Ramdas Athawale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : शिर्डी सोडण्यास शिंदेंचा नकार; आठवले आता सोलापुरातून लोकसभा लढणार?

Vijaykumar Dudhale

Solapur News : लोकसभा निवडणुकीचे पडघम सध्या जोरजोरात वाजू लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटपही अंतिम टप्प्यात आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेले केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनाही लोकसभा निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी त्यांची पहिली पसंती शिर्डी आहे. मात्र, ती जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे. शिवसेना शिर्डीवरील आपला दावा सोडण्यास तयार नाही, त्यामुळे आठवले यांनी आपला मोर्चा सोलापूरकडे वळवला आहे. पण, त्यांच्या उमेदवारीचे भवितव्य भाजप हायकमांडच्या हाती आहे. (Mahayuti News)

रामदास आठवले यांना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून आणून केंद्रीय मंत्री केले आहे. आता आठवले यांना लोकसभा निवडणूक लढविण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला महायुतीने शिर्डी मतदारसंघ द्यावा, अशी उघड मागणी आठवले यांनी केली आहे. मात्र, शिर्डी मतदारसंघातून सध्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे खासदार निवडून आले आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे गट ही जागा सोडायला तयार नसल्याचे सांगितले जात आहे. पण, आठवले यांना सुरक्षित वाटणारा शिर्डी मतदारसंघच हवा आहे. त्यामुळे शिर्डी आठवलेंच्या वाट्याला येणार का, याची उत्सुकता आहे. (Solapur Loksabha Update)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिर्डी लोकसभा मतदारसंघ मिळण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे अलीकडेच बंगळुरूमध्ये बोलताना आठवले यांनी आपण शिर्डी आणि सोलापूरमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे विधान केले होते. शिर्डी मतदारसंघ शिवसेना सोडायला तयार नाही. दुसरीकडे, सोलापूरची जागा भाजपची हक्काची आहे. सोलापूरमधून सलग दोन वेळा भाजपचे खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये भाजपही आठवले यांना लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी सोलापूरची जागा सोडणार का, हा खरा प्रश्न आहे. (BJP News)

दरम्यान, आठवले हे काँग्रेस आघाडीसोबत असताना पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर पंढरपूर लोकसभेचा माढा लोकसभा मतदारसंघात झाला. त्यानंतर आठवले यांनी आपला मोर्चा शिर्डीकडे वळविला होता. शिर्डीतून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली खरी, पण त्यात आठवले यांचा पराभव झाला. आता शिंदे शिर्डीची जागा सोडायला तयार नसल्याने आठवले यांनी आपला मोर्चा सोलापूरकडे वळविल्याचे बोलले जात आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या सहापैकी चार मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. उर्वरित दोनपैकी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आणि दुसरा आमदार काँग्रेसचा आहे, त्यामुळे सुरक्षित असणाऱ्या सोलापूर मतारसंघातून निवडणूक लढविण्याचा आठवलेंचा मनोदय दिसत आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT