R.R. Patil-Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar Video : आर. आर. पाटलांनी माझा केसाने गळा कापला; अजित पवारांचा गंभीर आरोप

Ajit Pawar's Serious Allegation Late R.R. Patil: राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराजबाबांचा पाठिंबा काढून घेतला आणि त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट आली. तत्कालीन राज्यपालांनी त्या फायलीवर सही करण्यास नकार दिला.

Vijaykumar Dudhale

Sangli, 29 October : माझ्यावर सुमारे 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन गैरव्यवहाराचा आरोप झाला. त्या आरोपामुळे माझी तर वाटच लागली. त्या प्रकरणी एक फायल तयार झाली होती. अजित पवार यांची ओपन चौकशी करावी, म्हणून त्या फायलीवर त्यांनी (तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील) सही केली. केसाने गळा कापायचे धंदे आहेत राव. त्यांनी सही केलेली मलाही माहिती नव्हतं. पुढे मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितले, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (स्व.) आर. आर. पाटील यांच्यावर केला.

तासगाव-कवठेमहांकळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते. त्या सभेत पवार यांनी आपले एकेकाळचे सहकारी आर. आर. पाटील यांच्यावर आरोप केला. ते म्हणाले, सिंचन गैरव्यवहार प्रकरणाचे माझ्यावर आरोप झाले.

सुमारे 70 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला, असा आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. माझ्यावर सारखं सारखं 70 हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला होता.

महाराष्ट्राच्या निर्मितीपासून माझ्यावर आरोप होईपर्यंत जलसंपदा विभागाचा पगारसहीत खर्च सुमारे 42 हजार कोटी रुपये झाला होता आणि माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारचा आरोप करण्यात आला. आकडा जेवढा मोठा तेवढा लोकांना विश्वास वाटू लागला होता. पण झालं... तर माझी वाटच लागली. त्या आरोपानंतर जलसंपदा विभागाच्या गैरव्यवहारप्रकरणी एक फाईल तयार झाली.

त्यांनी (तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील R. R. Patil ) अजित पवार यांची ओपन चौकशी करावी, म्हणून त्या फायलीवर सही केली. केसाने गळा कापायचे धंदे आहेत राव. त्यांनी सही केलेली मलाही माहिती नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराजबाबांचा पाठिंबा काढून घेतला आणि त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट आली.

तत्कालीन राज्यपालांनी त्या फायलीवर सही करण्यास नकार दिला. निवडून आलेला मुख्यमंत्री सही करेल. तो अधिकार त्यांचा आहे. लोकशाही आहे, त्यामुळे मी सही करणार नाही, असे राज्यपालांनी सांगितले होते, असेही अजितदादांनी नमूद केले.

ते म्हणाले, राज्यात पुढे देवेंद्र फडणवीस यांचे सरकर आले. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सही केली. मात्र, त्यांनी मला एक दिवस घरी बोलावले आणि ‘सिंचन गैरव्यवहाराच्या आरोपाची चौकशी करण्याची फायल मुख्यमंत्र्यांच्या सहीमुळे राहिली हेाती. तुमच्या आबांनी तुमची ओपन चौकशी करावी, यासाठी सही केली आहे,’ असे सांंगून त्यांनी मला ती फायल दाखवली आणि खरंच आर. आर. आबांची सही होती.

हे माझ्यासाठी सांगत नव्हतो...

पुढील काळात आर आर पाटील यांना आजार झाला. आम्हाला त्यांनी गालफुगी झाल्याचे खोटेच सांगितले होते. डॉक्टारांनी मात्र काय झाले ते आम्हाला सांगितले. राजारामबापू कारखन्याच्या कार्यक्रमात मी आर. आर. पाटील यांच्यावर टीका केली होती. कशाला तंबाखू खाता, अशी विचारणा केली होती. कारण, तंबाखूमुळे कर्करोग होतो, असे मी त्यांना सांगितले होते.

आपल्याला आणखी भरपूर काम करायचं आहे. मात्र, मी नसताना ते गुपचूप तंबाखू खायचे. मी असताना मात्र तंबाखू खात नाही, असे सांगायचे. पण मी हे माझ्यासाठी सांगत नव्हतो, तर आर. आर. आबांसाठीच सांगत होतो, असा दावाही अजित पवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT