

Patan, 14 March : विधानसभा निवडणुकीपासून सुरू असलेल्या मंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाच्या विजयी घौडदौडीला भाजप नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या गटाने प्रथमच ब्रेक लावला आहे. विधानसभा, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत देसाई गटाची सरशी झाली होती. मात्र, पाटण तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मालदन सोसायटीच्या निवडणुकीत पाटणकरांनी देसाई गटाच्या वारूला अखेर लगाम लावला आहे.
विधानसभा निवडणुकीत शंभूराज देसाई यांनी आपले पारंपारिक प्रतिस्पर्धी सत्यजित पाटणकर (Satyajeet Patankar) यांचा पराभव केला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही देसाई गटाने बहुतांश जागांवर विजय मिळविला होता. त्यामुळे विधानसभा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्याच स्थानिक निवडणुकीत पाटणकर गटाला विजयाचा दिलासा मिळाला आहे.
पाटण तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील मालदन येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील पॅनेलने १३ पैकी ११ जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला. प्रतिस्पर्धी पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले.
मालदन सेवा सोसायटीचे कार्यक्षेत्र गावासह वाड्या-वस्त्यात आहे. नुकत्याच झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत पालकमंत्री देसाई यांचे नेतृत्व मानणाऱ्या श्री भैरवनाथ ग्रामविकास शेतकरी परिवर्तन पॅनेल आणि भाजपचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील श्री बहिरदेव ग्रामविकास शेतकरी पॅनेलमध्ये चुरशीची लढत झाली.
भाजपच्या श्री बहिरदेव ग्रामविकास शेतकरी पॅनेलने ११ जागा जिंकत दणदणीत विजय मिळविला. या पॅनेलचे विजयी उमेदवारांमध्ये सुरेश दिनकरराव काळे, श्रीकांत राजाराम घारगे, जितेंद्र शंकरराव काळे, समाधान शरदराव काळे, पोपट बाळकृष्ण यादव, काशिनाथ लक्ष्मण पानवळ, संजय जोती साबळे, उज्ज्वला भास्कर गायकवाड, खाशाबा गणपती गायकवाड, अनिल कृष्णा सपकाळ, पांडुरंग सखाराम नलवडे यांचा समावेश आहे.
दरम्यान, श्री भैरवनाथ पॅनेलचे संजय मोहनराव काळे व विमल हणमंत मोरे हे उमेदवार विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गीतांजली कुंभार यांनी काम पाहिले. विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला. विजयी उमेदवारांचे पाटणकर, प्राना फाउंडेशनच्या डॉ. प्राची पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, मालदनच्या सरपंच गीतांजली काळे, माजी सरपंच संदीप पाटील, नितीन पाटील आदींनी अभिनंदन केले.
काहींनी संस्थेवर प्रशासक नेमला
निकालानंतर संदीप पाटील आणि वैभव काळे म्हणाले, ‘‘विजय शेवटी सत्याचाच होतो, यावर या निकालाने शिक्कामोर्तब केले. सुसंस्कृत आणि विचाराने राजकारण करतो. मात्र, काहींनी गावाच्या हिताचा विचार न करता गावात संघर्ष कसा वाढेल, यासाठी प्रयत्न केला. मध्यंतरी संस्थेवर प्रशासक नेमला. या काळात अनेक सभासदांची कामे रखडली. गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागला.
उमेदवारांना दमदाटी
निवडणुकीच्या दरम्यानही उमेदवारांवर दबाव टाकण्यात आला. काहींना दमदाटी आणि भीती दाखवण्याचे प्रकार झाले, तरीही खचून न जाता १३ पैकी ११ जागांवर निवडणूक लढवली; पण शेवटी मालदनच्या जागरूक सभासदांनी दडपशाहीला ठाम उत्तर दिले, असेही पाटील आणि काळे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.