Maharashtra Political News : सत्तासंघर्षांच्या ठाकरे-शिंदेंच्या निकालानंतर राज्यात आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि ठाकरे गटाचा वाद सुरू झाल्याचे चित्र आहे. नार्वेकरांनी दिलेल्या निकालाची उद्धव ठाकरेंनी चिरफाड करणारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी २०१३ मध्ये झालेल्या निवडी आणि केलेल्या ठरावांबाबत व्हिडीओच्या माध्यमातून दाखवले. यानंतर नार्वेकरांनीही पत्रकार परिषद घेत सर्व आरोप खोडून काढत दिलेला निकाल शंभर टक्के सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वानुसार दिल्याचे सांगितले.
राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) म्हणाले, 'ठाकरेंची पत्रकार परिषद होती की दसरा मेळावा, की गल्लीबोळातील भाषण हे कळत नाही. ते माझ्या निकालातील त्रूटी दाखवतील असे वाटत होते. परंतु त्यांनी राजकीय भाषणे केली. त्यांनी संविधान संस्थेविषयी चुकीचे शब्द वापरून लोकांची दिशाभूल केली. निकालानंतर ठाकरे गटाकडून अध्यक्षांनी, सु्प्रीम कोर्टाने घालून दिलेल्या चौकटीबाहेर जाऊन निर्णय दिल्याचा आरोप केला जात आहे. मात्र त्यांनी अद्याप कुठली चौकट तोडली, हे सांगितले नाही. ज्यांचा संविधानावर विश्वास नाही त्यांना संविधानावर बोलण्याचा अधिकार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
पक्षात फूट पडल्याची माहितीच नव्हती
कोर्टाच्या निकालात असे नमूद केले की, ज्या वेळेला आपण एकाद्या प्रतोदाला, गटनेत्याला मान्यता देता, त्यावेळी अध्यक्षांनी पक्षाची इच्छा समजून त्यानांचा मान्यता द्यावी. २१ जून २०२२ रोजी तत्कालीन लोकसभा उपाध्यक्ष झिरवळ यांनी अजय चौधरी, सुनील प्रभूंना मान्यता दिली. त्यावेळी त्यांच्यासमोर एकच पक्ष होता. त्यांनी पक्षात फूट पडलेली आहे, हे समजण्याची काहीही कारण नव्हते. त्यामुळे त्यांनी ही राजकीय भूमिका आहे, हे गृहीत धरून निर्णय दिला. आता सत्तासंघर्षाच्या निर्णयात अध्यक्षांसमोर दोन पक्षांचे दावे होते. याचा अर्थ पक्षात दोन गट पडलेले आहे. त्यामुळे अध्यक्षांनी मान्यता देण्याच्या निर्णयात राजकीय पक्ष कोणता हे ठरवणे गरजेचे होते, याकडेही नार्वेकरांनी लक्ष वेधले.
प्रतोदबाबत पक्षाची इच्छा महत्वाची
कोर्टाने सांगितल्याप्रमाणे, आपण मूळ राजकीय पक्ष कोणता हे निश्चित करा, त्यानंतर ज्याला मान्यता देता त्या पक्षाच्या इच्छेनुसार प्रतोदला मान्यता द्या. त्यानुसारच मी निर्णय दिलेला आहे. कुणाची निवड चुकीची आणि कुणाची बरोबर हे कोर्टाने कधीच सांगितले नाही. त्यामुळे कोर्टाने दिलेल्या मी निर्णय दिला आहे. मूळ राजकीय पक्ष ठरवून प्रतोदबाबत त्यांची इच्छा काय आहे, याचाच निर्णय दिलेला आहे, असेही नार्वेकर म्हणाले.
घटनादुरुस्तीचा उल्लेखच नाही
ठाकरे (Uddhav Thackeray) वारंवार सांगतात की १९९९ ची घटना योग्य ठरवली आणि २०१८ ची अयोग्य ठरवली. त्यामुळे नार्वेकरांचा निकाल चुकीचा आहे. यावर नार्वेकर म्हणाले, मूळ राजकीय पक्ष कोणता हे ठरवताना दोन गटाने दोन वेगवेगळ्या घटनेच्या आधार घेतला तर निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनांचा आधार घ्या, असे कोर्टाने सांगितले होते. त्यानुसार पत्र पाठवून दोन्ही पक्षांच्या घटना मागवून घेतल्या. आयोगाने शिवसेनेच्या १९९९ ची कॉपी पाठवली. त्यात घटनेत दुरुस्ती झाली आहे, याचा कुठलाही उल्लेख नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अनिल परबांकडे खोटे पुरावे
अनिल परब (Anil Parab) दाखवतात ते पुरावे खोटे असल्याचा दावाही नार्वेकरांनी केला. ते म्हणाले, परबांकडे पक्षात ज्या निवडी झाल्या त्याचीच माहिती आहे. आता ते जे बोलले ते माझ्यासमोर का बोलले नाहीत? २०१८ घटना दुरुस्तीबाबत ते ४ एप्रिल २०१८ चे पत्र दाखवत असतात. ते वाचून दाखवले जात नाही. त्यात संविधानााबाबत एकही उल्लेख केलेला नाही. त्यांनी निवडणूक आयोगाला माहिती पुरवल्याचे असलेले पुरावे दाखवतात खोटे आहेत. मी दिलेला निर्णय शंभर टक्के खरा आणि न्यायालयाला धरून आहे, असा दावाही नार्वेकरांनी केला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.