Sharad Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : शरद पवारांचं ठरलं; माढ्यात शिंदे बंधूंच्या बालेकिल्ल्यात घेणार मेळावा

Vijaykumar Dudhale

Solapur News : ज्येष्ठ नेते शरद पवार हे येत्या १६ नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. माढा तालुक्यातील कापसेवाडी येथील शेतकरी मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या २३ ऑक्टोबर रोजी हा मेळावा ठरला होता. मात्र, ऐनवेळी तो रद्द करण्यात आला होता. आमदार शिंदे बंधूंच्या बालेकिल्ल्यातील त्याच मेळाव्याला हजेरी लावून पवार काय बोलतात?, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे. (Sharad Pawar will visit Solapur on November 16)

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार हे प्रथमच सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याची उत्सुकता आहे. पवारांचा माढा दौरा २३ ऑक्टोबर रोजी ठरला होता. कापसेवाडील आयोजकांनी मेळाव्याची जय्यत तयारीही केली होती. मात्र, पवारांचा दौरा अचानक रद्द झाला होता. नेमके त्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा माढ्यात आमदार बबनराव शिंदे यांच्या कारखान्याच्या गाळप हंगामाचा कार्यक्रम होता. त्यामुळे पवारांनी दौरा रद्द केल्याने त्याची मोठी चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पवारांनी २३ ऑक्टोबरचा दौरा रद्द केला असला तरी कापसेवाडीतील मेळावा आयोजकांना ‘मी पुन्हा येईन’, असा शब्द त्यांनी दिला होता. त्यासंदर्भात आयोजक नितीन कापसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, संजय पाटील घाटणेकर यांनी आज (ता. ३ नोव्हेंबर) यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जाऊन पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पवारांनी आपला माढा दौरा जाहीर केला आहे.

दिवाळी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार हे १६ नोव्हेंबरला माढ्यात येणार आहेत. माढ्याबरोबरच ते धाराशिव आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि करमाळ्याचे राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी अजित पवार गटाची वाट धरली आहे, त्यामुळे या मेळाव्यात पवार त्यांच्याबाबत काय बोलतात का?, याकडेही सोलापुरातील राजकीय क्षेत्राचे लक्ष असणार आहे.

बेदाणा उत्पादकांच्या प्रश्नावर होणार चर्चा

सोलापूर, धाराशिव आणि सांगली जिल्ह्यांसह राज्यात २ लाख ५७ हजार टन बेदाणा उत्पादन झाले आहे. सध्याच्या बाजारभावातून बेदाणा उत्पादकांचा खर्चही निघत नसल्याने ९४ हजार टन बेदाणा आजही कोल्ड स्टोअरेजमध्ये आहे. बेदाण्यावरील निर्यात शुल्क कमी करून आयात शुल्क वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. त्यासंदर्भातही कापसे यांनी पवारांना साकडे घातले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT