Vishal Patil-Rohit Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishal Patil : खासदार विशाल पाटलांनी पुन्हा मारली पलटी; आता म्हणतात, ‘रोहित पाटलांनाच आमदार करणार...’

Vijaykumar Dudhale

Sangli, 13 September : सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी पुन्हा एकदा पलटी मारली आहे. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून विधानसभेला माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच खासदार पाटील यांनी म्हटले होते.

त्याला काही दिवस होत नाही तोच आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत तासगाव कवठेमहांकाळचे पुढचे आमदार रोहित पाटीलच असतील, अशी ग्वाही दिली. त्यामुळे विशाल पाटील यांच्या ‘यू टर्न’ची सांगलीत चर्चा आहे.

रोहित आर आर पाटील (Rohit Patil) यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना खासदार विशाल पाटील यांनी पुन्हा पलटी मारत तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून पुढचे आमदार रोहित आर आर पाटील हेच असतील, असे स्पष्टपणे सांगितले. या वेळी व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि रोहित पाटील उपस्थित होते.

विशाल पाटील (Vishal Patil) म्हणाले, तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघाची निवडणूक लवकरच लागणार आहे. जयंत पाटील साहेब, प्रामाणिकपणे काम करून तुमच्या पक्षाचा आमदार रोहित पाटील यांच्या रूपाने निवडून द्यायचा आहे. वसंतदादा कुटुंबाने रोहित पाटील आणि सुमनवहिनींना शब्द दिला आहे.

रोहित पाटील यांच्या पाठीशी या वेळी मी एकटाच नाही तर संपूर्ण वसंतदादा कुटुंबीय, आमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती, वसंतदादांच्या विचारांचा प्रत्येक व्यक्ती ही ठामपणे रोहित पाटील यांच्या पाठीशी उभा राहील.

रोहितदादा, तुम्ही काही काळजी करू नका. कोणतंही टेन्शन घेऊ नका. राजकारण चालत राहणार, काही गोष्ट होत राहणार. पण तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांच्या रुपाने लोकांसाठी झटणारा, आपलासा वाटणारा, आपला मुलगा, आपला धाकटा भाऊ म्हणून काम करणारा एक चांगला आमदार तुम्हाला देण्याची इच्छा शरद पवार यांनी बोलून दाखवली आहे, ती जबाबदारी सर्वांनी घ्यायची आहे.

राजकारणात ज्यांचे वडिल लवकर गेले, त्यांना काम करताना अनेक अडचणी आल्या, त्या तरुणांच्या पाठीशी आपल्याला राहायचं आहे, असे आवाहनही विशाल पाटील यांनी केले.

दरम्यान, सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा तयारीत असणारे माजी मंत्री अजित घोरपडे यांच्या पाठीशी राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आता खासदार विशाल पाटलांनी पलटी मारली आहे.

काही दिवसांपूर्वी विशाल पाटील यांनी खानापूरमध्ये एकनाथ शिंदे गटाचे सुहास बाबर यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. त्याबाबत महाविकास आघाडीत वाद रंगलेला असतानाच त्यांनी घोरपडे यांच्या पाठिंब्याबाबत सूतोवाच केले होते. मात्र, त्यावर त्यांनी लगेच आपल्याला असं म्हणायचं नव्हते, असे स्पष्टीकरण दिले होते. त्यामुळे विशाल पाटील यांच्या यू टर्नची एकच चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT