Aditya Thackeray | Raj Thackeray  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raj Thackeray Solapur PC : राज ठाकरे पुतण्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार; मनसेचा वरळीचा उमेदवारही निश्चित!

Vijaykumar Dudhale

Solapur, 05 August : राज ठाकरे यांचे पुतणे तथा युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेची निवडणूक लढविणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोलापूरमध्ये बोलताना वरळीतून मनसे निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच, उमेदवारही निश्चित झाल्याचे संकेत राज यांनी दिले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे सोलापूरच्या (Solapur) दौऱ्यावर आहेत. आज सकाळी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांना वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी वरळीतून मनसे निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले.

कोण कुठे कुठच्या मतदारसंघात उभा आहे, याच्याशी मला काही देणंघेणं नाही. आम्हाला ज्या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे, त्या ठिकाणी आम्ही उमेदवार उभे करणार आहोत.

आम्ही 2009 मध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातून ( Worli Assembly Constituency) निवडणूक लढवली होती, त्यावेळी आम्हाला त्या मतदारसंघातून 36 ते 38 हजार मतं मिळालेली आहेत. त्यामुळे या वेळी आम्ही वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहोत, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून तिकिट दिले जाण्याची चर्चा आहे. त्याबाबत राज ठाकरे यांनी होकारार्थी उत्तर देत विधानसभा निवडणुकीसाठी वरळीचा उमेदवारही निश्चित झाला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वरळीत आदित्य ठाकरे यांना मनसेचे संदीप देशपांडे टक्कर देणार हे निश्चित मानले जात आहे.

दरम्यान, राज ठाकरे हे आज दिवसभर सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा निवडणूक आढावा घेणार आहेत. मतदारसंघनिहाय ते मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत, त्यानंतर मनसेच्या उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. सोलापूरचा आढावा झाल्यानंतर राज ठाकरे हे तुळजापूर मार्गे धाराशिवला जाणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT