Sharad Pawar : एनडीएचा डोळा असलेल्या दोन ‘बाबूं’ना शरद पवार वळवणार ‘इंडिया’ आघाडीकडे?

India Aghadi : दिल्लीच्या राजकीय वर्तुळात शरद पवार यांचा दबदबा आहे. इंडिया आघाडीच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी नितीशबाबू आणि चंद्राबाबू यांना ते एकत्र आणणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
Chandrababu Naidu-Nitish Kumar-Sharad Pawar
Chandrababu Naidu-Nitish Kumar-Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीचा सोहळा एकदाचा संपलेला आहे. आता सत्ता स्थापनेसाठी एनडीएसह इंडिया आघाडीनेही हालचाली सुरू केलेल्या आहेत. इंडिया आघाडीची सत्ता स्थापन व्हावी, यासाठी दोन 'बाबूं'ना एकत्र आणण्यात यश मिळणार का, अशी चर्चा दिल्लीत सुरू झाली. काही महिन्यांपूर्वी राजकीयदृष्ट्या विभक्त झालेल्या एक 'चच्चा' आणि पुतण्यामध्ये जवळीक निर्माण होत असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे या चर्चेला बळ मिळू लागले आहे.

नितीशकुमार (Nitishkumar) यांना नितीशबाबू असेही म्हटले जाते. लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये त्यांच्या पक्षाने मोठे यश मिळवले आहे. दुसरे बाबू म्हणजे चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu). आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. लोकसभा निवडणुकीतही त्यांच्या पक्षाने बाजी मारली आहे. नितीशबाबू आणि चंद्राबाबू हे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसोबत आहेत.

दिल्लीतील राजकीय वर्तुळात शरद पवार (Sharad Pawar) यांचा दबदबा आहे. शरद पवार यांची देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये उठ-बस आहे. अनेक दिग्गज नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. महाराष्ट्रात त्यांच्या डावपेचांमुळे महायुतीची धूळदाण झाली आहे. गेल्या निवडणुकीत 23 जागा जिंकलेल्या भाजपला एक आकडीच जागा जिंकता आल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नितीशकुमार हे सतत पलटी मारत असतात. बिहारमध्ये ते राष्ट्रीय जनता दलासोबत सत्तेत होते. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी पुन्हा पलटी मारली आणि भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. यावर सातत्याने टीका होत असली तरी त्यांच्या पक्षाने बिहारमध्ये मिळवलेले यश नेत्रदीपक आहे. त्यांचे सतत पलटी मारणे लोकांना आवडणार नाही, असे सांगितले जात होते, मात्र ते खोटे ठरले आहे.

नितीशकुमार लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपसोबत का गेले, याबाबत त्यावेळीही चर्चा झाली होती. त्यांची कुठली तरी फाइल भाजपच्या, म्हणजे ईडीच्या हाती लागली आहे, असे सांगितले जात होते. त्यामुळे ते हतबल झाले होते. आता या हतबलतेतून कायमची सुटका करून घेण्याची संधी त्यांच्याकडे चालून आली आहे.

Chandrababu Naidu-Nitish Kumar-Sharad Pawar
Solapur First Women MP : आईची संधी थोडक्यात हुकली...पण लेकीने इतिहास घडविला; प्रणिती शिंदे बनल्या पहिल्या महिला खासदार!

चंद्राबाबू नायडू यांनाही मध्यंतरी एका कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणात कारागृहात जावे लागले होते. 74 वर्षीय चंद्राबाबूंना 52 दिवस कारागृहात राहावे लागले होते. 2019 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्या पक्षाची घसरण झाली. त्यांनी या निवडणुकीत केलेले पुनरागमन आश्चर्यकारक आहे. त्यांच्या पक्षाने लोकसभेच्या 16 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे ‘एनडीए’मध्ये त्यांनाही मोठे महत्व प्राप्त झाले आहे. चंद्राबाबू यांच्याशीही शरद पवार यांचे संबंध चांगले आहेत. इंडिया आघाडीच्या सत्तास्थापनेचा मेळ घालण्यासाठी शरद पवार आणि राहुल गांधी हे चंद्राबाबूंच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी यांच्याशी शरद पवार यांची मैत्री आहे. पडद्यामागे हालचाली सुरू आहेत. नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांनी एकाच विमानातून दिल्ली प्रवास केल्याचे सांगितले जात आत आहे. आज दिल्लीत एनडीएच्या घटक पक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे. सायंकाळी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचीही बैठक आहे.

भाजपचा नेतानिवडीसाठी या वेळी प्रत्येक खासदाराशी वैयक्तिक बोलून त्यांचे मत जाणून घेतले जाणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. भाजपला या निवडणुकीत चमकदार कामगिरीची पुनरावृत्ती करता आलेली नाही. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आदी राज्यांत भाजपची पीछेहाट झाली आहे. त्यामुळे नेतनिवडीच्या वेळी काहीतरी अनपेक्षित होईल, अशी अपेक्षा इंडिया आघाडीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे शरद पवार हे नितीशबाबू आणि चंद्राबाबू यांचे मन वळवण्यात यशस्वी होतील का, अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे.

Chandrababu Naidu-Nitish Kumar-Sharad Pawar
Nitish Kumar and Tejashwi Yadav On Same Flight : नितीश कुमार अन् तेजस्वी यादव करणार खेळ? दिल्लीचं राजकारण हादरणार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com