Solapur, 26 March : माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील यांनी कडाडून विरोध केला आहे. मात्र, आता त्याच मोहिते पाटील यांच्या बोलकिल्ल्यातून निंबाळकर यांच्या प्रचाराचा नारळ महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत फोडण्यात येणार आहे. त्यामुळे मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या (Mahayuti) सर्व दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराचा नारळ माळशिरस तालुक्यातून फोडण्यात येणार आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha Constituency) सध्या फिरत असलेले नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नीरा नरसिंहपूर येथील कुलदैवत लक्ष्मी नरसिंह मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी धैर्यशील मोहिते पाटीलही या वेळी इच्छुक होते. मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारी न देता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पुन्हा घातली आहे, त्यामुळे मोहिते पाटील कमालीचे नाराज झाले आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांनी तर संपूर्ण माढा मतदारसंघाचा दौरा केला आहे. मोहिते पाटील कुटुंबीय प्रचारासाठी बाहेर फिरत आहे. मतदारांच्या गाठीभेटींवर सध्या मोहिते पाटील कुटुंबीय जोर देत आहे. त्यामुळे मोहिते पाटील बंडखोरी करणार की उमेदवारीत डावलेले तरी भाजपमध्ये शांत राहणार, याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
दरम्यान, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महायुतीच्या नारळाचा प्रचार फुटणार आहे. एकीकडे मोहिते पाटील यांची नाराजी कायम असताना आणि मित्रपक्ष रामराजे निंबाळकर यांचाही विरोध असताना भाजप मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवर ठाम आहे, त्यामुळे मोहिते पाटील आणि रामराजे यांचीही आपापल्या पक्षात कोंडी झाली आहे. आता त्यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, हे पाहावे लागेल.
उमेदवारीमध्ये डावलण्यात आल्यामुळे नाराज असलेले मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवतील, अशी चर्चा गेल्या आठवड्यात होती. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडीपासून मोहिते पाटील बाजूला गेल्याचे दिसत आहे. तसेच, त्यांचा मतदारसंघातील प्रचारही थंडावला आहे, त्यामुळे ते खरोखर पवारांच्या राष्ट्रवादीकडून लोकसभेची निवडणूक लढवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.