Dhairyasheel Mohite Patil-Narayan Patil-Rashmi Bagal-Sanjay Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karmala Assembly Election : करमाळ्यात मोहिते पाटलांना लीड; आमदार संजय शिंदेंना धोक्याचा इशारा

Lok Sabha Election 2024 : करमाळ्यातून मोहिते पाटील यांच्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी एकाकी लढत दिला. त्यामुळे लोकसभेला मोहिते पाटलांना मिळालेले लीड आमदार संजय शिंदे यांच्यासाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे.

आण्णा काळे

Karmala, 05 June : आमदार संजय शिंदे, बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, तसेच, सत्ताधाऱ्यांचे भरभक्कम पाठबळ भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी असूनही माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत करमाळ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी ४१ हजार ५११ मतांचे लीड घेतले. करमाळ्यातून मोहिते पाटील यांच्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांनी एकाकी लढत दिला. त्यामुळे लोकसभेला मोहिते पाटलांना मिळालेले लीड आमदार संजय शिंदे यांच्यासाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. या मताधिक्क्यामागे अनेक कारणे असली तरी नेतेमंडळींना विचार करायला भाग पाडणारे आहे.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांच्या विजयात करमाळा विधानसभा मतदारसंघाचा मोठा वाटा आहे. करमाळ्यातील प्रस्थापित नेतेमंडळींना जनतेने झुगारत महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांना साथ दिली. मोहिते पाटील यांना मिळालेले मताधिक्क्य हे आगामी काळात करमाळा तालुक्याच्या (Karmala) बदलत्या राजकारणाची दिशा अधोरेखित करणारे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धैर्यशील मोहिते पाटील यांना करमाळ्यात ९७ हजार ४६९, तर निंबाळकरांना ५५ हजार ९५८ मते पडली आहेत. माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांनी एकट्याने किल्ला लढवत करमाळ्यातून ४१ हजार ५११ मतांचे लीड मोहिते पाटील यांना दिले आहे.

माजी आमदार नारायण पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश, मोहिते पाटलांचे करमाळ्यात असलेले थेट कनेक्शन, बागलांच्या मकाई कारखान्याला मदत करण्यास भाजपकडून झालेला उशीर आणि आमदार संजय शिंदेंच्या काही कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात केलेले मतदान यामुळे करमाळ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठे मताधिक्य मिळू शकले.

करमाळा विधानसभा मतदारसंघाला माढा तालुक्यातील जोडलेल्या 36 गावांत आमदार शिंदे याचा प्रभाव असूनही मोहिते पाटील यांना मताधिक्य मिळाले आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार नारायण पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, हा प्रवेश महत्त्वपूर्ण ठरला.

करमाळ्यात महाविकास आघाडीकडे एकही तगडा नेता नसताना माजी आमदार नारायण पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी अख्खा तालुका पिंजून काढला. त्यामुळेच मोहिते पाटील यांना मिळालेल्या मताधिक्यामध्ये नारायण पाटलांचा प्रवेश महत्त्वपूर्ण ठरला आहे. प्रस्थापित नेतेमंडळींना झुगारून करमाळ्यातील जनतेने महाविकास आघाडीला मतदान केल्याचे स्पष्ट दिसत आहे. राष्ट्रवादीच्या फुटीमुळे शरद पवारांबद्दल असलेली सहानुभूती आणि मराठा आरक्षण, जरांगे फॅक्टर हे मुद्दे महत्त्वाचे ठरले आहे.

लोकसभा मतदानाच्या काही दिवस अगोदर बागल यांच्या मकाई सहकारी साखर कारखान्याला भाजपकडून झाली. त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले. मात्र, त्यांचा फारसा फायदा झाला नसल्याचे मतदानातून दिसून येते. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी 2019 नंतर करमाळा तालुक्यात स्वतःची यंत्रणा तयार करण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, येथील नेतेमंडळींना ते रुचले नाही, त्याचाही रोष या वेळी निघाला.

भाजपचे फोडाफोडीचे राजकारण, शेतीमालाला भाव नसणे, मराठा आरक्षण हेही मुद्दे प्रभावी ठरले. उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात खाली पाणी सोडण्यात आले, त्यामुळे उजनी बॅक वॉटरच्या भागातील शेतकऱ्यांमध्ये सत्ताधारी आमदार, खासदारांविरोधात प्रचंड रोष होता, तो देखील यातून बाहेर पडला. भाजपकडून नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवण्यावर भर देण्यात आला. त्याला येथील मतदार मात्र बळी पडला नाही.

माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी भाजपच्या एका सभेला हजेरी लावली. त्यानंतर मात्र ते भाजपच्या प्रचारात कोठेही दिसले नाहीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रचार केला. कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध करण्यात मोहिते पाटलांनी घेतलेला पुढाकार याची जाणीव ठेवून लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटलांना जयवंतराव जगताप यांनी सहकार्य केल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT