Tanaji Sawant, Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Tanaji Sawant : तानाजी सावंतांची अक्कल काढत गुळवे म्हणाले, 'आदिनाथ'चे वाटोळे...

Adinath Sugara Factory : सावंतांनी आपल्या कारखान्यांतील यंत्रणा 'आदिनाथ'ला द्यावी

Harshal Bagal

Karmala Political News : करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा उत्तम अनुभवाच्या जोरावर भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी बारामती ॲग्रो घेण्याची तयारी करीत आहे. मात्र, मंत्री तानाजी सावंतांनी कारखान्यावर प्रशासक नेमण्याचा घाट रचला. यातून आदिनाथ कारखाना बारामती ॲग्रोला कसा मिळणार नाही, याचे षडयंत्र आखले जात आहे. आदिनाथ कारखान्यासह प्रशासकांचाही बळी देण्याचे काम सावंतांनी केले. त्यांना कारखानदारीतली एवढी अक्कल होती, तर स्वतःचे कारखाने पूर्ण क्षमतेने का चालवत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करून सुभाष गुळवेंनी सावंतांवर जोरदार टीका केली.

आदिनाथ सहकारी साखर कारखाना उत्तमरीतीने चालला, तर व्हिवाळ, आलेगाव आणि सोनारी येथील सावंतांच्या कारखान्यांना फटका बसणार आहे. ते टाळण्यासाठी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला ऊसपुरवठा अथवा यंत्रणेचा पुरवठा करायचा नाही. तसेच येणाऱ्या काळामध्ये आदिनाथचा कोळसा करून तो स्वतःच्या ताब्यात घेण्याचा सावंतांचा डाव आहे, असा गंभीर आरोपही गुळवेंनी या वेळी केला. आता यावर मंत्री सावंत गुळेवेंना काय उत्तर देणार याकडे लक्ष आहे. दरम्यान, या शब्दिक चकमकीतून गुळवे-सावंत यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

एखादा कारखाना शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगला चालवण्यासाठी अनुभव अर्थकारण आणि नियोजन या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. या तिन्ही गोष्टी नारायण पाटील आणि महेश छोटे यांच्याकडे नाहीत. सावंत हे महाराष्ट्राला भिकारी बनवणार होते. मात्र, महाराष्ट्र काय भिकारी होणार नाही, पण आदिनाथमध्ये हस्तक्षेप करीत कारखान्याच्या सभासद आणि परिसरातील शेतकऱ्यांना मात्र सावंत भिकारी केल्याशिवाय राहणार नाही, अशी खरमरीत टीकाही गुळवे यांनी केली आहे.

करमाळ्यातील आदिनाथ साखर कारखाना आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना (Tanaji Sawant) ताब्यात घ्यायचा आहे. त्यासाठीच ते कारखाना जास्तीत जास्त कसा अडचणीत येईल, यासाठी प्रयत्न करताना दिसतात. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती अॅग्रोने भाडेतत्त्वावर घेतलेला आहे. असे असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक राजकारण करून हा कारखाना बारामती अॅग्रोला देण्यास विरोध केला.

आदिनाथ कारखाना वाचवायचा असेल, तर सावंतांनी स्वतःच्या कारखान्याची यंत्रणा या कारखान्याला पुरवली पाहिजे. मात्र, तसे न करता स्वतःच्याच कारखान्यांना ऊस मिळावा, यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. कारखानदारीत सावंतांची विश्वासार्हता संपलेली असल्याचे सांगून त्यांचा कोणताही कारखाना मोठे गाळप करू शकणार नाही, असा दावाही गुळवेंनी केला.

सावंतांनी आदिनाथवरती प्रशासक आणून प्रशासकांना आपल्या इशाऱ्यावर नाचवण्याचे काम केले आहे. प्रशासक म्हणून नेमलेले शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे हे कारखाना सावंतांच्या घशात कसा घालता येईल, यासाठीच वातावरण निर्मिती करत आहेत. आता प्रशासकच आदिनाथला यंत्रणा पुरवावी म्हणून पवारांच्या दारात फेऱ्या मारत आहेत. आदिनाथची एवढीच काळजी असेल तर सावंतांनी त्यांच्या कारखान्यातून यंत्रणा पुरवावी. मात्र, त्यांना कोणत्याही परिस्थितीत कारखाना चालवायचा नाही, त्याच पद्धतीने त्यांची वाटचाल सुरू आहे, असा निशाणाही गुळवेंनी साधला.

कारखान्यावर सावंताचे फोटो कशासाठी ?

आदिनाथ कारखाना हा शेतकऱ्यांचा, सभासदांचा राहिला पाहिजे, असे म्हणत असताना सावंतांचे फोटो कारखान्याच्या कार्यालयात कशासाठी लावले, याचे उत्तर द्यावे. आमदार रोहित पवारांच्या (Rohit Pawar) बारामती ॲग्रोला आदिनाथ देण्यासाठी विरोध करणाऱ्यांनी सावंतांचे कारखाने किती क्षमतेने चालतात ? त्यांनी आतापर्यंत उसाला किती भाव दिला, हेही एकदा सावंतांना विचारून घ्यावे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बारामती ॲग्रोने जामखेडमधील हळगाव येथील श्रीराम शुगर कारखाना घेतला आहे. जामखेड, कर्जत व करमाळा तालुक्यांतील उसाचा प्रश्न सोडवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. याशिवाय शेतकऱ्यांना 2900 रुपये भाव दिला. यंदा हंगामात एक लाखापेक्षा जास्त गाळप हाळगाव येथील कारखान्याने केले. आदिनाथ कारखाना हा 3500 मेट्रिक टन गाळप क्षमता असलेला कारखाना आहे. परंतु, प्रशासकांच्या आणि सावंतांच्या चुकीच्या भूमिकेमुळे चुकीच्या धोरणांमुळे 200 टनही रोज गाळप होत नाही, असेही सुभाष गुळवेंनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT