

Satara ZP : सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याचे राज्याच्या विधानपरिषद आणि विधानभेत तीव्र पडसाद उमटले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री, आमदारांनी विधिमंडळाच्या बाहेरही आंदोलन करत घोषणाबाजी केली. यानंतर शिवसेनेच्या आमदार, मंत्र्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक बोलावली. महायुतीतील दोन्ही मित्रपक्षांनी भाजपविरोधात तापवलेल्या या वातावरणानंतर सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे राजीनामा देण्याची शक्यता आहे.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या प्रिया शिंदे यांना बहुमत नसतानाही मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी अध्यक्षपदी बसवले. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या 5 सदस्यांना फोडून भाजपने ही मोहीम फत्ते केली. तसेच राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना पोलिसांनी सभागृहात जाण्याआधीच अटक केली, यामुळे दोघांनाही मतदान करता आले नाही. याचाही भाजपला थेट फायदा झाला.
याच अटकेवेळी जिल्हा परिषदेच्या इमारतीत जोरदार राडा झाला. आपल्याला धक्काबुक्की झाल्याचा आरोप मंत्री शंभुराज देसाई, मंत्री मकरंद पाटील यांनी केला. तसेच यात आपल्याला जखम झाल्याचा दावाही देसाई यांनी केला आहे. या राड्याचे सगळे पडसाद सोमवारी (24 मार्च) विधानपरिषद आणि विधानसभेत उमटले. दोन्ही सभागृहात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी पोलीस प्रशासनावर आरोप केले.
विधानपरिषदेत आमदार हेमंत पाटील, विक्रम काळे, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री मकरंद पाटील यांनी मुद्दा उपस्थित करत पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांची तक्रार केली. या तक्रारीनंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले. यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी हरकत घेतली. त्यानंतर विधानसभेतही शिवसेनेच्या आमदार, मंत्र्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही निवेदन केले.
विधानपरिषदेतील चर्चेनंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवरही आंदोलन करत घोषणाबाजी केली. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे मंत्री, आमदार सभागृहातून निघून गेले. नंतरच्या तासात शिवसेनेच्या सदस्यांनी विधानसभेत वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली. सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदस्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.
या दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्री आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत मंत्र्यांनी राजीनाम्याचा इशारा दिला असल्याची माहिती आहे. भाजपकडून सातत्याने गळचेपी केली जात आहे. आता सातारा जिल्हा परिषदेतही असाच प्रकार घडला आहे. काहीही झालं तरी सातारा जिल्हा परिषेदबाबत तडजोड होणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांची बैठक घेतली. यात भाजपचे सातारचे जिल्हाध्यक्ष, आमदार अतुल भोसलेही उपस्थित होते. यात सातारा जिल्हा परिषदेतील राडा, शिवसेना-राष्ट्रवादीच्या आक्रमकतेला कसे प्रत्युत्तर द्यायचे? उपसभापतींनी दिलेल्या निर्देशांवर कशी कार्यवाही करायची? यावर चर्चा झाली. याशिवाय प्रिया शिंदे यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या शक्यतेवरही चर्चा झाल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.