Udayanraje Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : उदयनराजे भोसलेंचा मोठा निर्णय; ‘छत्रपती घराण्याचा शाही दसरा साधेपणाने, सीमोल्लंघनाचा खर्च पूरग्रस्तांना’

Satara Shahi Dussehra : महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर छत्रपती घराण्याने शाही दसरा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. सीमोल्लंघनाचा शासकीय खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वळविण्यात येणार असल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

Vijaykumar Dudhale
  1. शाही दसरा साधेपणाने – साताऱ्यातील पारंपरिक शाही विजयादशमी व सीमोल्लंघन सोहळा यंदा पूरस्थितीमुळे कोणताही थाटामाट न करता साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  2. शासकीय निधी पूरग्रस्तांसाठी – सोहळ्यासाठी मिळणारा शासकीय खर्च थेट पूरबाधितांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे वर्ग करण्याचे आदेश खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले आहेत.

  3. सर्वांना मदतीचे आवाहन – राज्यातील गंभीर पूरस्थिती पाहता नागरिकांनी आर्थिक, वस्तूरूप किंवा धान्य स्वरूपातील मदत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पूरग्रस्तांना पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Satara, 29 September : राज्यात महापुराने सर्वत्र हाहाकार उडविला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांसह जमीन वाहून गेली आहे, तर घरात पुराचे पाणी शिरल्याने सर्व चीजवस्तू वाहून गेल्या आहेत, त्यामुळे बळिराजा अक्षरशः रस्त्यावर आला आहे. राज्यावर ओढावलेल्या महापुराच्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती घराण्याने शाही दसरा सोहळा यंदा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सीमोल्लंघनाचा शासकीय खर्च हा पूरग्रस्तांसाठी वर्ग करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोशल माध्यमातून शाही दसरा सोहळा साधेपणाने साजरा करण्याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. त्यात खासदार भोसले यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रावर ओढावलेल्या पूरसंकटाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात यंदा शाही दसरा सोहळा साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे. जनता जनार्दनानेही शक्य होईल, तितकी मदत पूरबाधितांसाठी सहाय्य म्हणून करावी.

महाराष्ट्रात विशेषकरून मराठवाडा, कोकण, सातारा जिल्हयातील पूर्व भाग तसेच एकंदरीत संपूर्ण देशात वरुणराजाने हाहा:कार माजवला आहे. पूरबाधितांच्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ता. २ आक्टोंबर रोजीचा सातारचा (Satara) विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शाही सीमोल्लंघन सोहळ्यासाठी मिळणारा या वर्षीचा शासकीय निधी पूरबाधितांच्या मदत कार्यासाठी परस्पर वर्ग करावा. तसेच, जनता जनार्दनानेही माणुसकीच्या भावनेतून शक्य असेल ती मदत जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीला करावी, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

उदयनराजे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे. त्यात अनेक ठिकाणी जीवित आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. पुरात पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. बळिराजा तर अक्षरशः उद्‌ध्वस्त झालेला आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकंदरीतच राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत सातारचा शाही विजयादशमी आणि सीमोल्लंघन सोहळा थाटामाटात, धूमधडाक्यात, डामडौलात करणे हे आमच्या मनाला पटणारे नाही.

पावसामुळे मराठवाडयासह नुकसान झालेल्या ठिकाणी मोठ्या मदतीची गरज आहे. त्यामुळे शाही दसरा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक नागरीकाने एक भारतीय म्हणून पूरबाधितांसाठी शक्य होईल तितकी आर्थिक, वस्तूरुपाने किंवा धान्य स्वरुपातील मदत जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्यता निधीमध्ये जमा करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

  1. प्र: यंदा साताऱ्यातील शाही दसरा कसा साजरा होणार आहे?
    उ: पूरस्थितीमुळे कोणताही डामडौल न करता साधेपणाने साजरा केला जाईल.

  2. प्र: सोहळ्यासाठीचा शासकीय निधी कशासाठी वापरण्यात येणार आहे?
    उ: तो संपूर्ण निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वर्ग केला जाईल.

  3. प्र: उदयनराजे भोसले यांनी नागरिकांना काय आवाहन केले आहे?
    उ: शक्य तितकी आर्थिक, वस्तूरूप किंवा धान्याची मदत पूरग्रस्तांसाठी देण्याचे आवाहन केले आहे.

  4. प्र: राज्यातील कोणते भाग विशेषतः पूरग्रस्त झाले आहेत?
    उ: मराठवाडा, कोकण, सातारा पूर्व भाग आणि इतर अनेक जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT