Shambhuraj Desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP : सातारा झेडपीतील सत्तेबाबत शंभूराज देसाईंचं मोठं विधान; ‘आम्ही भाजपची वाट पाहतोय, पण आमच्याकडेही दोन सदस्य...’

Zilla Parishad Power : सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेला विलंब होत असून भाजपकडून प्रस्ताव नसल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले. राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीला बहुमत असून राजकीय वाद तीव्र झाले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 14 February : सातारा जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर होऊन आज (ता. १४ फेब्रुवारी) चार दिवस उलटून गेले तरी सत्ता स्थापनेबाबत कोणत्याही हालचाली होताना दिसून येत नाहीत. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीकडे बहुमत असून महायुतीमधील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे पालकमंत्री तथा शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी सांगितले. देसाई यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर निशाणा साधताना भाजपच्या कृतीत आणि बोलण्यात फरक असल्याचे स्पष्ट केले.

सातारा (Satara) जिल्हा परिषदेच्या ६५ जागांपैकी २७ जागा ह्या भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने २० तर शिवसेनेने १५ जागा जिंकल्या आहेत, विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीने निवडणुकीपूर्वी आघाडी केली होती. त्यात आघाडीला पूर्ण बहुमत मिळाल्याचे दिसून येते. मात्र, निकालानंतर महायुतीमधील मोठा भाऊ यानुसार आम्ही भाजपच्या संदेशाची वाट पाहत आहोत, असे संकेत शंभूराज देसाई यांनी दिले आहेत.

निवडणुकीपूर्वी आम्ही दोन वेळा भाजपला चर्चेसाठी बोलावले होते, पण त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. निवडणूक झाली, निकाल लागले, भाजपकडून कोणताही अपेक्षित प्रस्ताव आलेला नाही. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रच असल्याचा दावाही शंभूराज देसाई ( Shambhuraj Desai) यांनी केला आहे.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी (ता. १४ फेब्रुवारी) सातारा येथे पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हा परिषद सत्तेबाबत भाष्य केले. शिवसेनेच्या उमेदवारांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत काय संघर्ष केला आहे, हे त्यांना आणि आम्हाला माहिती आहे. त्यांच्या भावना आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालणार आहोत, ते सत्ता स्थापनेची भूमिका मांडतील, त्यानुसार साताऱ्यात घडेल, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांच्‍या समवेत माझी बैठक झाली आहे. त्‍यात लपवण्‍यासारखे काही नव्‍हते. जे आहे ते खुले आहे. निवडणूकीपूर्वीही आम्‍ही एकत्र होतो आणि आत्ताही एकत्र आहोत. दररोज आम्ही एकमेकांच्‍या संपर्कात असून जो निर्णय घ्‍यायचा तो दोघांनी एकत्र बसूनच, असे आम्‍ही ठरवले आहे.

जिल्‍हा परिषद सत्ता स्‍थापनेबाबत अद्यापही कोणतीही ठोस भूमिका आम्‍ही घेतलेली नाही. जिल्ह्यात भाजपचे दोन मंत्री आहेत. पण त्यांच्याकडून सत्ता स्थापनेबाबत अजूनही कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे शंभूराज देसाई यांनी केला आहे.

निवडणुकीत बोलल्यामुळे गोरे दमले असतील

ग्रामसविकास मंत्री जयकुमार गोरे हे निकालानंतर काहीही बोलले नाहीत. सत्ता स्थापनेबाबत त्यांनाच विचारावे. कदाचित निवडणुकीदरम्यान ते जास्त बोलले असल्यामुळे दमले असतील, त्यामुळे सध्या ते कोणतेही वक्तव्य करत नसावेत, अशा टोला शंभूराज देसाई यांनी गोरेंना लगावला. ते सांगताना जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आमच्याकडे दोन महिला उमेदवार असल्याचेही त्यांनी सष्ट केले.

...तर मीही मिठी मारली असती

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी मी शंभूराज देसाई यांना मिठी मारायलाही तयार आहे, असे विधान केले होते. त्यावर शंभूराज देसाई म्‍हणाले, शिवेंद्रराजे नुसते म्‍हणाले, त्‍यांनी मिठी मारली असती तर मीही मारली असती. बोलणं आणि कृतीत फरक असतो, असे म्‍हणत त्‍यांनी राजेंवरही निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT