं विचारलं असता शरद पवार म्हणाले, टीका करणाऱ्यांनी तो कार्यक्रम कोणता होता हे आधी बघायला पाहिजे होतं.
तो फुलेंचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यासाठी, त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी तिथे फुले टोपी घालण्याचं आवाहन केलं होतं. मला स्वत:ला त्या कार्यक्रमात फुलेंची टोपी घातली. महात्मा फुले यांच्या पूर्ण जीवनाचा अर्थच सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारा आहे. त्यामुळे मी त्यांचे विचार आचरणात आणायला सांगितले, त्यांचा पेहेराव करायला सांगितला म्हणजे मी जातीयवादी आहे का? या आरोपात काहीही तथ्य नाही. असं म्हणत पवारांनी विरोधकांचे जातीयवादाचे आरोप फेटाळून लावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.