Solapur Assembly Campaign  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Assembly Campaign : मोदींसह तीन केंद्रीय मंत्री, नऊ आजी-माजी मुख्यमंत्री अन्‌ सर्व पक्षप्रमुखांनी गाजवला सोलापूरचा आखाडा

Assembly Election 2024 : बार्शी आणि माळशिरस तालुक्यातील दोन घटना वगळता सोलापूर जिल्ह्यांतील अकरा विधानसभा मतदारसंघातील प्रचार शांततेत पार पडला.

Vijaykumar Dudhale

Solapur, 18 November : गेली 14 दिवसांपासून अविरतपणे धडाधडणाऱ्या प्रचाराचा तोफा अखेर सोमवारी (ता. 18 नोव्हेंबर) सायंकाळी सहा वाजता थंडावल्या. बार्शी आणि माळशिरस तालुक्यातील दोन घटना वगळता सोलापूर जिल्ह्यांतील अकरा विधानसभा मतदारसंघातील प्रचार शांततेत पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तीन केंद्रीय मंत्री, पाच मुख्यमंत्री, चार माजी मुख्यमंत्री यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी सोलापुरात हजेरी लावून प्रचाराचा आखाडा गाजवला. या राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत उडवलेला प्रचाराचा धुरळा आज सायंकाळी खाली बसला असून आजपासून ‘रात्रीस खेळ चाले’ हे प्रकार आता सुरू होणार आहेत.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात 184 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सोलापूर शहर उत्तर, माळशिरस, करमाळा, माढा, मोहोळ, पंढरपूर या मतदारसंघ लढवले, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सांगोला, बार्शी आणि दक्षिण सोलापूर हे तीन मतदारसंघ लढवले. काँग्रेसकडून सोलापूर शहर मध्य, पंढरपूर, अक्कलकोट या मतदारसंघात उमेदवार दिले होते.

महायुतीमधील (Mahayuti) भाजपने सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट, माळशिरस, पंढरपूर या मतदारसंघातून आपले उमेदवार दिले होते. शिवसेनेने करमाळा, बार्शी आणि सांगोला हे मतदारसंघ लढवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने मोहोळ, माढा हे दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे.

महायुती आणि भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जे. पी. नड्डा, मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री अजित पवार, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशिवाय माजी खासदार, अभिनेता गोविंदा, हैदराबादच्या हिंदुत्ववादी नेत्या माधवी लता यांच्या सभा झाल्या.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, उद्योगमंत्री एम. बी. पाटील, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे, इम्रान प्रतापगडी, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री विश्वजीत कदम, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, ओमराजे निंबाळकर आदींनी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghdi) उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या.

या शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्याही सभा झाल्या आहेत. आता प्रत्यक्ष मैदानातील प्रचार संपला असला तरी प्रत्यक्ष भेटींवर आता उमेदवारांचा भर असणार आहे. याशिवाय, डावपेचांच्या माध्यमातून एकमेकांना मात देण्याचा प्रकार येत्या वीस तारखेपर्यंत सुरू राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT