Solapur, 19 April : राजकारणात आणि खेळात कधी काय होईल, ते कोणीही सांगू शकत नाही. परवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे भेट झाली. मात्र, राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंच्या प्रेमाचा पाझर फुटला असेल तर ते शेवटी भाऊ-भाऊ आहेत. ते कधीही एकत्र येऊ शकतात. ते दोघे एकत्र आले तर त्यांच्या दृष्टीने ते चांगलं असू शकतं. मात्र, त्यांच्याकडून आम्हाला काही अडचण वाटत नाही. पण शिवसेना कोणी हॅन्डल करायची, ही त्या दोन भावांचा प्रश्न आहे, असा कळीचा मुद्दा शिवसेना नेते तथा रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले मंत्री भरत गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ भाऊ आहेत, ते एकत्र येत असतील तर चांगली बाब आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी ते आमच्या सोबत होते. मात्र राजकारणात काहीही घडू शकतं.
शिवसेना कोणी हॅन्डल करायची, ही त्या दोन भावांचा प्रश्न आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी ती हिम्मत केली आणि त्याची किंमतही त्यांनी मोजली आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व धर्मीयांबरोबर आम्ही महायुतीचे लोक आहोत. त्यांना महायुती सोबत यायचं असलं तर यावं. नायतर तर ते भाऊ भाऊ आहेत. राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आले तर मुंबई महापालिकेत फटका बसेल असं आम्हाला तरी वाटत नाही. पूर्वी ते एकत्र आले असते तर परिस्थिती वेगळी होती. मात्र आता तसं नाही, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.
रोहयो मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) म्हणाले, संजय राऊत बोलल्याशिवाय शिवसेनेचे दुकान चालत नाही, त्यांच्याकडे माल मटेरियल राहीलं नाही. परदेशात जाऊन त्यातील लोकांशी पंतप्रधान हे इंग्रजीत चर्चा करतात. त्याचा व्हिडीओ काढून आम्ही संजय राऊतला पाठवू. मराठीचा मुद्दा राज ठाकरे यांचा पूर्वीपासून आहे, यात दुमत नाही. मात्र भाजप-शिवसेना हे हिंदुत्व हा मुद्दा घेऊन एकत्र आलो आहेत मराठी हा शिवसेनेचा फार पूर्वीचा मुद्दा आहे
दिवा विझताना त्याची वात मोठी होते, ताशी आदित्य ठाकरे यांची स्थिती झाली आहे. मुंबई महापालिकेतील 90 पेक्षा जास्त नगरसेवक आमच्याकडे आले आहेत आणि उरलेले लवकरच म्हणजे 7 ते 8 दिवसांत त्यांना जय महाराष्ट्र करून आमच्याकडे येतील, असा दावाही गोगावले यांनी केला.
नीलम गोऱ्हे यांच्या आता एकच लक्ष मुंबई महापालिका लक्ष यावर गोगावले यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, गोऱ्हे यांनी काय आत्मपरीक्षण केलं, हे आम्हाला माहिती नाही. त्यांना विचारावं लागेल. आम्ही महायुतीनेच लढणार आहोत. ज्याने कोणी केलं नाहीये, त्यांना कोणालाही अडचण नाही. चुकीच्या गोष्टींसाठी उपाय योजना कराव्याच लागणार आहेत.
गोगावले म्हणाले, बीड महिला वकील मारहाण प्रकरण अत्यंत चुकीचं आहे. एवढं रामायण, महाभारत त्या बीडमध्ये घडलं, त्यामुळे आता कोणीही कोणाला पाठीशी घालणार नाही. नादुरुस्त बसेसची विल्हेवाट लावण्याचं काम सुरु आहे. मराठी ही सक्तेची होणे गरजेचे आहे, त्याला नजरेआड होऊ देणार नाही. मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणात कोणत्या आधारावर क्लीनचिट दिली, याबाबत आम्ही कॅबिनेटमध्ये चर्चा करू.
मी आता मंत्री झालोय. आता रायगडचं पालकमंत्रिपद मिळावं, ही इच्छा स्वामी समर्थांकडे व्यक्त केली आहे. अक्षय तृतीयापर्यंत पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल. अडीच वर्षांपूर्वी मी मंत्री नव्हतो, त्यावेळी मी पालकमंत्री पदासाठी मोठ मन केलं होत. त्यावेळी जो हक्क होता, तो आता आम्हाला मिळायला हवा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगडला आल्यानंतर पालकमंत्री पदाबाबत ना आमच्याशी चर्चा झाली, ना ज्यांनी जेवायला घेऊन गेले त्यांच्याशी झाली. ज्या अर्थी ब्रेक दिलाय त्याअर्थी पालकमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा आहे
महायुतीच्या माध्यमातून मुंबई महापालिका ताब्यात घेऊ : गोगावले
मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बरेचसे नगरसेवक हे शिंदे साहेबांसोबत आलेले आहेत. काही आणखीही येत आहेत, इनकमिंग चालूच आहे, त्यामुळे काही अडचण येणार नाही. मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे या महापालिका आम्ही युतीच्या माध्यमातून ताब्यात घेऊ, असा दावाही गोगावलेंनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.