Dharashiv, 19 February : धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नाही. भारतीय जनता पक्ष सर्वाधिक १९ जागा जिंकल्या आहेत. मात्र, बहुमतासाठी पक्षाला आणखी नऊ जागांची गरज आहे.
भाजपचे जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य हे सहलीवर असून त्यांनी अध्यक्षपदासाठी गोळीबेरीज केल्याचे सांगितले जात असतानाच आता धाराशिवच्या राजकारणातून मोठी घडामोडी पुढे आली आहे. १५ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्षपदाची ऑफर दिल्याची माहिती आहे. आता राष्ट्रवादीचे नेतृत्व ही ऑफर स्वीकारणार का, याकडे धाराशिवचे लक्ष लागले आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेच्या (Dharashiv ZP) ५५ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक १९, शिवसेनेने १५, राष्ट्रवादी काँग्रेसने ०६, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ०७, अपक्ष ४, काँग्रेस ३ आणि समाजवादी पक्षाने एक जागा जिंकली आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही, त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी मोठा रस्सीखेच होताना दिसत आहे.
माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे अपक्ष निवडून आलेले पुतणे धनंजय सावंत यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यांचे आणि माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांचे एकत्रित फोटो व्हायरल झाले आहेत. या दोघांमध्ये मैत्री असून यापूर्वी धनंजय सावंत यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे, त्यामुळे भाजपसोबतच्या आघाडीत त्यांना महत्वाचे पद मिळेल, अशी चर्चा आहे.
एकीकडे भारतीय जनता पक्षाने काही अपक्ष आणि इतर जिल्हा परिषद सदस्यांना गळाला लावल्याची चर्चा असताना आता महत्वाची घडामोड समोर आली आहे. भाजपसोबत सत्तेत न जाण्याच्या भूमिकेत असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अध्यक्षपदाची ऑफर दिली आहे. आता या ऑफरकडे राष्ट्रवादी कोणत्या भूमिकेत पाहते आणि शिवसेनेला काय प्रतिसाद देते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
याबाबत शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार म्हणाले, धाराशिवमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष बनावा, अशी इच्छा बोलून दाखवली आहे. अजितदादांना ती खरी श्रद्धांजली असेल, अशी त्यांची भावना आहे. ‘शिवसेनेचा एका कार्यकर्ता म्हणून आम्हालासुद्धा अजितदादांच्या पक्षाचा नेता जिल्हा परिषद अध्यक्षपदी बसत असेल तर त्याचे स्वागत करण्याची आमची तयारी आहे,’ असे विधान केले आहे.
राष्ट्रवादीच्या धाराशिवमधील जिल्हा परिषद सदस्य आणि नेत्यांनी आमच्याकडे तशी मागणी केली तर आपण वरिष्ठांशी बोलून सकारात्मक निर्णय घडवून आणू आणि राष्ट्रवादीचा अध्यक्ष करण्याची आमची भूमिका असेल, असेही केदार यांनी म्हटल्याचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे. यातून शिवसेनेकडून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.