Rajan Patil-Vijayraj Dongre
Rajan Patil-Vijayraj Dongre Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajan Patil News : ‘नक्षत्र’मधून वाचण्यासाठीच राजन पाटलांचा भाजप प्रवेश : विजयराज डोंगरेंनी डागली तोफ

सरकारनामा ब्यूरो

शिवाजी भोसले

सोलापूर : राष्ट्रवादीचे (NCP) माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) हे आपल्यासह परिवाराला ‘नक्षत्र’ प्रकरणातून वाचण्यासाठी भाजपत (BJP) प्रवेश करत आहेत. पाणी प्रश्नासाठी भाजपमध्ये प्रवेश करतोय, असे पाटील यांनी म्हणणे हे बेगडी सोंग आहे, अशी टीका लोकशक्ती परिवाराच्या नेते आणि राजन पाटील विरोधक विजयराज डोंगरे (Vijayraj Dongre) यांनी केली आहे. (Rajan Patil joined BJP only to escape the 'Nakshatra' case: Vijayraj Dongre)

राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशाने मोहोळ तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. तो सोडविण्यासाठी यापूर्वीच पाठपुरावा झाल्याचे आणि सध्याही सुरू असल्याचेही डोंगरे यांनी म्हटले आहे. पाण्याचे निमित्त करून बेगडी सोंग घेत, भाजप प्रवेश करणाऱ्या राजन पाटील यांना जनता ओळखून आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

'पाण्याचे निमित्त करून भाजपत येऊ नका, भाजप वाढण्यासाठी खुशाल या. पण, भाजपत येण्यासाठी पाण्याचे निमित्त करू नका, आपण भाजपमध्ये नाही आला तरी पाण्याच्या संदर्भात सर्वे होऊन सहा महिन्यांत पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे, असेही डोंगरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

आष्टी उपसा सिंचन योजनेच्या अर्धवट कामासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह आम्ही शिष्टमंडळ घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपुरात भेटलो होतो. आष्टी उपसा सिंचन योजनेचे ९० टक्के काम २०१४ ते २०१९ या काळात भाजपमुळेच झाले आहे.

दिवंगत आमदार चंद्रकांत निंबाळकर तसेच मनोहर डोंगरे यांनी आपल्या प्रयत्नांतून आष्टी उपसा सिंचन योजनेचा उद्‌भव खंडाळी ज्योतिबाचा माळ येथे केला. दरम्यान १९९५ ला कोण आमदार होते, याचे आत्मपरीक्षण करावे, असे आवाहनही विजयराज डोंगरे यांनी पाटील यांना केले.

आमदार बबनराव शिंदे यांनी १९९५ मध्ये मिळणाऱ्या मंत्रीपदाला लाथ मारून सीना-माढा सिंचन योजना मंजूर करून आणली. या दरम्यान मोहोळला कोण आमदार होते. सन २००९ पासून पुढे सरकार कोणाचे होते? या काळात आष्टी उपसा सिंचन योजना अधर्वट कशी राहिली? असा सवाल विजयराज डोंगरे यांनी करत माजी आमदार राजन पाटील हे भाजप प्रवेशासाठी केवळ निमित्त पुढे करीत आहेत. नक्षत्र प्रकरणात त्यांची लेकरं बाळ अडकली होती, हे सांगायचं सोडून पाटील हे पाण्याचे कारण सांगत आहेत, हे त्यांचे बेगडी सोंग आहे‌‌. हे सोंग जनता ओळखून आहे, अशा शब्दांत डोंगरे यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला.

पाटलांचे धोरण म्हणजे 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली'

राजन पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या पंधरा वर्षांच्या काळात आष्टी उपसा सिंचन योजना मार्गी लावली नाही. आत्ता या योजनेसाठी भाजप प्रवेश करतोय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना मार्गी लावण्याचा शब्द दिला आहे, असे राजन पाटील सांगत आहेत, त्यांची ही प्रतिक्रिया पर्यायाने धोरण म्हणजे 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली, असेच आहे, अशी कठोर टीकाही डोंगरे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT