Rahul Gandhi, Ramdas Athawale  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ramdas Athawale : रामदास आठवले यांचा राहुल गांधी यांना सल्ला; तुम्ही काँग्रेस पक्ष जोडोचे काम करा!

Umesh Bambare-Patil

Satara News : लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. काही दिग्गज मंडळी काँग्रेस पक्ष सोडताना दिसत आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी देश जोडण्याऐवजी स्वत:चा काँग्रेस पक्ष जोडण्याचे काम करावे. देशभर फिरून त्यांना काहीही फायदा होणार नाही, असा सल्ला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींना दिला आहे.

चर्मकार समाजाच्या पश्चिम महाराष्ट्राचा वधू-वर मेळाव्यासाठी मंत्री रामदास आठवले आज साताऱ्यात आले होते. या वेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे आदी उपस्थित होते.

रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, सध्या काँग्रेस पक्ष सोडण्याचे काम सुरू असून, अनेक दिग्गज मंडळी पक्ष सोडत आहेत. अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आसाममधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देश जोडण्याऐवजी स्वत:चा पक्ष जोडण्याचे काम करावे. देशभर फिरून त्यांना काहीही फायदा होणार नाही. सध्या एनडीएला चांगला प्रतिसाद मिळत असून, देश गतीने पुढे जात आहे.

काँग्रेसच्या काळात देशाचा गतीने विकास झाला नाही. मोदी आल्यावर संविधान लिहिले त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे केले. 150 कोटींचे हे स्मारक आहे. आंबेडकर फाउंडेशन काँग्रेस (Congress) च्या काळात स्थापन झाले, पण तेथे केवळ एक कार्यालय होते. काँग्रेसला लक्ष द्यायला वेळ नव्हता; पण मोदींनी तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सेंटर उभे केले. साडेतीनशे ते चारशे कोटी रुपये खर्च केले आहेत. इंदू मिलचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तेथे भव्य पुतळा उभारला जात आहे.

संविधान बदलणार अशी अफवा पसरून समाज तोडण्याचे काम काँग्रेस व इतर पक्ष करीत आहेत, अशी टीका करून मंत्री आठवले म्हणाले, एका बाजूला राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढत असून, दुसऱ्या बाजूला देशाला तोडण्याचा त्यांचा डावपेच आहे. समाजात फूट पाडण्याचा त्यांचा डाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना समान संधी देण्याचा अधिकार संविधानातून दिला आहे. इतर धर्माच्या लोकांना समान न्याय देण्याचा अधिकार संविधानात आहे. हे बदलण्याचा प्रश्नच येत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे 26 नोव्हेंबरला संविधानाचा ड्राफ्ट सुपूर्त केला होता. तो दिवस काँग्रेसच्या लक्षात नव्हता, पण आता मोदींनी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जात आहे. संविधान सभेतील सर्वांचे योगदान असून, नेहरूंचेही योगदान आहे, पण डॉ. आंबेडकरांचे नाव कमी करण्याचे काम काँग्रेसकडून होत असून, हा डॉ. आंबेडकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. संविधान बदलणार नाही. संविधान संरक्षणासाठीच मी मंत्रिमंडळात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

(Edited by Amol Sutar)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT