Solapur, 04 August : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची नियुक्ती होताच त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी माजी आमदार राजन पाटील यांनी सावधपणे पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथील विविध विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राजन पाटील गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना निमंत्रित केले आहे. राष्ट्रवादीला कायम हक्काचा आमदार देऊनही पक्षाकडून विरोधकांना ताकद दिली जात असल्याने राजन पाटील गटाने आता कल्याणशेट्टींना तालुक्यातून बोलावून सूचक संदेश दिल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Pail) हे आतापर्यंत पक्षासोबत कायम राहिले आहेत. पक्षफुटीनंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पाटील यांनी २०२४ चा अपवाद वगळता पक्षाला कायम एक आमदार दिलेला आहे. मात्र, पक्षाकडून त्यांचा तेवढा सन्मान झाला नसल्याची खंत त्यांचे समर्थक बोलून दाखवतात. मोहोळमधून अगदी मोदी लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून देण्याचे काम पाटील यांनी केले. त्यांना विधान परिषद मिळेल, अशी अपेक्षा त्याच्या पाठीराख्यांना होती. मात्र, पक्षाकडून ती पूर्ण होऊ शकलेली नाही.
विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेणारे उमेश पाटील (Umesh Patil) यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती होताच राजन पाटील यांनी त्यावर आतापर्यंत मौन बाळगले आहे. पाटील गट नाराज आहे, मात्र, ती नाराजी ते बोलून दाखवत नाहीत. जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती होताच उमेश पाटील यांना सोलापूर शहरात लक्ष घालायला सुरुवात केली. मात्र, त्यानंतर सोलापूरमध्ये जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या दौऱ्यावेळी माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने आणि त्यांच्या समर्थकांनी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला हजेरी लावली. मात्र, जिल्ह्याच्या (ग्रामीण) मेळाव्याला हजेरी लावणे टाळले. त्याच मेळाव्यात शहराध्यक्ष संतोष पवार यांनी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे शहराच्या आमच्या कामात ढवळाढवळ करत आहेत, असे जाहीपणे सांगितले.
त्याची दखल घेतली असल्याचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी त्याच स्टेजवरून जाहीररित्या सांगितले. तत्पूर्वी राजन पाटील आणि बाळराजे पाटील यांच्याशी संतोष पवारांची जवळीक वाढली होती. त्यामुळे शहराच्या माध्यमातून राजन पाटील यांनी मोठा डाव टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
दरम्यान, येत्या शुक्रवारी (ता. ०८ ऑगस्ट) सावळेश्वर येथे राजन पाटील गटाच्या वतीने विविध विकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, त्या कार्यक्रमाला भाजपचे आमदार आणि फडणवीसांचे निकटवर्तीय सचिन कल्याणशेट्टी यांना निमंत्रित केले आहे. थेट फडणवीसांच्या ‘गुडबूक’मधील आमदाराला कार्यक्रमाला बोलावून राजन पाटील यांनी पक्षाला आणि पक्षश्रेष्ठींना सूचक संदेश दिल्याचे मानले जात आहे.
दुसरीकडे, भाजपने २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची तयारी चालवल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे मोहोळ मतदारसंघावर वर्चस्व राखून असलेले राजन पाटील भाजपसोबत आले तर पक्षासाठी ती मोठी गोष्ट ठरणार आहे. त्यामुळे भाजपकडून राजन पाटलांसाठी पायघड्या घातल्या जाऊ शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन कल्याणशेट्टी यांना त्यासाठी फ्री हॅंड दिल्याचे सांगितले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.