Jayant Patil, Shashikant Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara NCP News : जयंत पाटील म्हणाले, पर्याय नाही ; तर परतफेडीचा शशिकांत शिंदेंनी कोणाला दिला इशारा ?

सरकारनामा ब्यूरो

- राजेंद्र वाघ

Koregaon Assembly : कोरेगाव मतदारसंघामध्ये सध्या काय चालले आहे, हे मला चांगलेच माहित आहे. कोणी जास्त पैसे खर्च करतोय, कोणी मोठी यंत्रणा लावतोय, कोणाच्या तरी छोट्याशा आमिषाला बळी न पडता राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेवून डोळस व्हा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.

तसेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघ पुन्हा शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकसभेच्या निवडणुकीसोबतच विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यास आश्चर्य वाटू नये, असेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादीच्या कोरेगाव येथील विजय निश्चय मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते.

यावेळी आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर, मेहबूब शेख, सारंग पाटील, सुनील माने, सतीश चव्हाण, संजना जगदाळे, रमेश उबाळे, भास्कर कदम, जयवंत घोरपडे, अजय कदम, नाना भिलारे, नरसिंग दिसले, श्रीमंत झांजुर्णे, किशोर बर्गे, प्रताप कुमुकले, निलेश जगदाळे, राहुल साबळे, संगिता बर्गे, प्रीतम बर्गे, गणेश धनवडे, हेमंत बर्गे, डॉ. गणेश होळ, दिनेश सणस, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जयंत पाटील म्हणाले, "या मतदारसंघाचे नेतृत्व शंकरराव जगताप, डॉ. शालिनीताई पाटील व त्यांच्यानंतर शशिकांत शिंदे यांनी केले आहे. या सर्वांच्या काळात साधनशुचितेचे, सरळमार्गी राजकारण होते. आता काय चालले आहे, हे मला माहित आहे. शशिकांत शिंदे व कार्यकर्त्यांनी मतदारसंघात अधिक लक्ष द्यावे. आता सत्ता नाही म्हणून या मेळाव्याच्या गर्दीला ओहोटी लागेल, असे वाटले होते; परंतु मोठ्या ताकदीने लोक या मेळाव्याला उपस्थित राहिले आहेत.

देशाचे व राज्याचे भवितव्य कोणाच्या हाती द्यायचे, याचा निर्णय नागरिकांनी करावा. डोळस व्हा, शरद पवार यांची पाठराखण करायचे काम करा आणि शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी पूर्ण ताकद उभी करा." शरद पवार यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून लोकसभेला इतिहास घडवूया, असे नमूद करून आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, "विरोधकांना संपवण्याचा उद्योग स्थानिक लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांचा आधार घेऊन करत आहेत.

आमच्याकडे एक वेगळ्या प्रकारची सीआयडी आहे. कोणाला, कुठे अडकवायचे याचा प्लॅन त्यांच्याकडे सुरू असतो. पण मी शरद पवार यांचा कार्यकर्ता आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मी कोरेगावकरांची साथ सोडणार नाही आणि विरोधकांचा हिशेब मी चुकता करणारच, हा माझा शब्द आहे." यावेळी बाळासाहेब पाटील, सुनील माने, मेहबूब शेख, संजना जगदाळे, सारंग पाटील, भास्कर कदम यांची भाषणे झाली.

परतफेड करणार : शशिकांत शिंदे

शशिकांत शिंदे म्हणाले, "आमचेच काही जण माझ्याबद्दल सांगतात, की 'मी लोकसभेला जाईन, मी इकडे जाईन, मी तिकडे जाईन.' त्यावर मला लोक विचारतात, की 'तुम्ही नक्की कोठून लढणार'. मला कोरेगावकरांना सांगायचे आहे, की मी येथूनच लढणार आणि परतफेड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही." असा इशारा नाव न घेता आमदार महेश शिंदे यांना दिला.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT