Subhash Deshmukh -Sachin Kalyanshetti  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP MLA : टोकाचा संघर्ष झालेल्या भाजपच्या दोन आमदारांमध्ये अखेर सत्तेचा तह; सभापतिपदासाठी अडीच वर्षांचा फार्म्युला

Subhash Deshmukh Vs Sachin Kalyanshetti : सोलापूर पंचायत समिती सभापती निवडणुकीत सुभाष देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी गटात सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरला. पहिली अडीच वर्षे देशमुख समर्थक, पुढील कालावधीत कल्याणशेट्टी गटाला सभापतिपद मिळणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 14 March (आप्पासाहेब हत्ताळे) : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून भाजपचे माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी या दोघांमध्ये वाद सुरू झाला होता. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तो वाढत गेला. मात्र, पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत आमदार कल्याणशेट्टी आणि देशमुख यांच्यात सत्तावाटपाचा तह झाल्याची माहिती आहे. दोन पाऊले मागे सरत आमदार कल्याणशेट्टी यांनी आमदार देशमुख समर्थकांस पहिल्यांदा सभापतिपद दिले असून पुढील अडीच वर्षांत कल्याणशेट्टी गटाला हे पद देण्याचा फार्म्युला ठरला आहे. यामध्ये जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या (South Solapur Panchayat Samiti) एकूण १२ पैकी ११ जागा भारतीय जनता पक्षाने, तर एक जागा शिवसेनेने जिंकली आहे. भाजपच्या अकरा जागांमध्ये आमदार देशमुख गटाचे पाच, तर आमदार कल्याणशेट्टी गटाचे सहा सदस्य होते. त्यामुळे दक्षिणच्या सभापती-उपसभापती निवडीवरून दोन्ही आमदारांमध्ये पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त होत होती.

सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत तत्कालीन काँग्रेस नेते माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्याशी युती करण्यास आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी विरोध दर्शविला होता.तेव्हापासून आमदार देशमुख हे कल्याणशेट्टी आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर चिडून होते. तेव्हापासून कल्याणशेट्टी आणि देशमुख यांच्यात वाद होता.

माजी आमदार दिलीप मानेंच्या भाजप (BJP) प्रवेशालाही त्यांचा विरोध होता. मात्र, त्यांचा विरोध डावलून मानेंना भाजपत प्रवेश दिला होता. महापालिका निवडणुकीत या दोन नेत्यांमधील विसंवाद टोकला पोचला होता. त्यामुळे दक्षिणचा सभापती ठरवताना पुन्हा दोघांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, सभापती आणि उपसभापतीची निवड समन्वयाने करत संघर्षाची शक्यता दूर केली.

आमदार कल्याणशेट्टी गटाने सभापतिपदासाठी मळसिद्ध मुगळे यांचे नाव पुढे केले होते. माजी आमदार दिलीप माने, प्रांतिक सदस्य शहाजी पवार या पक्षांतर्गत देशमुख विरोधकांनीही मुगळे यांच्यासाठी आग्रह धरला होता. मात्र, ‘दक्षिण’मधील सदस्यांनी त्याला विरोध केल्याने एकमत होत नव्हते.

जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या मध्यस्थीनंतर सभापती निवडीचे अधिकार आमदार कल्याणशेट्टी यांना देण्यात आले. आमदार कल्याणशेट्टी यांनी समन्वयाची भूमिका घेत आमदार देशमुख यांच्या पसंतीच्या सदस्याला संधी देण्याचा निरोप मनीष देशमुख यांना कळविण्यात आली.

देशमुख गटाकडे सुरुवातीची अडीच वर्षे सभापतिपद, पुढील अडीच वर्षासाठी आमदार कल्याणशेट्टी गटाला सभापतिपद देण्याची तयारी आमदार देशमुख गटाने दर्शवली. त्यामुळे मळसिद्ध मुगळेंऐवजी देशमुख गटाचे संदीप टेळे यांना सभापतिपदाची संधी देण्यात आली. उपसभापतिपदी कल्याणशेट्टी गटाच्या वर्षा पटणे यांची वर्णी लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT