Sharad Pawar-Praveen Gaikwad-Dhairyasheel Mohite Patil
Sharad Pawar-Praveen Gaikwad-Dhairyasheel Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Lok Sabha Constituency : माढ्यात नवा ट्विस्ट; पवारांकडून प्रवीण गायकवाडांना तयारी करण्याची सूचना

दत्तात्रय खंडागळे

Solapur,1 April : 'आमचं ठरलंय' असं सांगणारे मोहिते पाटील अजून कोणताच निर्णय घेत नाहीत. मोहिते पाटलांचा तुतारीचा निर्णय होत नसल्यामुळे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष तथा शरद पवारांचे विश्वासू प्रवीण गायकवाड यांनी मोहिते पाटलांनी तुतारीवर लढावे अथवा मी माढा लोकसभा लढण्यास तयार आहे, असे स्पष्ट केले आहे, त्यामुळे माढ्यात नवा ट्विस्ट आला आहे. माढ्याच्या उमेदवारीबाबत पवार आणि गायकवाड यांची रविवारी दिल्लीत बैठक होऊन सविस्तर चर्चाही झाली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून 'आमचं ठरलंय' असे सांगत मोहिते पाटील (Mohite Patil) माढ्यामधून (Madha) भाजपकडे उमेदवारीचे तिकीट मागत होते. परंतु भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच तिकीट दिले, त्यामुळे नाराज असलेले धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे शरदचंद्र पवार गटाची तुतारी हाती घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माढा मतदारसंघातूनही 'तुतारी' चिन्हावर लढावे, यासाठी मोहिते पाटलांवर दबाव वाढत असल्याचे चित्र आहे. याबाबत मोहिते पाटील कोणताच निर्णय घेत नसल्यामुळे माढ्याबाबत शरद पवार गटाकडून नवी खेळी खेळली जात आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Praveen Gaikwad ) यांनी रविवारी (ता. 31 मार्च) दिल्ली येथे पवारांची भेट घेऊन माढ्याच्या उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा केली.

या बैठकीबाबत प्रवीण गायकवाड म्हणाले की, माढा मतदारसंघात मोहिते पाटील निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. त्यांनी तुतारीच्या चिन्हावर लढावे, ते निश्चितपणे निवडून येतील. परंतु त्यांनी तुतारी हाती न घेतल्यास स्वतः माढ्यातून लढण्यास तयार असल्याचे पवारांना मी सांगितले आहे. मोहिते पाटलांनी लवकर निर्णय न घेतल्यास मी जोमाने ‘तुतारी’ हाती घेऊन माढा निवडणूक लढण्यास सज्ज असल्याचे सांगितले. पवारांनीही याबाबत सकारात्मकता दर्शविल्याने माढ्याच्या उमेदवारीत नवीन ट्विस्ट आला आहे.

धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढतील?

भाजपकडून तिकिटात डावलल्यानंतरही मोहिते पाटील यांनी मतदारसंघातील तालुकानिहाय दौरे सुरूच ठेवले आहेत. ते कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी गेल्या दोन दिवसांत सलगपणे मोहिते-पाटील परिवारातील सदस्यांच्या भेटी घेत त्यांचे मतपरिवर्तन केल्याचे समजते. तरीही मोहिते पाटील सध्या तुतारी हाती घेण्यापेक्षा अपक्ष म्हणून माढा निवडणूक लढवतील? अशी चर्चा रंगली आहे.

प्रवीण गायकवाडांना आदेश

माढा मतदारसंघातून सुरुवातीला महाविकास आघाडीने रासपचे महादेव जानकारांना उमेदवारी देण्याचे सूतोवाच केले होते. पण, ऐनवेळी महादेव जानकर महायुतीबरोबर गेल्याने मतदारसंघात धनगर समाजाचा उमेदवार म्हणून शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख मतदारसंघात फिरू लागले आहेत. पण, संभाजी ब्रिगेडचे काम आणि समाजाचा चेहरा म्हणून आपला वेगळा ठसा उमटवलेले प्रवीण गायकवाड यांना पवारांनी माढा लढण्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

Edited By : Vijay Dudhale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT