Satara, 05 April : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदी बहुमत हाती नसताना भाजपने तोडफोडीचे राजकारण करत बाजी मारली. त्यानंतर चारही सभापतिपदे बिनविरोध करत जिल्हा परिषदेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. पण सत्तास्थापनेच्या खेळात भाजपच्या पाठीशी सर्वाधिक पाठबळ उभं करणाऱ्या कराडची झोळी रिकामीच राहिली आहे. त्या तुलनेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या मतदारसंघातील खटावला अध्यक्षपदासह तीन पदांची लॉटरी लागली आहे. दुसरीकडे, आमदार अतुल भोसले आणि मनोज घोरपडेंचा कराडला मात्र डावलण्यात आले आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या (Satara Zilla Parishad) अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्षासह २८ सदस्यांचे संख्याबळ असतानाही तोडफोडीचे राजकारण करून भाजपने बाजी मारली. अध्यक्षपदासाठी खटावमधून निवडून आलेल्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना संधी देण्यात आली, तर उपाध्यक्षपदी सातारा तालुक्यातील राजू भोसलेंची निवड करण्यात आली.
वास्तविक, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव होते. मात्र, सत्ता समीकरणात खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या प्रिया शिंदे (Priya Shinde) यांना लॉटरी लागली. अध्यक्षपदासाठी कऱ्हाड तालुक्यातून निवडून आलेल्या दोन महिला सदस्या दावेदार होत्या. पण त्यांना संधी मिळू शकलेली नाही.
अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीत डावलले गेल्यानंतर सभापतिपदाच्या निवडीत कराडला संधी मिळेल, अशी चर्चा होती. पण, फोडाफोडीच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या दोन सदस्यांना सभापतिपद द्यावे लागले, त्यामुळे कऱ्हाडवर पुन्हा अन्याय झाला आहे.
सभापतिपदाच्या निवडीत खटाव तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेल्या लता कर्णे यांना कृषी व पशुसंवर्धन सभापतिपद मिळाले आहे, तर खटावमधील भाजपच्या तेजस्विनी कदम यांच्याकडे शिक्षण समितीचे सभापतिपद आले आहे. म्हणजे अध्यक्षपद आणि दोन सभापतिपदे आपल्याच मतदारसंघात खेचून आणत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेच जिल्ह्यात ‘दबंग’ मंत्री ठरले आहेत.
राजू भोसले यांच्या माध्यमातून उपाध्यक्षपद हे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातारा तालुक्याकडे आले आहे. राष्ट्रवादीतून फुटून आलेल्या वाई तालुक्यातील ऋतुजा शिंदे यांना महिला व बालकल्याण सभापतिपद द्यावे लागले आहे. ऋषिकेश धायगुडेंच्या माध्यमातून खंडाळा तालुक्याला समाज कल्याण समितीचे सभातिपद मिळाले आहे.
सत्तेच्या गोळाबेरीजमध्ये मात्र कऱ्हाडवर अन्याय झाला आहे. अध्यक्षपदासाठी कऱ्हाडची दावेदारी असताना सत्तेच्या सारीपाटात हे पद खटावकडे गेले. सभापतिपदाच्या निवडीत कऱ्हाड संधी मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत असताना पुन्हा एकदा खटावला झुकते माप मिळाले आहे. पण भाजप विचाराच्या एका अपक्षासह सर्वाधिक ९ सदस्यांचे पाठबळ पक्षाच्या पाठीशी उभे करूनही आमदार भोसले आणि घोरपडेंच्या हाती सत्तेचे पद येऊ शकलेले नाही, हे विशेष.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.