Solapur, 01 September : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जवळीक वाढताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांना कर्णानंतर दुसरा दानूशर असे संबोधून कौतुक करणारे आमदार जानकर यांनी रविवारी (ता. 31 ऑगस्ट) दरेगावी जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. दोघांची बंद खोलीत तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे, या भेटीची दोघांकडून कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती. मात्र, या गोपनीय भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
उत्तम जानकर (Uttam Jankar) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर माळशिरस मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत. निवडणुकीनंतर सोलापूर जिल्ह्यातील पक्षाच्या चार आमदारांनी जयंत पाटील यांच्या माध्यमातून शरद पवार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सत्तेत जाण्याची विनंती केली होती. त्याबाबत आमदार जानकार यांनीच माहिती दिली होती.
विकास कामांसाठी निधी आणि नीरा डावा कालव्याच्या आवर्तनावरून उत्तम जानकर यांची सुरुवातीच्या काळात अजितदादा पवार यांच्यासोबत जवळीक निर्माण झाली होती. मात्र, ह्याच जानकर यांनी ‘यू टर्न’ घेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत नाते जोडल्याचे दिसून येत आहे. आषाढी एकादशीनंतर पंढरपूरच्या दौऱ्यावर आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी पवारांच्या पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी हजेरी लावली होती. त्या भेटीचीही मोठी चर्चा रंगली होती.
त्या भेटीनंतर काही दिवसांनी शिवसेनेचे दोन मंत्री भरत गोगावले आणि संजय शिरसाट हे माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या दौऱ्यात होलार समाजाच्या मेळाव्यात बोलताना उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले होते. तसेच, कर्णानंतर दुसरा दानशूर म्हणूनही एकनाथ शिंदे यांची स्तुती केली होती. त्या कौतुकामुळे जानकर यांची शिंदेंच्या शिवसेनेसाबत वाढलेल्या जवळकीतेबाबत चर्चा सुरू झाली होती.
मागील काही घडामोडी पाहता उत्तम जानकर हे एकनाथ शिंदे यांच्या जवळ गेल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यातच सातारा जिल्ह्यातील मूळगाव असलेल्या दरे येथे आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उत्तम जानकर यांची भेट घेतली आहे. त्या भेटीची जानकर आणि शिंदे यांच्याकडूनही कमालीची गुप्तता पाळल्याचे दिसून आले.
उत्तम जानकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या दरेगावातील गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंद खोली सुमारे एक तासभर चर्चा केल्याची माहिती आहे. या चर्चेची अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, जानकर यांची शिवसेनेसोबत वाढलेली जवळीकतेची मात्र राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
एरवी माध्यमांशी दिलखुलासपणे संवाद साधणारे उत्तम जानकर यांनी या वेळी माध्यमांना टाळले. पत्रकार बाहेर जानकर यांची वाट पाहत थांबलेले असताना माध्यमांशी न बोलता जानकर यांनी त्यांना टाळत निघून जाणे पसंत केले. त्यामुळे बंद खोलीत झालेल्या चर्चेबाबतची उत्सुकता वाढली आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.