Sangali News : सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष पदाच्या निवडीत हार पत्करलेल्या भाजपने सभापती निवडीत चमत्कार घडवू, असे जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीने त्यांच्या या मनसुभ्याला सुरुंग लावला. केवळ इतक्यावरच न थांबता भाजपमधीलच सदस्य फोडण्याची भीती दाखवल्याने सभापती निवडीच्या सभेत भाजपचे सदस्य जिल्हा परिषदेत फिरकलेच नाहीत. सभापतीपदासाठी चार अर्ज भाजपने घेतले खरे, मात्र मुदत संपली असतानाही कोणताही अर्ज दाखल नसल्याने महाविकास आघाडीच्या चार सदस्यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. संख्याबळ विजयापर्यंत पोहोचत नसल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपचे सदस्य विशेष सभेसही अनुपस्थित राहिले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत भाजपला धक्का देत आमदार जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष केला. महायुतीकडे अपेक्षित संख्याबळ असताना राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. त्यामुळे सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भाजपला महाविकास आघाडीने चांगलाच धक्का दिला. सभापती निवडीत चमत्कार करू, पिक्चर अभी बाकी है, हे दावे करणाऱ्या भाजपला महाविकास आघाडीने संपूर्ण पिक्चर दाखवला.
अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांचे मनसुबे धुळीस मिळवत ३४-२५ मतांनी विजय मिळवून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. त्यामुळे महायुतीचे नेते सभापती निवडीत सावध होते. मतांचा फरक भरून काढण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. मात्र भाजपकडे 24 तर महाविकास आघाडीकडे 37 ची संख्याबळ असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपने सभापती निवडीतून सपशेल माघार घेतली.
शहरातील एका हॉटेलमध्ये महायुतीचे २४ सदस्य एकत्र होते. त्यांच्यासोबत ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक होते. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भाजपकडूनही साडेअकराच्या सुमारास चारही सभापतिपदांसाठी अर्ज घेण्यात आले. भाजपकडून शोभा वसंत खोत, मंजूश्री कांबळे, जयराज पाटील, शिवाजी खिलारे यांच्यासाठी आशिष जाधव यांनी उमेदवारी अर्ज नेले होते. मात्र ते दाखल केले नाहीत.
अर्ज भरण्याच्या मुदतीपर्यंत विजय मिळवण्याइतके संख्याबळ झाले नाही. त्यामुळे त्यांनी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला. अखेर महाविकास आघाडीचे चारही सभापती बिनविरोध झाले. त्याची अधिकृत घोषणा करण्यासाठी नियमानुसार सभा घेण्यात आली. या सभेसही महायुतीचे सदस्य अनुपस्थित राहिले.
आमचे 25 सदस्य खऱ्या अर्थाने महायुती म्हणून एकत्र ठेवण्यात यशस्वी ठरलो. आमच्यातील आणखी काहीजणांना फोडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र त्यांना यश मिळू दिले नाही. आमचे संख्याबळ विजयापर्यंत पोहोचत नसल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार अर्ज दाखल केले नसल्याचे भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.