Shirdi Lok Sabha Constituency : शिर्डी मतदारसंघातून वाकचौरे इच्छुक; पण ठाकरे गटातूनच विरोध?

Lok Sabha Election 2024 : शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाऊसाहेब वाकचौरेंचा त्यांनी ठाकरे गटात प्रवेश...
Shirdi Lok Sabha Constituency
Shirdi Lok Sabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 : आपला माणूस आपल्यासाठी, अशी ओळख असलेले निवृत्त सरकारी अधिकारी आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे पुन्हा एकदा शिवसेनेकडून (ठाकरे गट) शिर्डी लोकसभा मतदारसंघातून दंड थोपटण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. भूतकाळात झालेल्या चुकीची माफी मागत त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नॉट रिचेबल भूमिकेला कंटाळलेल्या मतदारांकडूनही वाकचौरे यांना पाठिंबा मिळू शकतो, अशी चर्चा आता मतदारसंघात रंगू लागली आहे. (Latest Marathi News)

भाऊसाहेब वाकचौरे हे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका गरीब कुटुंबातून आहेत. सरकारी सेवेत विविध पदांवर अधिकारी म्हणून काम करत ते सेवानिवृत्त झाले. शिर्डी येथील साईबाबा मंदिराचे कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी केलेला शिर्डी संस्थानाचा कायापालट उल्लेखनीय ठरला. साई संस्थान शासकीय सेवा संपल्यानंतर ते राजकारणाकडे वळले आणि त्यांनी 2009 मध्ये पहिल्यांदा शिर्डी या अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव मतदारसंघातून शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी आरपीआयचे दिग्गज नेते रामदास आठवले यांचा पराभव केला. त्यामुळे वाकचौरे अधिकच चर्चेत आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिर्डी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून वाकचौरे यांनी मतदारसंघात विविध विकासकामांचा धडाका लावला. प्रशासनाचा अनुभव असल्याने जनतेची कामे त्यांनी अडू दिली नाहीत. निळवंडे धरणाच्या कालव्याच्या मंजुरीचा प्रश्न मार्गी लावण्यातही त्यांनी मोठा हातभार लावला होता. शिर्डीतील साई मंदिराचे कामकाज पाहात असल्यापासून त्यांच्या जनसंपर्काच्या कक्षा अधिक विस्तारल्या होत्या. त्यातच त्यांच्या जनतेत राहून आपला माणूस म्हणून काम करण्याच्या शैलीमुळे ते लोकप्रिय राजकारणी म्हणून ओळखले जात होते. दरम्यान, 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेने पुन्हा त्यांना संधी दिली होती. मात्र ऐनवेळी वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा आत्मघाती निर्णय घेतला आणि त्यांना मोदी लाटेत पराभवाचा झटका बसला.

Shirdi Lok Sabha Constituency
Uddhav Thackeray News : शिर्डी दौऱ्याआधीच उद्धव ठाकरेंना धक्का! मोठ्या नेत्याचा राजीनामा

2014 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर पराभूत झालेल्या वाकचौरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2019 मध्येही शिर्डी मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडेच राहिला. त्यावेळी भाऊसाहेबांनी भाजपमध्ये बंडखोरी करत शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाऊसाहेबांचे डिपॉझिट जप्त झाले. पक्षविरोधी कारावायांमुळे भाजपने त्यांच्यावर कारवाई केली. काही दिवासांनी पुन्हा ते भाजपमध्ये सक्रिय झाले. मात्र आता शिवसेना फुटीनंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वाकचौरे हे शिवसेनेच्या ठाकरे गटात परतले आहेत.

ठाकरे गटाकडून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र, शिवसेनेशी एकनिष्ठ राहून लोकसभेची तयारी करणारे बबनराव घोलप हे देखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत. वाकचौरे यांच्या प्रवेशानंतर घोलप हे नाराज असून त्यांनी शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात उमेदवारी कोणाला मिळणार आणि वाकचौरेंना मिळाल्यास घोलप, कांबळे यांचे सहकार्य लाभणार की फटका बसणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Shirdi Lok Sabha Constituency
Uddhav Thackeray Shirdi Tour : बाळासाहेब थोरातांच्या लॉबिंगनंतरही ‘शिर्डी’साठी उद्धव ठाकरेंचा गोळाबेरीज दौरा...

नाव (Name)

भाऊसाहेब राजाराम वाकचौरे

जन्मतारीख (Birth date)

1 एप्रिल 1950

शिक्षण (Education)

एलएलबी

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

भाऊसाहेब वाकचौरे हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले राजकारणी आहेत. कुटुंबात कोणतीही राजकारणाची पार्श्वभूमी नसताना प्रशासकीय सेवेतून त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. त्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले. भाऊसाहेब वाकचौरे यांचे मातृ-पितृछत्र लहानपणीच हरपले. त्यानंतर त्यांनी मोठ्या कष्टाने शिक्षण पू्र्ण करत प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवली. पुढे त्यांचा विवाह नोकरदार असलेल्या सरस्वती यांच्यासोबत झाला. भाऊसाहेब वाकचौरे यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. एका मुलीने इंजिनिअरिंग केले आहे तर दुसरी डॉक्टर आहे. मुलाने एमबीएचे शिक्षण घेतले आहे.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

निवृत्त शासकीय अधिकारी

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

शिर्डी

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

शिवसेना (ठाकरे गट)

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

भाऊसाहेब वाकचौरे हे नावाजलेले प्रशासकीय अधिकारी म्हणून परिचित होते. शिर्डीतील साई मंदिराचे मु्ख्य कार्यकारी अधिकारी असताना शिर्डी मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क वाढला. याचाच फायदा त्यांना त्यांच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत झाला आणि ते खासदार झाले. 2009 मध्ये कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले मात्र सरकारी सेवेत असताना अनेक राजकारण्यांच्या संपर्कात आलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांचा खऱ्या अर्थाने राजकीय प्रवास सुरू झाला.

2009 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच 2008 मध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी शिवसेनेच्या आमदार निलम गोऱ्हे आणि अरविंद सावंत यांच्या पुढाकाराने ते शिवसेनेत सक्रिय झाले होते. पुढे त्यांना शिवसेनेने शिर्डी मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांचा सामना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार रामदास आठवले यांच्याशी झाला. या निवडणुकीत वाकचौरे यांनी आठवलेंचा सुमारे 1 लाख 32 हजार मतांनी दारूण पराभव केला होता. वाकचौरे यांना 3 लाख 60 हजार तर, आठवलेंना 2 लाख 27 हजार मते मिळाली होती. वाकचौरे पहिल्याच निवडणुकीत लोकसभेचे सदस्य झाले होते. या काळात त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले. शिर्डीला पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी त्यांनी केंद्राकडून निधी आणला. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नावर निळवंडे प्रकल्पाची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. त्यामध्ये प्रामुख्याने कालव्याच्या मंजरीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

शिर्डीचे लोकप्रतिनिधी म्हणून वाकचौरे यांची जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण झाली होती. त्यातच 2014 ची लोकसभा निवडणूक जाहीर झाली. शिवसेनेकडून वाकचौरेंची उमेदवारी आधीच निश्चित करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी वाकचौरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांचा हा निर्णय आत्मघाती ठरला. शिवसेना सोडल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. त्यातच शिवसेनेने आमदार बबनराव घोलप यांना उमेदवारी दिली, मात्र इथेही शिवसेनेला फटका बसला. भ्रष्टाचाराच्या आरोपात घोलप यांना शिक्षा झाली. त्यामुळे शिवसेनेला दुसरा उमेदवार शोधावा लागला. यावेळेची संधी साधत भाजपचे सदाशिव लोखंडे शिवसेनेत दाखल झाले आणि शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली. या निवडणुकीत मोदी लाट, वाकचौरे यांच्याबद्दलची नाराजी या सर्व गोष्टीमुळे लोखंडे खासदार झाले आणि काँग्रेसकडून उमेदवारी घेतलेले वाकचौरे पराभूत झाले. पक्ष बदलला नसता तर कदाचित वाकचौरे पुन्ही विजयी झाले असते.

Shirdi Lok Sabha Constituency
Ashok Chavan Join BJP : भाजपात प्रवेशात होताच अशोक चव्हाणांना बघा काय मिळालं ?

लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर वाकचौरे यांनी काँग्रेसलाही रामराम ठोकला आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांनी श्रीरामपूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र याठिकाणी देखील काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्या पराभवानंतर वाकचौरे हे मतदारसंघात सक्रिय राहिले. 2019 च्या निवडणुकीत पुन्हा हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. त्यामुळे शिर्डी मतदारसंघातून वाकचौरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली. परंतु या निवडणुकीत पक्षाची संपूर्ण ताकद शिवसेना उमेदवाराच्या पाठिशी होती. त्यामुळे वाकचौरे पुन्हा एकदा पराभूत झाले. त्यावेळी युतीकडून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे दुसऱ्यांदा विजयी झाले होते. पुढे वाकचौरे यांच्या बंडखोरीमुळे भाजपने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये त्यांना पुन्हा पक्षात सामावून घेण्यात आले होते.

आता आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय गणिते बदलली आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिर्डीचे विद्यमान खासदार लोखंडे हे शिंदे गटात सहभागी झाले होते. त्यामुळे ठाकरे गटाला या ठिकाणी उमेदवाराची गरज होती. हा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवण्यासाठी ठाकरे गटाने हालचाली सुरू करताच वाकचौरे यांनी आपली भूतकाळातील चूक मान्य करत पुन्हा एकदा ठाकरे गटात प्रवेश केला. आगामी निवडणुकीत ठाकरे गटाकडून वाकचौरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. असे असले तरी या मतदारसंघातून बबनराव घोलप, भाऊसाहेब कांबळे आणि संदीप घनदाट यांचीही संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा होत आहे. त्यातच वाकचौरे यांच्या प्रवेशानंतर घोलप यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचा फटका वाकचौरे यांना बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Shirdi Lok Sabha Constituency
Ashok Chavan : काँग्रेसने अशोक चव्हाणांचा 'कारभार' गुंडाळला; नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

भाऊसाहेब वाकचौरे हे 'आपला माणूस आपल्यासाठी' म्हणून मतदारसंघात परिचित आहेत. प्रशासकीय सेवेत असल्यापासून त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले. साईबाबा मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी शिर्डीमध्ये विकासाची गंगाच वाहती केली. भक्त निवास, रुग्णालय, अन्नक्षेत्र ही सर्व कामे भाऊसाहेब वाकचौरे कार्यकारी अधिकारी असतानाच झाली होती. यासह शिर्डी मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी शिर्डी तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. निळवंडे धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. मतदारसंघात शाळा, पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून रस्त्यांची कामे, साईनगर ते पंढरपूर रेल्वे मंजुरी यासारखी कामे त्यांनी मार्गी लावली. यासह साई संस्थानाशी जोडले गेल्याने त्यांचा सामाजिक कार्यातील वावर वाढलेला आहे. देशभरातून येणाऱ्या भक्तांना कोणत्या सुविधा देता येतील, त्यांची अंमलबजावणी कशा पद्धतीने करता येईल, शिर्डीचा तीर्थस्थळ म्हणून विकास व्हावा, यासाठी भाऊसाहेब वाकचौरे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. आताही त्यांनी शिर्डी ते अयोध्या वंदे भारत रेल्वे आणि विमानसेवा सुरू करा अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

Shirdi Lok Sabha Constituency
Sharad Pawar Group NCP : शरद पवार गटाचा कवितेतून भाजपला टोला; म्हणाले, 'शेंबडं पोर...'

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

2019 च्या निवडणुकीपूर्वी भाऊसाहेब वाकचौरे हे भाजपमध्ये सक्रिय होते. शिर्डी हा मतदारसंघ भाजप आपल्याकडे ठेवेल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र शिवसेनेने मतदारसंघावरील दावा कायम ठेवला आणि सदाशिव लोखंडे यांना युतीचे उमेदवार म्हणून पुन्हा संधी मिळाली होती. यावेळी भाऊसाहेब वाकचौरे यांनी भाजपमध्ये बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. बंडखोरी केल्यामुळे भाजप आणि शिवसेनेकडून त्यांना कोणतीही सहानुभूती मिळाली नाही. वाकचौरे यांचा पराभव झाला. त्यांना केवळ 35000 मते मिळाली होती. मुळात ही निवडणूक युतीचे उमेदवार लोखंडे विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे अशी झाली होती.

भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव होण्यामागे मुख्य कारण म्हणजे 2019 च्या निवडणुकीत बंडखोरी केल्यामुळे त्यांच्याकडे कार्यकर्त्यांसह तोकडी प्रचारयंत्रणा उपलब्ध होती. तशीच ही लढत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच झाली होती. त्यामुळे अपक्ष मैदानात उतरलेल्या वाकचौरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

भाऊसाहेब वाकचौरे यांचा जनसंपर्क अत्यंत प्रभावी आहे. प्रशासकीय सेवेत त्यांनी बीडीओ, सीईओ अशा पदांवर काम केल्याने त्यांचा जनता आणि राजकारणी यांच्याशी नेहमीच संपर्क राहिला. त्यातच त्यांच्याकडे शिर्डीच्या (Shirdi) साईमंदिराचे कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी आली होती. त्यामुळे त्यांच्या जनसंपर्काच्या कक्षा अधिकच विस्तारल्या आहेत. भाऊसाहेब वाकचौरे हे साई मंदिराचे विश्वस्त असल्याने त्यांचा मतदारसंघासह जिल्ह्यात आणि राज्यातही मोठा जनसंपर्क राहिला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि भाजपमध्ये काम करताना कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. आपला माणूस आपल्यासाठी म्हणून ओळखले जाणारे भाऊसाहेब पूर्वीपासून जनतेमध्ये मिसळून काम करत आले आहेत. मतदारांना ते सहज उपलब्ध होतात. त्यामुळे मतदारांमध्ये त्यांची प्रतिमा मातीशी नाळ जोडलेला आपला माणूस अशी आहे.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

भाऊसाहेब वाकचौरे हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसून येतात. मतदारसंघातील प्रश्न, तसेच विकासकामासाठी केंद्र आणि राज्यसरकारकडे केलेल्या पाठपुराव्याची माहिती, मतदारसंघातील दौरे याबाबतची माहिती ते सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतात.

Shirdi Lok Sabha Constituency
Sharad Pawar Group NCP : शरद पवार गटाचा कवितेतून भाजपला टोला; म्हणाले, 'शेंबडं पोर...'

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

वाकचौरे हे शांत, संयमी स्वभावाचे राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये आतापर्यंत कधीही प्रक्षोभक विधाने केली नाहीत. राजकीय विधाने करत असतानाही त्यांनी कधी कोणावर आरोप अथवा प्रत्यारोप, खालच्या दर्जाची टीका करणे नेहमीच टाळले आहे. दरम्यान, त्यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये बंड करत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीच्या प्रचारावेळी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे आणि शिवसेनेचे उमेदवार लोखंडे यांची नावे न घेता अडाणी उमेदवार दिल्लीत जाऊन काय करणार, जनतेला माझ्यासारखा शिकलेला उमेदवार पाहिजे असल्याचे विधान वाकचौरे यांनी केले होते.

राजकीय गुरु कोण? (Political Godfather/Guru)

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)

Shirdi Lok Sabha Constituency
Dharmaraobaba Atram : काँग्रेसचे ‘हे’ ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येणार, ‘बाबां’चा गौप्यस्फोट !

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

भाऊसाहेब वाकचौरे हे साई मंदिराचे विश्वस असल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा असून त्यांना संसदीय आणि प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रश्न शासनदरबारी मांडणे आणि ते सोडवून घेण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा फायदा होऊ शकतो. तसेच शिर्डी मतदारसंघाचे विश्वस्त आणि माजी कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी केलेल्या कार्याची दखल आजही घेतली जाते, त्यामुळे त्यांचा अनुभव आणि त्यांनी केलेले कार्य ही त्यांच्यासाठी जमेची बाजू मानली जाते. याशिवाय शिवसेना फुटीनंतर मतदारसंघात शिंदे सेनेविषयी नाराजी आहे. तसेच विद्यमान खासदार लोखंडे हे देखील जनतेसाठी उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे. त्यामुळे शिवसेना फुटीचा राग आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल निर्माण झालेली सहानुभूती याचा फायदा वाकचौरे यांना होऊ शकतो.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

वाकचौरे यांची सातत्याने पक्ष बदलण्याच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांचे जाळे विस्कळीत झाले आहे. भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेत राहून निष्ठेने काम करणाऱ्या बबनराव घोलप यांच्यासह इतर काही कार्यकर्त्यांचा वाकचौरे यांना उमेदवारी देण्यास विरोध आहे. त्यातच घोलप यांनी वाकचौरे यांच्या पक्ष प्रवेशानंतर ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचा फटका आगामी निवडणुकीत बसू शकतो. शिंदे गट वेगळा झाल्याने शिवसेनेच्या मतांची विभागणी झाली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्याही मतांची विभागणी झाली आहे. त्यामुळे यावेळी महायुतीचे पारडे जड मानले जात आहे. त्याचाही फटका वाकचौरे यांना बसू शकतो.

Shirdi Lok Sabha Constituency
Ashok Chavan In BJP: भाजप प्रवेशादरम्यान अशोक चव्हाण चुकले, फडणवीसांनी सावरले

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest Lok Sabha election what will be the consequences)

शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटाला एका सक्षम आणि दांडगा जनसंपर्क असलेल्या उमेदवाराची गरज होतीच. भाऊसाहेब वाकचौरे हे मूळचे शिवसेनेचे आहेत. त्यातच त्यांनी आपली चूक स्वीकारून शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाकरे गटाकडूनही वाकचौरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र वाकचौरे यांच्या प्रवेशाने शिर्डी मतदारसंघात निर्माण झालेली नाराजी टाळण्यासाठी आणि पक्षनिष्ठेचा विचार करून समजा वाकचौरे यांची उमेदवारी नाकारली, तर वाकचौरे यांना तूर्तास पक्षाचे काम करत राहावे लागेल. असे असले तरी सद्दस्थितीत वाकचौरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

वाकचौरे यांच्या प्रवेशामुळे घोलप हे ठाकरे गटात नाराज आहेत. त्यामुळे वाकचौरे यांचा पत्ता कट झाल्यास शिवसेनेकडून बबनराव घोलप यांच्या उमेदवारीचा विचार केला जाऊ शकतो. असे झाल्यास आणि ऐनवेळी जागा वाटपामध्ये शिर्डी मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यास वाकचौरे पुन्हा भाजपमधून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभेतील उमेदवारांची गणिते ही जागावाटपानंतर अधिक स्पष्ट होणार आहेत.

(Edited By - chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com