Satara News : साताऱ्यातील कऱ्हाडमधील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. यावेळी बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी पी. डी. पाटील पॅनेलने विरोधकांचा धुव्वा उडवत सहाव्यांदा कारखाना आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. सत्ताधारी पॅनेलने विरोधकांचा 21 विरूद्ध 21 असा धुरळा उडवला. यामुळे विरोधकांना शुन्य जागा मिळाल्या आहेत.
यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पी. डी. पाटील पॅनेलने अखेर सहाव्यांदा वर्चस्व राखलं आहे. विरोधकांचा धुव्वा उडवत 21 च्या 21 जागा आपल्याकडे राखल्या आहेत. यामुळे सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर पुन्हा एकदा बाळासाहेब पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले असून ‘विश्वास जुना, बाळासाहेबच पुन्हा’हे वाक्य पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्यांदाच तिरंगी लढत निर्माण झाली होती. मोठा राजकीय संघर्ष आणि आरोप- प्रत्यारोपांमुळे या निवडणुकीकडे चुरस निर्माण झाली होती. तर साताऱ्यासह राज्याचे लक्ष लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. यावेळी कारखान्यासाठी चुरशीने 81.7 टक्के मतदान झाले. मतदानाची टक्केवारी वाढल्याने सत्तांतर होईल, असा विरोधकांचा कयास होता. मात्र निकालात चित्र विरोधकांच्या अपेक्षा भंग करणारा समोर आले आहे. रविवारी (ता.6) प्रत्यक्ष मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीअखेर सुमारे आठ हजारांवर मताधिक्याने पॅनेल विजयी झाले. विजयानंतर पॅनेलच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीत आनंदोत्सव साजरा केला.
सह्याद्री कारखान्यासाठी तब्बल 25 वर्षांनंतर तिरंगी लढत झाली. यावेळची निवडणूक कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे पी. डी. पाटील पॅनेल, आमदार मनोज घोरपडे आणि ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनेल आणि काँगसचे निवास थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांच्या यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी परिवर्तन पॅनेल मैदानात उतरले होते. तर नऊ अपक्षांनीही आपले नशीब आजमावले होते. पण मतदारांनी बाळासाहेब पाटील यांच्या पी. डी. पाटील पॅनेलच्या गळ्यात विजयाची माळ टाकली आहे.
या पार पडलेल्या मतदानात पाच तालुक्यांतील 68 गावांतील 99 मतदान केंद्रांवर 26 हजार 81 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर 32 हजार 205 मतदारांची नोंद झाली होती. येथील वखार महामंडळाच्या गोदामात निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक यांच्या उपस्थितीत सकाळी आठच्या सुमारास मतमोजणी सुरू झाली. त्यात पहिल्यांदा एक ते 50 मतदान केंद्रांच्या मतांची मोजणी झाली. पहिल्यांदा सर्व गटांच्या मतपत्रिका वेगळ्या करून त्यांचे गठ्ठे करण्यात आले. पहिल्या फेरीतील पहिल्या गटापासून ते शेवटच्या फेरीतपर्यंत पाटील यांच्या पी. डी. पाटील पॅनेलच्या उमेदवारांना मताधिक्य मिळाले होते. शेवटी आठ हजारांचा मताधिक्याने पॅनेल विजयी झाले आहे.
विरोधी पॅनेलकडून पाटील यांच्या कारखान्यातील कारभारावर प्रचारादरम्यान अनेक आरोप करण्यात आले होते. यात कर्ज, विस्तारवाढीतील विलंब, खर्च, धनगरवाडी- हणबरवाडी योजनेचे पाणीवरून तोफ डागण्यात आल्या होत्या. मात्र पाटील यांनी या आरोपांना संयमाने उत्तर दिले. त्यांनी, वस्तुस्थिती मतदारांपुढे मांडली. त्यांच्या या संयमाला मतदारांनी मताद्वारे प्रोत्साहन दिले आहे.
पहिल्या फेरीत विरोधी पॅनेलमध्ये आमदार घोरपडे, ॲड. उंडाळकर यांच्या पॅनेलला दुसऱ्या क्रमांकाची, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ व काँग्रेसचे निवास थोरात यांच्या पॅनेलला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. दरम्यान मतमोजणी केंद्राच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त तैनात होता.
यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पी. डी. पाटील पॅनेलने अखेर सहाव्यांदा विजयी झाले आहे. यावरून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी, हा विजय ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराच्या पी. डी. पाटील पॅनेल तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा आहे. मतदारांनी या विचारांना मतदान केलं आहे. कारखान्याचे सभासद आणि शेतकऱ्यांनी मतदानातून आमच्यावर विश्वास दाखवला. समोरून पातळी सोडून आमच्यावर आरोप होत होते. मात्र, (कै.) यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आमच्यावर असून आम्ही संयम राखला. याचे फलित विजयश्रीतून आम्हाला मिळाल्याचे बाळासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.