
Mumbai, 03 August : महायुती सरकारमधील मंत्र्यांवर कोणाचा वचक आहे की नाही, असा प्रश्न पडावा, अशी सध्याची परिस्थिती आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी दिल्यानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अकोल्यातील कार्यक्रमात ‘किती मागा, आपल्या बापाचं काय जातं,’ असं वादग्रस्त विधान पुन्हा केले आहे. दुसरीकडे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला उद्देशून ‘कानाखाली वाजवीन’ अशी धमकी दिली आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्याबरोबरच फडणवीसांना टोले लगावले आहेत.
महायुती सरकार (Mahayuti Government) सत्तेवर आल्यापासून आपल्याच मंत्र्यांच्या बेताल विधानामुळे बॅकफूटवर जात आहे. शेतकऱ्यांना भिकारी म्हणून तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वाद ओढवून घेतला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना कोकाटे यांनी शेतकरी नव्हे तर सरकार भिकारी आहे, असे विधान केले होते. तसेच विधानसभेत रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटेंकडील खाते काढून ते दत्तात्रेय भरणेंकडे दिले आहे.
त्याचवेळी विधान परिषदेत शंभूराज देसाई आणि आमदार अनिल परब यांच्यात हमारीतुमरी झाली होती. भरसभागृहात या दोन नेत्यांमध्ये जुंपली होती. शंभूराज यांनी गद्दार कोणाला म्हणतोस, बाहेर ये तुला दाखवतो, असे म्हटले होते. त्यामुळे मंत्र्यांच्या बेताल विधानांनी सरकारवर अनेकदा नामुष्की ओढवली जात होती.
मागील आठवड्यात खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्र्यांची बेताल विधाने खपवून घेणार नाही, असे म्हटले होते. सर्व मंत्र्यांना त्यांनी तंबी दिली होती. त्याला पाच दिवस उलटत नाही तोच मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाले आहेत. यात मागील काही दिवसांपासून पैशांच्या बॅगेसहीत व्हायरल झालेले संजय शिरसाट यांनीच पुन्हा वादग्रस्त विधान केल आहे.
अकोला येथील कार्यक्रमात बोलताना संजय शिरसाट यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले, प्रत्येक आमदाराला मी विनंती करतोय, तुम्ही माझ्याकडे या. पाच कोटींचं आश्वासन असेल, दहा कोटींच असेल किंवा १५ कोटींचं असेल, मागा. नाही दिलं तर नावाचा संजय शिरसाट नाही. आपल्या बापाचं चाललंय का? सरकारचा पैसा वापराचाय, एवढी अक्कल आपण ठेवायची? असं विधान त्यांनी केलं आहे.
हेच संजय शिरसाट अनेकदा आपल्या वाणीमुळे अडचणीत सापडले आहेत. पण प्रत्येक वेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांना सौम्य भाषेत समज दिली आहे. पण संजय शिरसाटांची गाडी काही पठरीवरून खाली उतरण्याचे सोडत नाही. याच संजय शिरसाट यांना माजी मंत्री रामदास कदम यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. सरकारमध्ये आपण आहोत आणि आपणच सरकार आहोत, आपल्या बापाचं काय जातं, असं म्हणता येणार नाही. सरकारचा एकेक पैसा कामी लागला पाहिजे. योग्य कामासाठी लागला पाहिजे, शिरसाट यांनी आपली भूमिका बदलली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, सरकारचा पैसा म्हणजे लुटायचा पैसा आहे. आपलं काय जातं, आपल्या बापाचं काय जातं, ही संजय शिरसाटांची भावना आहे. एका एका माणसाच्या टॅक्समधून हे राज्य बनत असतं. म्हणून आपल्या बापाचं काय जातं. अरे पण जनतेच्या बापाचं जातं ना. असे जे शब्द आहेत, ते म्हणजे जनतेला लुटा आणि अशा पद्धतीने वाटा, ही त्यांची मानसिकता दिसते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाटांचा समाचार घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सुनावले आहे. त्या म्हणाल्या, आरोपांच्या चक्रव्यूहातून सुटण्यासाठी हॉटेल विट्सच्या लिलावातून संजय शिरसाट यांनी माघार घेतली. आरोपांच्या भडीमारानंतर योगेश कदमांकडून सावली बारचा ऑर्केस्ट्रा परवाना परत केला गेला. याचा अर्थ दोन्ही मंत्र्यांनी आरोप मान्य केले. तरीही फडणवीस कारवाई करत नाहीत, हे लांच्छनास्पद आहे.
निव्वळ पाच वर्षांत २५ पट संपत्ती. वादग्रस्त ठरल्यानंतर विट्स हॉटेलच्या लिलावातून माघार. भल्या मोठ्या रोकड रकमेसह स्वतःच्याच बेडरूममधले व्हिडिओ व्हायरल झाले. आपल्या बापाचा माल थोडीच आहे सरकारचा पैसा आहे लुटा..हा बेतालपणा. फडणवीसजी, वाह्यात शिरसाट यांचा राजीनामा कधी होणार? असा सवाल अंधारे यांनी विचारला आहे.
हेडमास्तर नुसतीच गुळगुळीत समज देण्यामध्ये व्यस्त आहेत. वेळीच कान पिळले असते, तर विद्यार्थी इतका बेताल झाला नसता. अशा वाह्यात आणि उनाड विद्यार्थ्याला रिस्टीकेट का केला जात नाही. हेडमास्तरला शाळा बंद पडण्याची भीती वाटते का? की विद्यार्थीच हेडमास्तरला ब्लॅकमेल करतोय? असा सवाल अंधारे यांनी फडणवीसांना विचारला आहे.
मेघना बोर्डीकरांचीही ग्रामसेवकाला धमकी
दरम्यान, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना ग्रामसेवकाला कानाखाली वाजवण्याची धमकी दिली आहे. त्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे बोर्डीकर यांनी त्याचे समर्थन करताना ज्याला ज्या भाषेत समजेल, त्याच भाषेत सांगितले, असे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.