Shashikant Shinde
Shashikant Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shashikant Shinde : कोरेगाव मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करा, अन्यथा...; शशिकांत शिंदेंचा इशारा

राजेंद्र वाघ

Satara Political News : कोरेगावातील घनकचरा प्रकल्पामध्ये गैरव्यवहार झाल्यावरून येथील नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कारभाराच्या चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. त्यास अनुसरून सर्व मुद्द्यांची नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी. त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. अन्यथा, जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

कोरेगाव येथील तहसीलदार कार्यालयापुढे राष्ट्रवादीचे पदाधिकारी रमेश उबाळे यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी आमदार शशिकांत शिंदे यांनी आज भेट दिली. ते म्हणाले, "कोरेगाव नगरपंचायतीच्या गैरकारभाराबद्दल व चुकीच्या कामाबद्दल उबाळे यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या प्रश्नी न्याय न मिळाल्यास येत्या २६ तारखेला आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे माझी प्रशासनाला व शासनाला विनंती आहे, की या प्रश्नांमध्ये लक्ष घालून सरकारच्या पैशाचा अपव्यय होतोय, त्यावर कारवाई करावी‌," अशी मागणी शिंदेंनी यावेळी केली.

शिंदे (Shashikant Shinde) म्हणाले, "या अनुषंगाने मी विधान परिषदेमध्ये देखील विषय मांडले होते; परंतु सरकारकडून थातूरमातूर उत्तरे दिली. कोणत्याही परिस्थितीमध्ये या प्रकरणाचा शेवट करावा, अशी भावना उबाळे यांची आहे. कोरेगावच्या विकासाला आमचा कोणाचाही विरोध नाही. विकासामुळे बदल होत असेल, तर कोणाचीही हरकत नाही. माझ्या कारकिर्दीमध्ये प्रशासकीय इमारतीसह विविध विकासकामे मोठ्या प्रमाणात केली होती. आजही कोणी विकासकामे करत असेल, तर सहकार्याचीच भूमिका घेतली आहे; परंतु चुकीच्या पद्धतीने काही अधिकारी काम करत असतील, तर आणि त्यांना कोणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचा विरोध होणे गरजेचेच आहे," अशी अपेक्षाही शिंदेंनी व्यक्त केली.

"हा जनतेचा पैसा आहे. उबाळे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे ऑडिट होणे गरजेचे आहे‌. मुख्याधिकारी सर्वसामान्य जनतेसह नगरसेवकांशी ज्या पद्धतीने वागतात, बोलतात, त्या पद्धतीने राज्यातील कोणीही अधिकारी बोलत नाहीत. त्यांना कोणाचे तरी पाठबळ, आशीर्वाद असेल म्हणूनच त्या अशा पद्धतीने वागत आहेत. उबाळेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये त्यांचा सहभाग नसेल, तर त्यांनी दिलदारपणे चौकशीला सामोरे जायला हरकत नाही," असे आवाहनही आमदार शिंदे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

कोट्यवधींचा निधी आणल्याचा गवगवा केला जातो. कोरेगाव (Koregaon) नगरपंचायतीकडे आलेला विकास निधी सर्व नगरसेवकांना समानतेने दिला पाहिजे. मात्र, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक आहेत, त्यांना निधी दिला जात नाही. या पार्श्वभूमीवर एकूणच कोरेगावातील नागरिकांच्या अडचणींसंदर्भात तसेच नगरपंचायतीमधील गैरकारभाराविरोधात येत्या २३ तारखेला सामान्य नागरिकांसमवेत कोरेगाव येथील ठिय्या आंदोलनस्थळापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT